Uttar Pradesh Crime : देशभरात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना कमी होण्यासाठी सातत्याने पावलं उचलले जातात. मात्र, तरी गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. आता देखील उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह तब्बल २२ किलोमीटर अंतरावर फेकून दिला. मात्र, पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात एका महिलेने आणि तिच्या प्रियकराने मिळून तिच्या पतीची हत्या केली. त्यानंतर अपघात झाल्याचं दाखवलं आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला २५ किलोमीटर अंतरावर फेकून दिला. या प्रकरणातील महिलेचं नाव नेहा आणि तिचा कथित प्रियकर जितेंद्र या दोघांनी या हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
झालं असं की, नेहाने तिचा पती नागेश्वरला अज्ञात ठिकाणी बोलावलं. त्या ठिकाणी बेशुद्ध होईपर्यंत त्याला दारू पाजली आणि नंतर तिचा प्रियकर जितेंद्रच्या मदतीने त्याचा गळा दाबून हत्या केली. तसेच त्याच्यावर शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर तिने आणि तिच्या प्रियकराने पतीचा मृतदेह मोटारसायकलवरून २५ किलोमीटर अंतरावर नेऊन टाकून दिला.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या जोडप्याने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. तसेच मृतदेह दुचाकीवरून घेऊन जात अपघात झाल्याचं दाखवलं. पण मृतदेह दुचाकीवरून घेऊन जात असताना खाली जमिनीवरून पाय ओढले गेले होते. त्यामुळे पायांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. तसेच मृतदेह अज्ञात ठिकाणी टाकल्यानंतर दोघांनी मुंबईला पळून जाण्याचा विचार केला. मात्र, मोबाईल लोकेशन आणि मृताच्या वडिलांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकरांना अटक केली.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. नागेश्वरच्या वडीलांनी म्हटलं की, “त्यांचा मुलगा शुक्रवारी दुपारी बाईकवरून घराबाहेर पडला. पण तो परत आलाच नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली.” त्यांनी आरोप केला की, त्यांच्या सुनेचे जितेंद्रशी प्रेमसंबंध होते, त्यामधून त्यांनी नागेश्वरची हत्या केली आणि त्याचा मृतदेह फेकून दिला.
पोलिसांनी माहिती देताना म्हटलं की, नागेश्वर यापूर्वी ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यांसाठी एनडीपीएस कायद्यांतर्गत तुरुंगात होता. मात्र, याच काळात त्याच्या पत्नीशी जितेंद्रचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर नागेश्वरची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याने त्यांच्या प्रेमसंबंधांना विरोध केला. यावरूनच त्यांच्यात वाद निर्माण होत असत. तसेच आरोपी पत्नीने पोलिसांना सांगितलं की पतीकडून तिचा छळ सुरू होता. त्यांचे दररोज भांडणं होत असत. त्यामुळे कंटाळून नेहा आणि जितेंद्रने पतीची हत्या केली.