लंडन, बँकॉक : ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांची सोमवारी ब्रिटनच्या तुरुंगातून पाच वर्षांनंतर सुटका झाली. अमेरिकेकडे होणारे प्रत्यार्पण टाळण्यासाठी ते गेल्या दशकभरापासून कायदेशीर लढा देत होते. अखेरीस अमेरिकी अधिकाऱ्यांबरोबर करार केल्यानंतर त्यांच्यापुढील अमेरिकी तुरुंगवासाचा धोका टळला आहे.

५२ वर्षीय असांज हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक असून ते २०१९पासून लंडनमधील बेल्मार्शच्या उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात कैद होते. त्यापूर्वी त्यांनी इक्वादोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता, तेथून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची सुटका झाल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले होते. तब्बल पाच वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर असांज सोमवारी ब्रिटनमधून बाहेर पडले. त्यांनी पहिला थांबा बँकॉक येथे घेतला. तिथून ते अमेरिकेच्या नॉर्दर्न मरियाना आयर्लंड येथे जाणार आहेत.

अमेरिकेबरोबर करारानंतर सुटका

असांज यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेबरोबर एक करार केला होता. त्यानुसार त्यांना हेरगिरीच्या एका आरोपात दोषी असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर त्यांना तुरुंगात राहावे लागणार नाही आणि ते त्यांच्या मायदेशी, म्हणजे ऑस्ट्रेलियाला जाण्यास मुक्त असतील. असांज यांच्यावर अमेरिकेने एकूण १८ आरोप ठेवले होते. त्यासाठी त्यांना अमेरिकेच्या उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगामध्ये दीर्घकाळ तुरुंगवास सहन करावा लागला असता.

असांज यांच्यावर अमेरिकेने राष्ट्रीय संरक्षणविषयक माहिती बेकायदेशीरपणे प्राप्त करून ती उघड करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला होता. या आरोपाखाली अमेरिकेच्या विद्यामान कायद्याखाली त्यांना ६२ महिन्यांची शिक्षा सुनावली गेली असती. शिक्षेचा या कालावधीइतका तुरुंगवास त्यांनी ब्रिटनमध्ये भोगला होता. अमेरिकेच्या न्यायाधीशांनी औपचारिकपणे असांज यांची आरोप स्वीकारणारी याचिका स्वीकारल्यानंतर त्यांची ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका झाली.

हेही वाचा >>> आतिशी यांचे उपोषण संपुष्टात; प्रकृती ढासळल्यामुळे रुग्णालयात दाखल

ऑस्ट्रेलियाकडून सावध प्रतिक्रिया

दरम्यान, असांज यांच्या सुटकेबद्दल अमेरिकेच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. असांज यांना कायम तुरुंगात ठेवून काहीच साध्य होणार नाही असे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले. ते २०२२पासून असांज यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते. असांज यांनी इक्वेडोरच्या दूतावासात तब्बल सात वर्षे आश्रय घेतला होता, त्यानंतर पाच वर्षे ते तुरुंगात होते. या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या जनतेकडून त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यात सातत्याने वाढ झाली.

ज्युलियनची सुटका झाली!!!! तुमच्याविषयी आम्हाला वाटणारी अपार कृतज्ञता शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही. अनेक वर्षांपासून तुम्ही सर्वांनी जो आम्हाला आधार दिला त्याबद्दल आभारी आहे. – स्टेला असांज, ज्युलियन असांज यांची पत्नी