Azim Premji Rejects Karnataka CM Request: आयटी हब असलेल्या बंगळुरू शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आयटी आणि इतर क्षेत्रातील नोकरदार त्रस्त झालेले आहेत. सोशल मीडियावरून याबद्दल वारंवार नाराजी व्यक्त करण्यात येते. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कर्नाटक सरकारने विप्रो कंपनीचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांना एक विनंती केली होती. १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्र लिहून अझीम प्रेमजी यांच्या कंपनीच्या परिसरातून सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्याची मागणी केली होती. ही मागणी अझीम प्रेमजी यांनी फेटाळून लावली.
बंगळुरूच्या सरजापूरमध्ये विप्रोचे मोठे कॅम्पस आहे. या कॅम्पस बाहेरील आउटर रिंग रोडवरील इब्लूर जंक्शन येथे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विप्रो कॅम्पसमधून सार्वजनिक वाहनांना परवानगी देण्यात यावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांनी लिहिले होते. या पत्राला उत्तर देत अझीम प्रेमजी यांनी हे शक्य नसल्याचे सांगितले.
एक समाधान पुरेसे नाही
बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जटील बनली असल्याचे अझीम प्रेमजी यांनीही मान्य केले. पण यासाठी अनेक बाबी जबाबदार असल्याचे ते म्हणाले. ही समस्या सोडविण्यासाठी केवळ एक समाधान पुरेसे नाही, असे त्यांचे मत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य सरकारबरोबर एकत्र येऊन काम करण्याची विप्रो तयार आहे, अशी भूमिका अझीम प्रेमजी यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात मांडली.
अझीम प्रेमजी यांनी कोणता पर्याय सुचवला
अझीम प्रेमजी पत्रात म्हणाले की, सरजापूर येथील संकुल ही कंपनीची खासगी संपत्ती असून ती विशेष आर्थिक क्षेत्राचा (SEZ) भाग आहे. येथील रस्ता सार्वजनिक वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही. हा रस्ता मोकळा केल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटणार तर नाहीच उलट येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
बंगळुरूतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहरी वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील जागतिक दर्जाचा अनुभव असलेल्या एखाद्या संस्थेच्या देखरेखेखाली एक वैज्ञानिक अभ्यास करायला हवा. त्यातून आपल्याला वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भविष्यात काही उपाय मिळू शकतील. या अभ्यासाचा खर्च विप्रो उचलायला तयार आहे, असा पर्याय अझीम प्रेमजी यांनी पत्राद्वारे दिला.