जेनिन :इस्रायलने पश्चिम किनारपट्टीमधून आपले सैन्य मागे घेतले, त्याच वेळी दोन दिवस चाललेला हल्ला ही अपवादात्मक कारवाई समजू नये असा इशारा पॅलेस्टाइनला दिला. इस्राएलच्या सैन्याने केलेल्या हवाई हल्ले आणि जमिनीवरील कारवाईमध्ये किमान १३ पॅलेस्टिनी मारले गेले, १४० हून अधिक जखमी झाले, तर हजारो जण बेघर झाले. या हल्ल्यात मोठय़ा प्रमाणात शस्त्रे, त्यासाठी लागणारी सामग्री आणि रक्कम जप्त केल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी पहाटे सुरू केलेल्या या हल्ल्यामध्ये निर्वासितांच्या छावणीत सक्रिय असलेल्या अतिरेक्यांच्या गटांचे मोठे नुकसान केले असल्याचा दावा इस्राएलच्या सैन्याने केला. या कारवाईत इस्रायलचा एक सैनिकही मारला गेला. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत पश्चिम किनारपट्टीमध्ये इस्राएल आणि पॅलेस्टाईनदरम्यानचा संघर्ष मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. इस्रायलच्या आक्रमक हल्ल्यांचा त्यावर काही दीर्घकालीन परिणाम होईल का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सैन्य मागे घेण्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी गरज पडली तर असे हल्ले पुन्हा करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, ‘या क्षणी आम्ही ही मोहीम पूर्ण करत आहोत आणि मी असे म्हणू शकतो की, जेनिनमधील आमची व्यापक कारवाई अपवादात्मक नाही, जिथे कुठे दहशतवाद असेल तिथून आम्ही त्याचा नायनाट करू’. दुसरीकडे, इस्रायलचे सैन्य बुधवारी सकाळी माघारी गेल्यानंतर पॅलेस्टिनी नागरिकांनी झालेल्या नुकसानाची तपासणी करायला सुरुवात केली. या हल्ल्यात निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. इस्राएलने आमच्या भूमीचा गेल्या ५६ वर्षांपासून घेतलेला ताबा आणि कोणत्याही राजकीय प्रक्रियेचा अभाव यामुळे या हिंसा अपरिहार्य आहेत अशी भावना पॅलेस्टिनी नागरिकांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Withdrawal of israeli forces from the west bank zws