Viral Video of Andhra woman tied to tree: आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. रोजंदारी करणाऱ्या एका महिलेला काही जणांनी झाडाला बांधून मारहाण केली. यावेळी या मजूर महिलेचा लहान मुलगा तिथे बाजूलाच बसला होता. महिलेच्या पतीनं काही लोकांकडून कर्ज घेतलं होतं. मात्र ते त्याला वेळत फेडता न आल्यामुळं आरोपींनी महिलेला झाडाला बांधून अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आरोपी दाम्पत्यासह त्यांच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे. कुप्पम मंडल येथे ही घटना घडली असून हा मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे विरोधकांनी या घटनेवरून सरकारवर टीका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचं नाव सिरिशा (२८) असं आहे. तेलगू देसम पक्षाचे कार्यकर्ते एस. मनिकप्पा याने पीडितेला तिच्या घरातून फरफटत बाहेर आणलं आणि तिच्या दोन मुलांसमोरच तिला झाडाला बांधलं.

पोलिसांनी पुढे सांगितले की, पीडितेचा पती आर. तिमप्पा यानं याच गावातील मनिकप्पाकडून दोन वर्षांपूर्वी ८० हजारांचे कर्ज घेतलं होतं. हे कर्ज छोट्या छोट्या हप्त्यात तो परत देत होता. मात्र काही काळापूर्वी तिमप्पा बंगळुरूत बांधकाम मजूर म्हणून काम करू लागला. त्यानंतर त्याने मनिकप्पाचे पैसे देणं बंद केलं.

यानंतर संतापलेल्या मनिकप्पानं तिमप्पाच्या पत्नीलाच झाडाला बांधलं आणि पैशांची मागणी केली. त्यानंतर मनिकप्पाची पत्नी आणि इतर नातेवाईकांनी पीडित सिरिशाला मारहाणही केली. आम्ही सिरीशाची सोडवणूक केली असून आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३४१, ३२३, ३२४, ६०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

तिमप्पाबरोबर सिरिशा आणि दोन्ही मुलेही बंगळुरूला स्थलांतरीत झाले होते. सोमवारी सिरीशा मुलांसह गावातील शाळेतला दाखला काढण्यासाठी आली होती. ही माहिती मिळताच मनिकप्पा आणि इतरांनी तिला घेरलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विरोधकांनी तेलगू देसम पक्षावर टीका केली आहे.