विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार सुरुवात केली. सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजीचा कणा समजला जाणाऱ्या जसप्रीत बुमराह याने एक विक्रम प्रस्थापित केला. अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध डावाच्या चौथ्या षटकात बुमराहने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. त्याने श्रीलंकेचा कर्णधार आणि सलामीवीर दिमुथ करुणरत्ने याला १० धावांवर माघारी धाडले. यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी याच्याकरवी त्याला बुमराहने झेलबाद केले.

करुणरत्नेचा बळी टिपताच बुमराहने आपल्या कारकिरीदीर्तील एक महत्वाचा टप्पा गाठला. एकदिवसीय क्रिकेटमधील तो बुमराहचा शंभरावा बळी ठरला. या बरोबरच भारताकडून सर्वात जलद बळींचे शतक साजरे करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. १०० एकदिवसीय बळी टिपण्यासाठी त्याला ५७ डाव खेळावे लागले. या आधी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने ५६ डावांत १०० गडी टिपण्याचा कारनामा केला होता. भारताकडून सर्वाद जलद १०० गडी टिपणाऱ्यांच्या यादीत मोहम्मद शमी अव्वल तर बुमराह दुसरा गोलंदाज ठरला. त्या पाठोपाठ इरफान पठाण (५९), झहीर खान (६५), अजित आगरकर (६७) आणि जवागल श्रीनाथ (६८) यांचा क्रमांक येतो.

दरम्यान, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा पर्याय स्वीकारला. पण त्यांची सुरुवात खराब झाली. करुणरत्ने बाद झाल्यावर लगेचच कुशल परेरादेखील १८ धावांवर माघारी गेला. त्यानंतर कुशल मेंडिसदेखील केवळ ३ धावा करून माघारी परतला. जाडेजाने पहिल्याच षटकात त्याचा अडसर दूर केला. तर पुढील षटकात पांड्याने अविष्का फर्नांडोला झेलबाद केले. आजचा सामना भारताने जिंकल्यास भारताला गुणतालिकेत अव्वल स्थान पटकवण्याची संधी आहे.