संयुक्त राष्ट संघटनेला सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोदी यांचे पत्र
संयुक्त राष्ट्र संघटनेला सत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र पाठवले असून दहशतवादाबाबत शून्य सहनशीलता दाखवली जाईल, असा संदेश या संघटनेने जगात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यात म्हटले आहे. कुठल्याही देशाचे नसलेल्या दहशतवाद्यांनी जगाला जो धोका निर्माण केला आहे, त्यावर मोदी यांनी चिंता व्यक्त केली.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांना मोदी यांनी हे पत्र पाठवले आहे, त्यात दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात निर्माण झालेल्या नवीन सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यास संयुक्त राष्ट्रांनी प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. कुठल्याही देशाचे नसलेल्या अतिरेक्यांकडून भारताला धोका असल्याचे सांगताना त्यांचा रोख पाकिस्तानवर आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाबाबत र्सवकष संकेत मान्य स्वीकारले पाहिजेत, असे सांगून त्यांनी म्हटले आहे, की दहशतवाद्यांना आजच्या जगात त्यांची विचारसरणी पसरवण्यासाठी व माणसे भरती करण्यासाठी मोठा वाव आहे. त्यामुळे दहशतवादाला जागतिक रूप आले आहे व त्याला तोंड देण्यासाठी र्सवकष धोरण ठेवावे लागेल.
दहशतवादाबाबत शून्य सहनशीलता राहील, असा संदेश संयुक्त राष्ट्रांकडून सत्तराव्या वर्षांनिमित्त गेला पाहिजे. संयुक्त राष्ट्रांमुळे जग हे एक चांगले ठिकाण राहू शकले हे खरे असले तरी १९४५ नंतर जगात खूप बदलही
झाले आहेत. शांतता व सुरक्षेला धोका वाढला आहे. संयुक्त राष्ट्र संघटना आता सर्वसमावेशक व प्रभावी झाली पाहिजे. ज्या कारणांसाठी या संघटनेची स्थापना झाली ते हेतू साध्य झाले पाहिजेत. आजच्या काळात ही संघटना रोजच्या आव्हानांना तोंड देण्यात सदस्य देशांना मदत करू शकणार आहे का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे व तो प्रश्न सर्व सदस्य देशांनी स्वत:ला विचारून पाहावा.