उत्तर प्रदेशमध्ये अवघ्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकांचा प्रचार वाढवलाय. या प्रचारादरम्यान राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि टोलेबाजी करताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

झालं असं की सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या खिशात एक बाटली होती. ही बाटली स्वीडिश ब्रँडची होती. त्यामुळे या बाटलीत काय होते? अशी चर्चा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर सुरू झाली. याच दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका रॅलीत या बाटलीवरून अखिलेश यांच्यावर निशाणा साधला आणि युपीच्या निवडणुकीच्या वातावरणात बाटलीची चर्चा चांगलीच रंगली. त्यानंतर अखिलेश यादव यांनी बाटलीबद्दल स्पष्टीकरण देत योगींवर निशाणा साधला. पाहुयात नेमकं काय घडलं…

गरम पाण्यासाठी काचेची बाटली…

सर्वप्रथम अखिलेश यादव यांच्याबद्दल बोलूया. युपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले, “भारतीय जनता पक्ष योगी आदित्यनाथ यांना गांजा मिसळवलेल्या विहिरीचे पाणी प्यायला देत ​​आहे. एक तर आधी चुकीची छापेमारी टाकली (पियुष जैन प्रकरण) आणि आता माझ्या खिशातील बाटलीबद्दल चुकीचं बोलताहेत.” ही काचेची बाटली असून आपण गरम पाण्यासाठी वापरत असल्याचं ते म्हणाले.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले…

योगी आदित्यनाथ अखिलेश यांच्यावर टीका करत म्हणाले, ‘तुम्ही पाहिलंच की आता समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या घरांच्या भिंतीतून लक्ष्मी (पैसै) बाहेर पडू लागली आहे. तीन दिवसांपासून पैशांची मोजणी सुरू आहे. सर्व अधिकारी नोटा मोजून थकले आहेत आणि बबूआ (अखिलेश यादव) खिशात बाटली घेऊन फिरत आहेत.”