भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. एका पाठोपाठ एक निर्णयांचा धडाका लावल्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याच वेळी त्यांच्या धोरणावर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी टीकेचा भडिमार केला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती खराब झाल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले.

भाजपचे लोक मला नेहमी लक्ष्य करतात. माझ्या हिंदू असण्यावर देखील ते शंका घेत असतात. भाजपचे लोक मला हिंदूच समजत नाही असे ते उपरोधिकपणे म्हणाले. यापुढे मी जेव्हाही मंदिरात जाईल त्यावेळचा फोटो ट्विटरवर टाकणार आहे असे ते म्हणाले.

आदित्यानाथ यांनी सुरू केलेल्या अॅंटी रोमिओ स्क्वॅडबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ज्या प्रमाणे रोमिओचा प्रेमाखातर बळी गेला होता. त्याचप्रमाणे आदित्यनाथ यांच्या काळात अनेकांचा बळी जात आहे असे ते म्हणाले. रस्त्याने युवक-युवती जरी जात असले तरी त्यांच्याकडे संशयाच्या नजरेनी पाहिले जाते. त्यांना अपमानित केले जाते असे ते म्हणाले.  कुणी घरामध्ये जरी बसलेले असेल तरी त्याला घरात येऊन त्रास दिला जात आहे असे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी कानपूरमध्ये हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांना एका प्रेमी युगुलाला घरात घुसून त्रास दिला. त्या घटनेचा संदर्भ घेऊन ते बोलत होते.

काही राज्यांमध्ये बीफवर बंदी नाही परंतु उत्तर प्रदेशात बीफवर बंदी लादली जात आहे. बीफचा व्यवसाय केला म्हणून किंवा खाल्ले म्हणून अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य केले जाते. परंतु, बीफची निर्यात करणारे काही प्रमुख व्यापारी हे हिंदू आहेत याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे असे त्यांनी म्हटले. ही परिस्थिती सर्वांसमोर येणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. सत्तेमध्ये आल्यानंतर भाजपने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लोकप्रिय ठरला आहे. या निर्णयावर अखिलेश यादव यांनी टीका केली. हा निर्णय दिशाभूल करणारा असल्याचे ते म्हणाले. कर्जमुक्ती केवळ कागदावरच झाली आहे असे. प्रत्यक्षात यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल की नाही यावर शंकाच आहे असे ते म्हणाले.