Chief of Army Staff General Upendra Dwivedi: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले. १० मे रोजी शस्त्रविराम करण्यात आला असला तरी पाकिस्तानविरोधातले युद्ध संपलेले नाही, असे सूचक विधान भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले आहे. यासंबंधीचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. शुक्रवारी ‘ऑपरेशन सिंदूर: बिफोर अँड बियॉन्ड’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त बोलत असताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले.
प्रकाशन सोहळ्यानिमित्त बोलत असताना जनरल द्विवेदी म्हणाले, “शस्त्रविरामानंतरही पाकिस्तानविरुद्धचे युद्ध सुरूच राहिले. तुम्हाला वाटत असेल की, युद्ध १० मे रोजी संपले. पण नाही. ते त्यानंतरही चालू राहिले. कारण त्यानंतरही बरेच निर्णय घ्यावे लागले. यापुढील अधिक काही मला सांगता येणार नाही.”
१० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाला असला तरी त्यानंतरही सीमेपलीकडून नियंत्रण रेषा आणि जम्मू-काश्मीरवर गोळीबार सुरूच राहिला. सीमेपलीकडील पाक पुरस्कृत दहशतवाद थांबलेला नाही, असेही ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरचा नियंत्रण रेषेच्या परिस्थितीवर काय परिणाम झाला, यावर आताच भाष्य करणे खूप घाईचे होईल. कारण शस्त्रविराम होऊन फार काळ लोटलेला नाही. पाक पुरस्कृत दहशतवाद संपलेला नाही, असे मला वाटते. कारण नियंत्रण रेषेवर अजूनही घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहेच की, ऑपरेशन सिंदूरनंतर किती दहशतवादी मारले गेले आणि किती दहशतवादी पळून गेले.
लष्करप्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान सशस्त्र दलांमधील समन्वयाचे महत्त्वही अधोरेखित केले. ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय सैन्याच्या हालचालींना त्यांनी लयबद्ध लाट असे म्हटले. त्यावेळी प्रत्येकाला त्यांच्या आदेशांची कल्पना होती आणि त्याप्रमाणे ते योग्य दिशेने पावले टाकत होते, असेही लष्करप्रमुख द्विवेदी म्हणाले.
