Delhi-based YouTuber Namra Qadir Arrested: व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून ८० लाखांचा गंडा घालणाऱ्या युट्यूबर नामरा कादिरला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नामराला अटक केल्यानंतर कोर्टात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पोलीस या गुन्ह्यात सहभागी तिचा पती विराट बैनीवाल याचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका युट्यूबरने व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात कसं ओढलं?

नामरा कादिर सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. तिचे युट्यूबवर सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवरही तिला दोन लाखांहून अधिक जण फॉलो करतात. पण नामराचं खरं रुप तेव्हा समोर आलं, जेव्हा २४ नोव्हेंबरला एका व्यावसायिकाने गुरुग्राममधील सेक्टर ५० येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

नामराने आपली ८० लाखांची फसवणूक केली असून, तिचा पती विराटही यात सहभागी असल्याचं व्यावसायिकाने पोलिसांना सांगितलं. बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्यांनी हे पैसे वसूल केले असल्याची तक्रार त्याने दिली. “मी कामाच्या निमित्ताने नामरा कादिर नावाच्या मुलीला रेडिसन हॉटेलमध्ये भेटलो होतो. ती एक युट्यूबर असून, तिचे व्हिडीओ मी पाहिले आहेत. तिने विराट बैनीवालशीही माझी भेट करुन दिली होती. तोदेखील एक युट्यूबवर आहे. त्यांना माझ्या कंपनीसाठी काम करण्यासाठी होकार दिला आणि दोन लाखांची अतिरिक्त रक्कम मागितली”.

“मी नामराला ओळखत असल्याने त्याच दिवशी दोन लाख रुपये दिले. नंतर जेव्हा मी त्यांच्यासाठी एक जाहिरात घेऊन आलो, तेव्हा त्यांनी होकार दिला आणि ५० हजार मागितले. मी ते पैसेही त्यांना दिले. पण त्यांनी माझं काम केलं नाही. नामराने मला सांगितलं की, मला तुम्ही आवडत असून, तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. आपल्या बहिणीच्या लग्नानंतर हे पैसे आपण परत करु. मलाही ती आवडली होती. आम्ही बाहेर फिरु लागलो होतो. यावेळी विराट आमच्यासोबतच असायचा. एक दिवस आम्ही क्लबमध्ये पार्टीसाठी गेलो असता, विराट आणि नामराने जबरदस्ती मला दारु पाजली,” अशी माहिती व्यावसायिकाने तक्रारीत दिली आहे.

धमकी देऊन लुबाडले ७० ते ८० लाख रुपये

व्यावसायिकाने पुढे सांगितलं की “आम्ही तिघांनी हॉटेलमध्ये रुम बूक केली होती. सकाळी उठल्यानंतर नामराने माझ्याकडे माझं कार्ड आणि घड्याळ मागितलं. जर मी विरोध केला, तर बलात्काराची तक्रार दाखल करणार अशी धमकी ती देऊ लागली. मी तिला वारंवार विनंती करत होतो, पण ती काही ऐकत नव्हती. यानंतर विराटने त्याच्याजवळ असणाऱं शस्त्र काढलं आणि आपण तिचा पती असल्याचं सांगितलं. आमचं म्हणणं ऐकलं नाही, तर पोलीस केसमध्ये अडकवणार अशी धमकी दिली. तेव्हापासून त्यांनी माझ्याकडून ७० ते ८० लाख लुटले असून, माझ्याकडे याचे पुरावेही आहेत”.

वडिलांनी दिला पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला

“नामराने माझा फोन घेतला आणि रिसेट करत सर्व पुरावे नष्ट केले. जेव्हा माझ्याकडचे पैसे संपले तेव्हा मी त्यांना आता मला त्रास देऊ नका अशी विनंती केली. पण त्यानंतरही ते मला धमकावत होते. त्यांनी मला वडिलांच्या खात्यातून पाच लाख रुपये काढायला लावले. वडिलांनी मला याचं कारण विचारलं, तेव्हा मी सांगितलं नाही. पण नंतर त्यांनी सर्व खाती तपासली, तेव्हा मात्र मी त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला. त्यांनी मला पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला,” अशी माहिती व्यावसायिकाने दिली आहे.

पोलिसांनी नामरा कादिरला अटक केली असून, जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान तिचा पती विराट सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtuber namra kadir arrested for extorting 70 lakh from businessman in delhi sgy