वारे बदलले की एक अख्खा ऋतू बदलतो. निसर्गचक्र पुढे सरकते. नवे वातावरण, शेती, जंगल, प्राण्यांवर त्याचे होणारे परिणाम सारे सारे बदलते. वारे बदलले, हा वाक्प्रचार उगीच रूढ नाही झाला. कधी आल्हाददायक, निसर्गाला नवचेतना देणारे हे वारे कधी कधी अगदी विध्वंसकही होतात. अशीच विध्वंसक वादळांना चक्रीवादळे असं म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्ग व मानवी साधनसंपत्तीची अपरिमित हानी करणाऱ्या या चक्रीवादळांचा धसका साऱ्या जगभर घेतला जातो. लोककथांचा तो अविभाज्य भाग झाला आहे. जागा बदलते तसे या चक्रीवादळांना वेगवेगळे नाव दिले जाते. अटलांटिक महासागर, मध्य व ईशान्य प्रशांत महासागर, कॅरेबियन समुद्र व मेक्सिकोच्या उपसागरात वादळ निर्माळ झाले की त्यांना हरिकेन म्हणतात. प्रशांत महासागराच्या वायव्येला निर्माण झालेल्या वादळाला टायफून म्हणतात, हिंदी महासागरात म्हणजे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील वादळांना उष्णकटिबंधीय वादळे म्हटले जाते. टोरनॅडो हा आणखी एक प्रकार. प्रचंड पाणी, बर्फ साठलेला ढग स्वत:भोवतीच गोलगोल फिरत खाली आला की त्याला टोरनॅडो म्हटले जाते. ढगफुटी आणि चक्रीवादळ यामधला हा प्रकार.

चक्रीवादळ का तयार होते?

एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे आपल्याकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यांदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात.

चक्रवादळाचा इशारा कधी दिला जातो?

वाऱ्यांचा वेग नेमका किती आहे त्यावरून त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे की वादळ ते ठरवले जाते. अर्थात जगभरातील वादळांसाठी हे निकष बदलतात. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते. पावसाळ्यात अनेकदा मुंबईच्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्यांचा वेग एवढा असतो. त्यापुढे वाऱ्यांचा वेग ताशी ५५ किलोमीटपर्यंत पोहोचला की त्याला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते. या क्षेत्रावर संबंधित देशांचे हवामानशास्त्र केंद्रे बारीक लक्ष ठेवून असतात. वाऱ्यांनी ६३ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते.

हे ही वाचा >> अम्फान चक्रीवादळ: देशातील आठ राज्यांना फटका बसण्याची शक्यता; अनेक राज्यांना ऑरेंज अलर्ट

वादळाचे प्रकार किती?

या वादळाचा मार्ग शोधण्याची यंत्रणा कामाला लागते. अर्थात वादळांमध्येही  मापदंड आहेत. वादळांचा वेग व त्यामुळे त्यांनी हानी करण्याची क्षमता यावरून त्यांना एक ते पाच या प्रकारात गणले जाते. ६३ किलोमीटर वेगाचे वादळ हे एक प्रकारात मोडते तर १२० किमी प्रति तास वेगाने वारे वाहू लागले की ते वादळे पाच या प्रकारात म्हणजे अतिसंहारक ठरते. ताशी ११९ ते १५३ किलोमीटर वेगाने वाहणारे हरिकेन हे सौम्य या प्रकारात तर २४९ किलोमीटर प्रति तास वेग गाठलेले हरिकेन पाचव्या गटात जाते. अर्थातच वादळांच्या वेगावरून त्यांच्या संहारक क्षमतेची तुलना करता येणार नाही. वादळाचा आकार आणि क्षमता, वादळाचा पुढे सरकण्याचा वेग, वारे वाहत असल्याचा काळ, वादळातील पाऊस पाडण्याची क्षमता आणि जमिनीवर टेकल्यावर त्याच्या दिशेत व क्षमतेत होत असलेला बदल यासोबतच वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या जमिनीवरील लोकवस्ती व आपत्कालीन यंत्रणा यामुळे वादळाची संहारक क्षमता ठरते.

नावे कशी देतात?

चक्रीवादळांची नावे हा आणखी एक औत्सुक्याचा विषय. नाव दिले की त्या वादळाशी निगडित माहिती मिळवणे व लक्षात ठेवणे सोपे जाते. विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुले, नद्य, विशेष शब्द, प्राणी यांची नावे वादळांना दिली जातात. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी वादळांची नावे ठरवली आहेत. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ही नावे ओळीने देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरच्या इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. काही ठिकाणी विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तीच नावेही दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात. जगभरातील वादळांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वादळाच्या बाहेरच्या बाजूचे वारे कितीही प्रचंड वेगाने फिरत असले तरी वादळाचे केंद्र मात्र शांत असते.

(मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are cyclones naming types causes and effects scsg
First published on: 15-05-2020 at 17:50 IST