Camphor Tree: सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात, मंदिरात तसंच विविध धार्मिक कारणांसाठी कापूर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक विधींमध्ये कापूर वापरला जातो. कापूरामध्ये अनेक औषधी गुणधर्म तसंच प्रदूषण कमी करणारे घटक असतात. कोरोना काळात कापूराने घरातील बॅक्टेरिया दूर करण्यासाठी अनेकांना मदत केली. कापूरावर काडी आदळली की क्षणाच्या आत तो पेट घेतो. कापूर पेटला की त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. पण तुमच्या देवघरात असलेला हा कापूर नेमका कसा तयार होतो किवा तो कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो आणि तो लगेच कसा पेट घेतो असे प्रश्न कधी तुम्हाला पडलेत का? याचं उत्तर ९९ टक्के लोकांना माहिती नसावे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊ…
कापूर कसा बनवला जातो?
बाजारात दोन प्रकारचे कापूर उपलब्ध आहेत. एक नैसर्गिक आणि दुसरा कृत्रिम कापूर. नैसर्गिक कापूर हा कापूराच्या झाडापासून तयार केलेला असतो. त्याचे वैज्ञानिक नाव ‘सिनामोमम कॅम्फोरा’ असे आहे. हे कापूराचे झाड ५० ते ६० फूट उंच म्हणजेच आंब्याच्या झाडाइतके वाढू शकते. ते १२ महिने हिरवेगार असते. हे झाड त्याच्या सोभवतालच्या अर्धा किलोमीटर परिसरातील हवा शुद्ध करते. झाडाच्या सर्व भागात तेल असते. आपल्या देशात पूर्वी ही झाडे मोठ्या प्रमाणात होती, मात्र आता ती दुर्मीळ होत चालली आहेत. त्याची पानं गोल आणि ४ इंच रूंद असतात.
कापूर झाडाच्या सालीपासून तयार केला जातो. झाडाची साल सुकल्यावर त्याचा रंग तपकिरी-राखाडी होतो. त्यानंतर साल झाडापासून वेगळी केली जाते. ही साल नंतर गरम करून शुद्ध केली जाते आणि त्याची बारीक पावडर तयार केली जाते. तोच असतो कापूर.
कापूराचे झाड कुठे आढळते?
कापूराचे झाड प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये म्हणजेच चीनमध्ये आढळते. या झाडाचे मूळ जपानमध्ये आहे. चीनमध्ये ते लोक औषधांमध्ये वापरतात. त्यानंतर कापूर हळूहळू जगभरात लोकप्रिय झाला.
कापूर भारतात कसा आला?
१९३२च्या एका संशोधनात, कोलकाता इथल्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनचे आर. एन. चोप्रा आणि बी. मुखर्जी यांनी असे नोंदवले की १८८२-१८८३ दरम्यान लखनऊच्या बागायती बागांमध्ये कापूराची लागवड यशस्वी झाली. मात्र ते फार काळ टिकले नाही. काही वर्षांनंतर कापूराच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड होऊ लागली. भारतात कापूर दोन्ही पद्धतीने तयार केला जातो. नैसर्गिक कापूर पश्चिम घाट, पूर्व हिमालय आणि अंदमान बेटांसारख्या भागात कापूर वृक्षांच्या लागवडीपासून मिळवला जातो. भारतातील अनेक कंपन्या यासाठी कापूर वृक्षाची लागवड करतात.
कापूर का पेटतो?
कापूरामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे तो खूप कमी प्रज्वलन तापमान देतो. म्हणजेच तो खूप कमी उष्णतेने जळू लागतो. त्याची वाफ हवेतून वेगाने पसरते आणि वातावरणातील ऑक्सिजनशी संपर्क झाल्यावर तो सहज पेट घेतो.
