जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ मिळविलेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितंसिह डिसले यांनी अध्ययनासाठी मागितलेली रजेचे प्रकरण सध्या चर्चेत आहेत. डिसले गुरूजींना आपण राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहोत असेही म्हटले आहे. दरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही रजा मंजूर केली असून या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. मात्र नेमका हा वाद का सुरु झाला आणि प्रशासन आणि डिसले गुरुजी यांची भूमिका का होती हे जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिसले गुरुजींच्या रजेमुळे मुख्य शिक्षणाच्या कामावर होणाऱ्या परिणामांसोबत या अवांतर गोष्टींतून परितेवाडी शाळेत काय बदल झाला, योगदान मिळाले याचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी रणजित डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले. डिसले गुरुजी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला. त्यामुळे डिसले गुरुजींवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे असं शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटले होते.

अमेरिकेतील सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे. याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर डिसले गुरुजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भेटीला गेले होते तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितले गेलं आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आले.

रणजितंसिह डिसले यांनी ‘डाएट’ (जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था) योजनेंतर्गत दोन वर्षे प्रतिनियुक्तीवर सोलापूर व वेळापूर येथे शिक्षण प्रशिक्षण विभागात विशेष शिक्षक म्हणून सेवेत होतो, असा दावा केला असला तरी प्रत्यक्षात ते गैरहजर होते. तसा अहवाल प्राप्त झाला आहे. अशाप्रकारे गैरहजर राहणे गंभीर तर आहेच, परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान करणारेही आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होऊन पुढील कारवाई होणार आहे, असे सोलापूर जि़ प़ चे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सांगितले.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना डिसले गुरुजींनी अधिकाऱ्यांविरोधात आपला रोष व्यक्त केला. “राज्यपालांशी थेट संपर्क साधला याचा राग त्यांनी मनात धरला होता. राज्यपालांशी थेट संपर्क केल्यानंतर अधिकाऱ्यानी थेट तुझा वारे गुरूजी करू असा निरोप दिला होता. त्यामुळे अशा वातावरणात या व्यवस्थेत राहणे शक्य नाही. झोपही शांत लागत नाही. घरी सगळ्यांळी चर्चा केली. त्यामुळे या व्यवस्थेतून बाहेर पडायचे ठरवले आहे. सतत होणाऱ्या आरोपामुळे व्यथित असून वारे सर होण्याअगोदर बाहेर पडणार आहे,” अशी प्रतिक्रिया डिसले गुरुजींनी एबीपी माझासोबत बोलताना दिली होती.

दरम्यान, डिसले गुरुजींच्या संशोधन रजेचा मार्ग मोकळा झाला आहे. सोशल मीडियासह सर्वच स्तरामध्ये चर्चा सुरु झाल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात लक्ष घालत रजा मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत. सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित डिसले यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे, असे वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained global teacher ranjitsingh desale research work trouble government officer abn