प्रत्येक समाजात लग्नाबाबत अनेक रूढी-परंपरा आहेत. ज्या प्रत्येक लग्नसमारंभात पाळल्या जातात. यासाठी कुटुंबातील थोरा-मोठ्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. हिंदू धर्मात लग्न समारंभात अनेक विधी असतात. त्या विधींनुसार लग्नसमारंभ पार पडतो. यात लग्नापूर्वी वधू-वराला हळद लावण्याची एक प्रथा पार पूर्वीपासून चालत आली आहे. वधू-वराने एकमेकांसोबत कायमची लग्नगाठ बांधण्याआधी हळदीचा सोहळा केला जातो. हा सोहळा काही जण अगदी थाटामाटात करतात. ज्यात वधू-वराला हळद लावून झाल्यानंतर कुटुंबातील लोकही एकमेकांना हळद लावून आनंद घेतात. पण लग्नाआधी हळद लावण्याच्या प्रथेमागे केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक कारणेही दडलेली आहेत. काय आहेत ही कारणे? जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हळदी समारंभाने होते लग्नाची सुरुवात

लग्नाची तयारी ही हळदी समारंभाने खऱ्या अर्थाने सुरू होते. प्रत्येक समाजात आपल्या परंपरेनुसार हा हळदी समारंभ होतो. काही समाजांत लग्नाआधी तीन दिवस नवरा-नवरीला त्यांच्या घरी हळद लावली जाते. काही ठिकाणी लग्नाच्या एक दिवस आधी हळद लावली जाते. अनेकदा लग्नाच्या मुहूर्ताच्या काही तास आधी वधू-वराला मांडवात हळद लावली जाते.

लग्नाआधी हळद लावण्याचे धार्मिक कारण काय आहे?

हिंदू धर्मात विवाह हे एक पवित्र बंधन मानले जाते. ज्यात देव-देवतांच्या आशीर्वादाने नवीन जोडपे आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करते. हिंदू धर्मानुसार, देवतांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी हळद अर्पण केली जाते, विशेषतः पिवळा रंग भगवान विष्णूला खूप प्रिय आहे, म्हणून त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून हळद अर्पण केली जाते, असे मानले जाते. हिंदू धर्मातील कोणत्याही शुभ कार्यात हळद निश्चितपणे वापरली जाते. यात लग्नाआधी हळदीचा विधी केल्याने लग्नात येणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरते, असा एक समज आहे. याशिवाय पिवळा रंग वैवाहिक जीवनात समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. या प्रथेने वधू-वरांच्या भावी आयुष्यात सुख-शांती नांदते, असाही एक समज आहे.

हळद लावण्यामागे शास्त्रीय कारण काय आहे?

वैज्ञानिकदृष्ट्या, प्राचीन काळापासून हळदीचा वापर हा एक औषधी पदार्थ म्हणून केला जात आहे. ज्यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक असे अनेक गुणधर्म आहेत. हळदी समारंभात वधू-वराच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर हळद लावल्याने त्यांच्या त्वचेचा रंग उजळतो आणि शरीर डिटॉक्स राहते. यामुळे त्यांना कोणताही संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. याशिवाय असे म्हटले जाते की, पूर्वी ब्युटी पार्लरसारख्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे वधू-वरांच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी हळदीचा वापर केला जात असे. हळदीमुळे लग्नाच्या दिवशी वधू-वराच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही.)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Haldi ceremony what is the reason of applying turmeric haldi before marriage sjr