कोरोना काळात ऑनलाइन फ्रॉडच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीय. यासाठी गुन्हेगार केवळ फोन कॉल नाही, तर अगदी जी मेल आणि आउटलुकचा देखील वापर करत आहेत. त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. नुकताच एक ई-मेल घोटाळा समोर आलाय. यात गिफ्ट कार्ड देण्याचं आकर्षक आमिष दाखवून लोकांची व्यक्तिगत माहिती गोळा करण्यात आली आणि संबंधितांच्या खात्यावरून पैसे चोरण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑनलाईन चोरट्यांची पद्धत काय?

ऑनलाईन घोटाळेबाज सुरुवातीला लोकांना जी-मेल किंवा आऊटलूकवर ई-मेल पाठवतात आणि सर्व्हेत सहभागी होण्यास सांगतात. याशिवाय काही अज्ञात लिंकवरही क्लिक करुन व्यक्तिगत माहिती मागतात. विशेष म्हणजे हे ई मेल इतके सराईतपणे लिहिलेले असतात की अनेकांना त्यावर संशय देखील येत नाही. चांगली इंग्रजी, ईमेलचं उत्तम डिझाईन आणि ब्रँडेड लोगोंचा वापर केला जातो. अनेकजणांना या ई मेलचा संशय येत नाही आणि इथंच या चोरट्यांचं फावतं.

मेलमधील संशयास्पद लिंकवर क्लिक करताना सावधान

या मेलला फसलेले लोक मेलमधील अज्ञात लिंकवर क्लिक करतात आणि आपली व्यक्तिगत माहिती देतात. मेलमधील गिफ्ट कार्ड्सचा लाभ घेण्यासाठी सर्वसामान्यांना एका छोट्या सर्वेक्षणात सहभागी होण्यास सांगितलं जातं. जे लोक मेलमधील संशयास्पद लिंकवर क्लिक करतात ते एका वेगळ्याच वेबसाईटवर जातात. ती वेबसाईट बनावट असते. तेथे व्यक्तिगत माहिती देऊनही संबंधितांना कोणतंही गिफ्ट मिळत नाही.

३ महिन्यांपूर्वी जूनमध्ये पहिला घोटाळा समोर

एक्सप्रेस यूकेने दिलेल्या वृत्तानुसार, अशाप्रकारचा पहिला घोटाळा ३ महिन्यांपूर्वी जुनमध्ये समोर आला होता. यात लोकांना जीबीपी 90 गिफ्ट कार्ड देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्यासाठी आधी एका सर्वेक्षणात सहभागी होण्यास सांगण्यात आलं. त्यात आपल्या उत्तम भाषा आणि शब्दफेक करत समोरच्या व्यक्तीकडे त्यांचे लॉगइन आयडी आणि पासवर्ड मागितले जातात.

या फसवेगिरीपासून कसं सुरक्षित राहाल?

या फसवणुकीपासून वाचायचं असेल तर आपल्या बुद्धी आणि विवेकाचा उपयोग करत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. योग्य माहिती अभावी अनेकजण अशा घोटाळ्यांचे बळी ठरतात. त्यामुळे खालील गोष्टींची विशेष काळजी घ्या.

१. कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.

२. अज्ञात मेलवरील अटॅचमेंट फाईल डाऊनलोड करू नका किंवा ओपन करू नका.

३. संशयास्पद लिंकने सुरू होणाऱ्या गूगल फॉर्म्स किंवा वेबसाईट्सवर तुमची खासगी माहिती देऊ नका. विशेष करून जेव्हा तुमच्याकडे तुमचा आधार नंबर, पॅन नंबर, बँक खाते क्रमांक, पिन, ओटीपी, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर किंवा कार्ड मागील ३ अंकी सीव्हीव्ही नंबर मागितला जाईल तेव्हा सावध व्हा आणि अशी कोणतीही माहिती देऊ नका.

४. सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी तुमचा मेलआयडी आणि पासवर्ड मागितला तर चुकूनही माहिती देऊ नका.

हेही वाचा : ऑनलाइन व्यवहारातील फसवणूक : रिझव्‍‌र्ह बँकेकडून लवकरच नियमावली

फसवणुकीची किंवा घोटाळ्याची जीमेलवर तक्रार कशी करणार?

तुम्हाला जीमेलवर असा फसवणुकीचा मेल आला असेल तर तात्काळ त्या मेलमध्ये रिपोर्ट पर्यायाचा वापर करुन “रिपोर्ट फिशिंग”वर क्लिक करा.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in online fraud through gmail and outlook know how to prevent cheating pbs
First published on: 11-10-2021 at 19:13 IST