What Is Kelvan: घरात एखादे लग्नकार्य असेल की हमखास केळवणाची आमंत्रणे मिळतात. यापूर्वी केवळ नवरीचे केळवण करण्याची पद्धत होती त्याचे कारण आपण लेखात पुढे पाहूया, मात्र आता अनेकदा लग्नाआधी नवरा नवरी दोघांनाही मित्रमंडळी, आप्तेष्टांकडून केळवणाचे आमंत्रण दिले जाते. काही ठिकाणी तर वर- वधूच्या आई वडिलांना सुद्धा आग्रहाने बोलावले जाते. या केळवणासाठी गडगनेर असा दुसरा शब्दही आहे. गडगनेर म्हणजे काय तर, गडू आणि नीर यापासून हा शब्द बनला आहे. गडू म्हणजे पाण्याचा तांब्या आणि नीर म्हणजे पाणी. गडगनेर म्हणजे नुसतेच तांब्याभर पाणी नव्हे तर पाहुण्यांसाठी मेजवानी, अशा अर्थाने तो वापरला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. उमेश करंबेळकर यांच्या लेखात केळवणाच्या संदर्भात अनेक दाखले दिसून येतात. ते सांगतात की, केळवण म्हणजे काळजी घेणे किंवा काळजीपूर्वक सांभाळणे, असाही एक अर्थ आहे. केळीची लागवड केल्यास त्या पिकाची नीट मशागत करावी लागते. काळजी घ्यावी लागते. नाहीतर केळीची रोपे सुकून जातात. त्यामुळे लग्न ठरलेल्या वधूची माहेरी ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते, त्याप्रमाणे ती सासरीही घेतली जावी, हा कदाचित केळवणामागील मूळ उद्देश असावा.

केळवण झालेल्या मुलीला केळवली असे म्हणतात. अशा मुलीला सासरचे वेध लागलेले असतात. इतके दिवस माहेरात गुंतलेले तिचे मन आता सासरी धाव घेऊ लागते. ती माहेराविषयी उदासीन राहू लागते. केळवली नवरीची ही भावावस्था स्वत: ज्ञानेश्वरांनी एका ओवीत टिपली आहे. ज्ञानी व्यक्तीचे वर्णन करताना ते म्हणतात, केळवली नवरी माहेराविषयी जशी उदासीन असते, तसा ज्ञानी माणूस जगण्याविषयी उदासीन असतो. न मरताच तो आपल्या अंत:करणाला मृत्यूची सूचना देतो. ती ओवी अशी –

ना तरी केळवली नोवरी।

कां संन्यासी जियापरी।

तैसा न मरतां जो करी।

मृत्युसूचना।

हे ही वाचा << आमंत्रण आलंय की निमंत्रण? लग्न समारंभाला जायचं की नाही ठरवण्यासाठी नेमका ‘या’ शब्दांचा अर्थ ओळखा

ज्ञानेश्वरांनी दिलेल्या या दाखल्यानुसार, त्यांच्या काळात किंबहुना त्याही आधी काही शतके केळवण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात रूढ होती एवढे मात्र दिसून येतं. मुख्य म्हणजे केळवण हा काही संस्कृतातून पुढे आलेले किंवा संकरित झालेला शब्द नाही. तो अस्सल मराठी आहे.

(वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is kelvan why kelvan is done before maharashtrian wedding why bride groom are called for mejwani kelvan ideas 2024 svs