तुम्ही तुमच्या कामात गढून गेला आहात. अशआतच तुमच्या फोनवर नोटिफिकेशन वाजतं. तुमचं कामातलं लक्ष फोनकडे वळतं. मग तुम्ही कसलं नोटिफिकेशन आहे? हे पाहण्यासाठी फोन हातात घेता, नोटिफिकेशन कसलं आहे ते पाहता. ते तुमच्या आवडत्या व्यक्तीचं आहे का? हे पण पाहता. त्यानंतर दुसऱ्या मेसेज नोटिफिकेशनची वाट बघता. पण तो मेसेज येत नाही. मग तुम्ही फोन खाली ठेवता. फोन पुन्हा डिंग होतो. मग पुन्हा डिंग होतो. तुम्ही सारखा सारखा फोन पाहू लागता. हे सगळं तुमच्याबाबतीतही घडतंय का? तुम्हालाही Notification Anxiety अर्थात नोटिफिकेशनची हूरहूर ग्रासते आहे का? तसं असेल तर काही सोपे उपाय तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

नोटिफिकेशन अँझायटी किंवा हूरहूर काय?

नोटिफिकेशन अँझायटीचा थोडक्यात अर्थ की आज मला मेसेज, मेल, पिंग, व्हॉट्स अॅप काहीच का आलं नाही? कसलंच नोटिफिकेशन का आलं नाही? त्यामुळे निर्माण होणारी अस्वस्थता. आपल्याला आपल्या स्मार्ट फोनची इतकी सवय झालेली असते की नोटिफिकेशन आलं नाही तरीही अस्वस्थ व्हायला होतं. सध्याच्या काळात एकमेकांशी संपर्क करण्याची साधनं स्मार्ट झाली आहेत आणि लोकांनाही पटापट उत्तर देऊन किंवा प्रत्युत्तरं देऊन मोकळं व्हायचं आहे. पण यामुळे लोकांचा ताण-तणाव वाढतो आहे. Thip.media च्या वृत्तानुसार लोकांमध्ये मोबाइल नोटिफिकेशन अँझायटी वाढते आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ . सुदेष्णा मुखर्जी सांगतात, “रोज जास्त प्रमाणावर नोटिफिकेशन येणं हे तुमच्या मनस्वास्थ्यावर परिणाम करणारं ठरु शकतं. ताण येणं, ती हूरहूर लागून राहणं या गोष्टी घडतात. मोबाइलला तुम्ही नियंत्रित करण्याऐवजी मोबाइल तुम्हाला नियंत्रित करु लागतो. त्यामुळे नोटिफिकेशनसाठीची अँझायटी किंवा हूरहूर वाढीला लागते. सोशल मीडियावरचे अपडेट्स, कामाचे इमेल आणि इतर मेसेज यांचे अलर्ट हे तुमच्या आयुष्यात एक प्रकारची घाई निर्माण करतात. अनेक लोक मोबाइल शिवाय राहू शकत नाहीत अशी आत्ताची स्थिती आहे. त्यामुळे नोटिफिकेशन सातत्याने तपासत राहणं हा एक प्रकारे त्यांचा छंद बनतो. यातूनच या अँझायटीला सुरुवात होते.”

सातत्याने येणारी नोटिफिकेशन मनावर कसा परिणाम करतात?

सातत्याने मेसेज येत आहेत का? अलर्ट येत आहेत का? हे पाहणं म्हणजे एक प्रकारे अँझायटीचाच भाग. यामुळे तुमचं मन एका अलर्टकडून दुसरीकडे जातं, दुसरीकडून तिसरीकडे आणि मग या साखळीत खंड पडत नाही. त्यामुळे अर्थातच तुमच्या कामावर त्याचा परिणाम होतो. Hyper Alertness वाढीला लागतो. ज्यामुळे तणाव वाढतो. त्यामुळे तुमच्याकडे जर सुट्टीचा वेळ किंवा फावला वेळ असेल तर त्यातही तुम्ही मोबाइलच चेक करत राहता. यापासून बचाव कसा करायचा हे पआण समजून घेऊ.

मोबाइल नोटिफिकेशन अँझायटीपासून बचाव कसा कराल?

ज्या गोष्टींची नोटिफिकेशन आवश्यक नाहीत ती अॅप्स सायलेंट मोडवर ठेवा

तुमचा फोन शक्यतो डू नॉट डिस्टर्ब मोडवर ठेवा, जेणेकरुन येणाऱ्या अलर्टचा तुमच्या कामावर परिणाम होणार नाही.

मेसेज किंवा कुठलाही अलर्ट पाहण्याची वेळ ठरवून घ्या, त्याशिवाय फोनकडे पाहूही नका.

सोशल मीडिया वापरण्याची वेळही ठरवून ठेवा, त्याचं काटेकोरपणे पालन करा.

शक्यतो झोपण्याच्या गादीपासून तुमचा फोन लांब ठेवा, तुमच्या आवडत्या लोकांशी गप्पा मारा, रात्री उशिराही फोन चेक करणं थांबवा.

मित्र, मैत्रिणी तसंच कुटुंबाला जास्त वेळ द्या. तुम्ही उपलब्ध नाहीत हे सांगणं सोडून द्या. उलट माणसांशी संवाद साधण्यात मन रमवा. या छोट्या गोष्टी पाळूनही तुम्ही मोबाइल नोटिफिकेशन अँझायटीपासून स्वतःला दूर ठेवू शकता.