जगाच्या पाठीवर विविध प्रदेशात मद्यप्रेमी वैविध्य असलेले मद्य पितात. त्यात व्हिस्की, स्कॉच, राई व्हिस्कीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. या मद्याच्या विविध प्रकारांचे सेवन करण्याच्या अनेकांच्या पद्धती ठरलेल्या असतात. त्यातच व्हिस्की हा प्रकार असेल तर तो कोणी बर्फाबरोबर घेत कोणी विविध शीतपेयांबरोबर घेत. विस्कीच्या सेवनाचे निरनिराळे प्रकार आहेत तसेच मद्यात व्हिस्कीशी साधर्म्य असणाऱ्या राई व्हिस्की, स्कॉच असे अनेक प्रकार आहेत. यातील नेमका फरक कसा ओळखावा हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. आज आपण मद्याचे हे प्रकार तयार करण्याची प्रक्रिया, त्यात वापरले जाणारे प्रकार, त्याची चव आणि रंग यावरून या तिघांमध्ये काय फरक आहे हे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिस्की म्हणजे काय?

बार्ली, मक्याचं पीठ, राई (गव्हाशी साधर्म्य असणारं धान्य), गहू यांसारख्या धान्यांपासून बनवलेलं हे एक मद्य आहे. हे धान्य आंबवून नंतर डिस्टिल केले जाते. डिस्टिल प्रक्रिया केल्यानंतर व्हिस्की अनेक वर्षे लाकडी पिंपात ठेवली जाते. या प्रक्रियेमुळे व्हिस्कीला खास चव आणि रंग मिळतो. सुरुवातीला पारदर्शक असलेला हा दारूचा प्रकार हळूहळू तपकिरी रंगाचा होतो.

स्कॉच म्हणजे काय?

स्कॉटलंडमधील ‘स्कॉच’ हा १५व्या शतकापासून प्रचलित असलेला प्रकार आहे. मुख्यतः माल्टेड बार्लीपासून तयार होणाऱ्या या व्हिस्कीमध्ये ग्रेन व्हिस्कीचा सुद्धा समावेश होऊ शकतो. स्कॉचला त्याचा अनोखा रंग आणि चव त्याच्या विशिष्ट डिस्टिलिंग प्रक्रियेनंतर आणि लाकडी पिंपात (ओक कास्क्समध्ये )ठेवण्याच्या प्रक्रियेमुळे मिळते.

स्कॉचचे मुख्य दोन प्रकार आहेत.

१. सिंगल माल्ट्स – एका डिस्टिलरीमध्ये तयार केलेली व्हिस्की.
२. ब्लेंड्स – वेगवेगळ्या डिस्टिलरींच्या व्हिस्की मिक्स करून तयार केलेली व्हिस्की.

बॉर्बन म्हणजे काय?

बॉर्बन हा एक विशिष्ट अमेरिकन मद्यप्रकार आहे, ज्यामध्ये किमान ५१% मक्याचे पीठ वापरले जाते. त्यामुळे याला व्हॅनिला आणि कॅरामेलसारखी खास गोडसर चव मिळते. जळलेल्या नवीन ओक लाकडी पिंपातील ही व्हिस्की दोन वर्षे ठेवली जाते. ओल्ड फॅशन आणि मिंट जूलिप यांसारख्या कॉकटेल्समध्ये बॉर्बनचा वापर होतो. याशिवाय, सॉस, ग्लेझ आणि डेसर्टमध्येही बॉर्बन वापरला जातो.

राई व्हिस्की म्हणजे काय?

बॉर्बनच्या तुलनेत अधिक तिखट आणि मसालेदार चव देणारी राय व्हिस्की हा अमेरिकन प्रकार आहे. यामध्ये किमान ५१% राय धान्याचा वापर केला जातो. मॅनहॅटन आणि सॅझरॅक यांसारख्या कॉकटेल्ससाठी राय व्हिस्की उत्तम मानली जाते.

फरक काय?

स्कॉच – स्कॉटलंडचा प्रकार, माल्टेड बार्लीपासून तयार होतो. चव धुरकट आणि खोलसर असते.
बॉर्बन – अमेरिकन प्रकार, मक्याच्या अधिक प्रमाणामुळे गोडसर चव असते.
राई व्हिस्की – अमेरिकन प्रकार, राय धान्यामुळे मसालेदार आणि तिखटसर चव देते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whisky scotch bourbon rye what is the difference between these four alcohol psg