Peacock dancing Reason: आजपर्यंत आपल्यापैकी अनेकांनी कथा, कविता, चित्रपटांमध्ये किंवा प्रत्यक्षातही पाऊस पडण्याचा संकेत मिळताच मोरांना पिसारा फुलवून नाचताना पाहिले असेल. पौराणिक काळातही अनेक कवी आणि लोकगीतांमध्येही याचा उल्लेख आहे. मोरांचे नृत्य हे पावसाचे लक्षण आहे, असे मानले जाते. पण हे खरे आहे की, फक्त ही एक कल्पना आहे? या बातमीच्या माध्यमातून त्याबाबत जाणून घेऊ

मोर का नाचतात?

मोर पावसाच्या आगमनाचे संकेत देण्यासाठी पिसारा फुलवून नाचत नाहीत. खरं तर, मोरांचा मिलन काळ वसंत ऋतूपासून पावसाळ्यापर्यंत असतो. म्हणजेच मार्च ते सप्टेंबर महिना हा मोरांचा मिलन काळ असतो. म्हणून मादीला आकर्षित करण्यासाठी मोर त्यांचा पिसारा फुलवून नाचतात. पण पावसाळाही याच महिन्यांत येतो आणि लोकांचा असा विश्वास आहे की, मोरांचे नृत्य हे पावसाचे लक्षण आहे. म्हणूनच हिवाळ्यात किंवा शरद ऋतूमध्ये मोरांचे हे वर्तन दिसून येत नाही.

लांडोरीला आकर्षित करण्यासाठी नृत्य

या हंगामात, मोर लांडोरीभोवती नाचतात, जेणेकरून तिला आकर्षित करता येईल. लांडोरीला कोणताही मोर तिचा मिलन जोडीदार म्हणून निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणूनच ती मोराच्या हालचालींचे काळजीपूर्वक निरीक्षण करते, जेणेकरून ती स्वतःसाठी जोडीदार निवडू शकेल आणि येणारी संतती जगण्यासाठी योग्य असेल.

मोर मादीला आकर्षित करण्यासाठी आपला सुंदर पिसारा पसरवून, तिच्याभोवती फिरतो. हा त्यांच्या मिलन प्रक्रियेचा एक सामान्य टप्पा आहे. जसे इतर प्राणी आणि पक्षी मादीला मिलनासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तसेच मोरदेखील नाचतात आणि मोरणीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.