Why medicines tests bitter: औषधांची चव कडू का असते, असा प्रश्न अनेकांना पडतो. आरोग्य सुधारण्यासाठी घेतली जाणारी गोळी किंवा सिरप चवीला इतकी नकोशी का असावी याचं नवल वाटतं. पम तुम्हाला ठाऊक आहे का की, याचं मूळ निसर्गात आहे. बहुतांश औषधं ही झाडं, वनस्पती किंवा प्रवाळासारख्या समुद्री जीवांपासून प्रेरित असतात. हे जीव स्वतः हालचाल करू शकत नसल्याने ते संरक्षणासाठी विषारी रसायनं तयार करतात. हीच रसायनं मानवासाठी तयार केल्या जाणाऱ्या औषधांचे मूळ बनली.

कडू चवीमागे नेमकं कारण काय?

माणसाने या रसायनांची ओळख पटवण्यासाठी ‘कडूपणा जाणवण्याची क्षमता’ विकसित केली. त्यामुळे कडू चव ही शरीराला दिलेली नैसर्गिक चेतावणी आहे. हा पदार्थ शरीराच्या रासायनिक समतोलात बदल करू शकतो याची चेतावणी असते.

विज्ञानाने या नैसर्गिक संयुगांचा अभ्यास करून त्यांचा सुरक्षित उपयोग औषधनिर्मितीत केला. काही औषधं जशीच्या तशी वापरली जातात, जसं की पेनीसिलिन आणि मॉर्फिन, तर काहींची रासायनिक रचना थोडी बदलली जाते आणि त्यामुळे ती प्रभावी आणि सुरक्षित ठरतात.

औषधात सक्रिय घटकासोबतच चव, स्थैर्य आणि आकार नियंत्रित करणारे निष्क्रिय घटकही असतात. त्यात स्वाद सुधारक घालून कडूपणा कमी करता येतो, पण रुग्ण औषध सहजपणे घेईल की नाही, हे केवळ चवीवर नाही, तर वास, पोत आणि दिसणं यावरही अवलंबून असतंच.

थोडक्यात सांगायचं तर, औषधाची चव कडू असली तरी त्याच्या मागे निसर्गाची लाखो वर्षांची बुद्धिमत्ता आणि विज्ञानाचं बारकाईनं केलेलं काम दडलं आहे. औषधं चवीला कडू असली तरी त्याच कडूपणातच आपलं आरोग्य लपलेलं असतं हे मात्र नक्की.