Vinesh Phogat Olympics disqualified: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट पॅरीस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. मात्र तिचे सामन्यापूर्वी वजन वाढल्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. आज (७ ऑगस्ट) विनेशचा अंतिम सामना अमेरिकेची कुस्तीपटू सारा हिल्डब्रँड बरोबर होणार होता. मात्र काही ग्रॅम वजन अधिक भरल्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले. आता ती रौप्यपदकासाठीही पात्र नसेल, असे सांगितले जात आहे. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटूंसाठी वजनाचे नियम नेमके काय असतात? हे जाणून घेऊ. हे वाचा >> Vinesh Phogat Olympics : विनेश फोगटची संघर्षमय कहाणी; आई ३२ व्या वर्षी विधवा, कर्करोग आणि समाजाशी एकटीने दिला लढा ऑलिम्पिकमध्ये कुस्तीसाठी वजनाचे नियम काय आहेत? ज्या दिवशी सामना आहे, त्या दिवशी सकाळी कुस्तीपटूंचे वजन तपासले जाते. प्रत्येक वजनी गटातील सामने दोन दिवसांत पार पाडले जातात. त्यामुळे कुस्तीपटूला अंतिम सामना किंवा त्यामधील सामन्यांसाठी दोन्ही दिवस वजन समान पातळीवर राखावे लागते. पहिल्यांदा वजन करताना कुस्तीपटूला ३० मिनिटांचा वेळ दिला जातो. कुस्तीपटू स्पर्धकांचे वजन त्यांच्या सिंग्लेटवर मोजले जाते. बाकी शरीरावर काहीही ठेवले जात नाही. तसेच खेळाडूंना कोणताही संसर्गजन्य आजार नाही, याचीही खातरजमा करावी लागते. तसेच त्यांची नखंही कापावी लागतात. दुसऱ्या दिवशी कुस्तीपटू सामना खेळत असताना सामन्याच्या १५ मिनिटे आधी पुन्हा वजन करण्यात येते. विनेश फोगटचे वजन ५० किलोच्या आत होते? मंगळवारी विनेश फोगटने तीन सामन्यात विजय मिळविला होता. २९ वर्षीय विनेश फोगटचे आधीच्या तीनही सामन्यात वजन ५० किलोच्या आत होते. विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात जपानच्या युई सुसाकीचा ३-२ असा पराभव करून मोठा धक्का दिला. चार वेळा विश्वविजेत्या सुसाकीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीतील जपानी कुस्तीपटूचा हा पहिलाच पराभव होता, ज्यामुळे विनेशचे यश आणखीनच खास झाले होते. संपूर्ण सामन्यात विनेश फोगट २-० ने पिछाडीवर सामना अवघ्या काही सेकंदांवर येऊन पोहोचला होता. विनेश पराभूत होणार असंच दिसत होतं, पण शेवटची १० सेकंदापेक्षा कमी वेळ बाकी असताना विनेशने सामना पालटला आणि ३-२ फरकाने दणदणीत विजय मिळवला. हे ही वाचा >> Paris Olympic 2024 Live, Day 12: टेबल टेनिस महिला संघाच्या सामन्यावर नजर; अविनाश साबळेची अंतिम फेरी आपल्या कारकिर्दीतले तिसरे ऑलिम्पिक खेळत असलेल्या विनेशने तिच्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला आणि शेवटच्या पाच सेकंदात जपानच्या चॅम्पियन कुस्तीपटूला नमवून दोन गुण मिळवण्यात यश मिळवले. जपान संघानेही या विरोधात अपील केले पण रेफ्रींनी व्हिडिओ रिप्ले पाहिल्यानंतर तो फेटाळला, त्यामुळे विनेशला आणखी एक गुण मिळाला आणि तिने ३-२ असा विजय मिळवला. यानंतर युक्रेनची ओक्साना लिवाच हिचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. लिवाचने खूप प्रयत्न केले पण शेवटी विनेशने (Vinesh Phogat) आपली पकड मजबूत ठेवत विजय मिळवला. विनेशने उपांत्यपूर्व सामना ७-५ च्या फरकाने जिंकला.