जागतिक लोकसंख्या दिन जगभरात ११ जुलै रोजी साजरा करण्यात येतो. सध्या जगाची लोकसंख्या ही ७.७ अब्ज इतकी असून २०३० मध्ये ती ८.५ अब्ज तर २०५० मध्ये ती ९.७ अब्ज इतकी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या शतकाच्या अखेरपर्यंत जागतिक लोकसंख्या १०.९ अब्जचा टप्पा पार होईल असा अंदाज आहे. लोकसंख्या ही त्या- त्या देशाची ताकद असते असं म्हटलं जातं. लोकसंख्येचा आकार किती आहे याचा परिणाम एखाद्या देशाच्या विकासावरही होतो. आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांच्या विकासाला वाढत्या लोकसंख्येमुळे आळा बसल्याचाही दावा केला जातो. आपले भविष्य वाचवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात राहणे अतिशय गरजेचं आहे. यासाठी प्रत्येकाने योगदान द्यायला हवं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसा सुरु झाला हा दिवस?

११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्ज बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. त्या निमित्ताने संयुक्त राष्ट्राने याची दखल घेऊन १९८९ सालापासून हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने डिसेंबर १९९० च्या ४५/२१६ च्या ठरावानुसार जास्त लोकसंख्येच्या परिणामाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला गेला. १९९० मध्ये हा दिवस ९० देशांनी साजरा केला.

का साजरा केला जातो हा दिवस?

वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोकसंख्येच्या संबंधित विषयावर चर्चा केली जाते. तसेच काही कार्यक्रमही आयोजित केले जातात. यामध्ये कुटुंबनियोजन, गरीबी, लैंगिक समानता, मानसिक आरोग्य, नागरी अधिकार आणि इतरही विषयही असतात.

लोकसंख्येचा डेटा

जनगणनेसोबत विविध माध्यमांद्वारे लोकसंख्येविषयी डेटा जमवला जातो. उदाहरणार्थ स्त्री-पुरुष संख्येचे गुणोत्तर, जन्मदर, मृत्युदर, आरोग्य इत्यादी. या सर्व माहितीचा देशाच्या नियोजनासाठी उपयोग होतो.

वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम

बेरोजगारी – लोकसंख्या वाढल्याने लोक रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या शहरांकडे वळू लागले. नोकरीच्या संधी कमी झाल्याने बेरोजगारी वाढूही लागली. परिणामी गरिबीमध्येही झपाट्याने वाढ होऊ लागली.

रोगराई – वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्याच्या सोयी देखील अपुऱ्या पडू लागल्या आहेत. साथीचे रोग मोठ्या प्रमाणात पसरू लागलेले दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World population day 2021 know history significance and theme for this year ttg