World Wildlife Day 2024 : आपल्या भारत देशात लोकसंख्येची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशात राहणाऱ्या नागरिकांसाठी राहण्याच्या सोई-सुविधांपासून ते इतर सर्व गोष्टींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये मोठमोठ्या इमारतींची बांधकामे, रस्त्यांचे रुंदीकरण, नवनवीन रस्ते, पूल यांची बांधकामे यांसारख्या बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. मात्र, याचा खूप मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम आपल्या देशातील वन्यजीवांवर होत आहे. आपण वन्यप्राण्यांच्या घरांचे म्हणजेच जंगलांचे नुकसान करीत आहोत. इतकेच नाही, तर यामुळे आपण पर्यावरणही धोक्यात आणत आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, काही दिवसांपूर्वीच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाऊंडेशन्सकडून ‘वंतारा’ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. “या प्रकल्पांतर्गत आम्ही वन्यजीवांचे संवर्धन, दुर्मीळ प्राण्यांचे जतन, उपचार करण्यावर भर देणार आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये या प्रकल्पामध्ये जवळपास २०० जखमी हत्तींवर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आले आहेत,” अशी माहिती अनंत अंबानी यांनी दिली होती. मात्र, तुम्हाला माहीत आहे का की, भारतात वन्यजीवांपैकी काही प्राणी हे पुढच्या काही वर्षांमध्ये लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची माहिती पाहू.

हेही वाचा : हत्तीची स्मशानभूमी? खरंच हा बुद्धिमान प्राणी शेवटचा श्वास घेण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जातो? जाणून घ्या…

भारतातील धोक्यात असणारे वन्यप्राणी

१. वाघ [बंगाल टायगर]

जगातील एकूण वाघांपैकी जवळपास अर्ध्याहून अधिक वाघ हे बंगाल टायगर आहेत. त्यापैकी ७० टक्के वाघ हे भारतात राहतात. खारफुटी आणि पाणथळ प्रदेशांसह उष्ण किंवा थंड तापमान अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये राहू शकणाऱ्या या बंगाल वाघांची संख्या मात्र गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे. याचे कारण म्हणजे अनेक वर्षांपासून या वाघांची त्यांच्या कातड्यासाठी शिकार होत आहे. इतकेच नाही, तर शहरीकरण हेदेखील त्याचे कारण आहे. या सर्व कारणांमुळे जंगलात या वाघांची संख्या केवळ दोन हजार इतकीच राहिली आहे.

२. सिंह [एशियाटिक लायन]

आशियाई सिंह हे आफ्रिकन सिंहांच्या तुलनेत १०-२० टक्के लहान आकाराचे असून, त्यांची शेपूट लांब असते. आशियाई सिंह हे साधारण दक्षिण-पश्चिम आशिया ते पूर्व भारतापर्यंत आढळत असत. मात्र, आता या सिंहांच्या प्रजाती केवळ भारतातील गीर राष्ट्रीय उद्यान आणि गुजरातमधील वातावरणापुरती मर्यादित राहिल्या आहेत. २०१० सालापासून इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN)द्वारे लुप्तप्राय प्रजाती म्हणून घोषित करण्यात आलेल्या या प्रजातींची संख्या केवळ ५०० ते ६५० इतकीच राहिली आहे.

हेही वाचा : माकडांपासून ते माश्यांपर्यंत ‘या’ प्राण्यांनी केला आहे अंतराळ प्रवास! जाणून घ्या ‘ही’ रंजक माहिती….

३. काळवीट

काळविटांच्या शिकारीमुळे या प्राण्यांच्या प्रजाती आता सर्वाधिक लोप पावणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहेत. १९४७ साली जवळपास ८० हजार इतकी संख्या असलेल्या या काळविटांची संख्या २० वर्षांमध्ये तब्ब्ल आठ हजारांपर्यंत आली आहे, असे समजते. काळवीट हा प्राणी संपूर्ण भारतात खुल्या गवताळ प्रदेशात, कोरड्या झाडांच्या प्रदेशात व विरळ जंगल असलेल्या भागात दिसू शकतो. या काळविटांची संख्या वाढावी म्हणून त्यांना अर्जेंटिना आणि युनायटेड स्टेट्समध्येदेखील पाठविण्यात आले आहे.

४. काश्मिरी सारंग हरीण [काश्मिरी रेड स्टॅग]

काश्मिरी रेड स्टॅग किंवा सारंग अनेक वर्षांपासून IUCN द्वारे गंभीरपणे धोक्यात असलेल्या प्राण्यांची प्रजाती म्हणून सूचीबद्ध केली गेली आहे. तसेच भारत सरकारच्या प्राण्यांच्या संवर्धनातील मुख्य १५ प्रजातींमध्ये या हरणांचा समावेश आहे. त्यामुळे दाचीगाम नॅशनल पार्कमधील १४१ चौरस किमी परिसरात या प्रजातींना ठेवण्यात आले आहे. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस सारंग हरणांची संख्या अंदाजे पाच हजार इतकी होती. परंतु, १९७० मध्ये ती चक्क १५० पर्यंत येऊन पोहोचल्याचे समजते आणि नंतर २०१५ मध्ये ११० ते १३० पर्यंत हा आकडा पोहोचलेला होता.

५. गवा

वन्य गुरांच्या कुटुंबातील सर्वांत मोठा व उंच असा भारतीय बायसन म्हणजेच गवा हा दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये आढळणारा प्राणी आहे. परंतु, मांस, शिंगे आणि औषधी उत्पादनांसाठी केल्या जाणाऱ्या शिकारीमुळे या प्राण्यांना धोका असल्याचे समजते. गवताळ प्रदेशांचा नाश होत असल्याने त्यांना आवश्यक खाद्याची होत असलेली टंचाई हेदेखील त्यामागे एक कारण आहे. मात्र, आता त्यांची संख्या ७० टक्क्यांहून अधिक कमी झालेली आहे. . गवा हा IUCN द्वारे असुरक्षित प्रजाती म्हणून सूचीबद्ध केली गेली आहे. तसेच, भारताच्या १९७२ वन्यजीव संरक्षण कायद्याद्वारे गवा संरक्षित केला गेला आहे.

असे हे भारतातील लोप पावू शकणारे, तसेच असुरक्षित असे पाच प्राणी आहेत, अशी माहिती ‘अर्थ डॉट ओआरजी’च्या एका लेखावरून मिळते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World wildlife 2024 five most endangered species in india check out this list dha
First published on: 02-03-2024 at 20:00 IST