पोटातलं पाणीही हलणार नाही असा मस्त आरामशीर प्रवास सर्वानाच हवाहवासा असतो. अशा प्रवासाची अनुभूती घ्यावी तर ती आरामदायी सेडानमध्येच. फियाटच्या नव्या लिनिया टी जेटने ही पूर्तता केली आहे. या नव्या रूपातल्या सेडानची टेस्ट ड्राइव्ह घेण्याची संधी नुकतीच लोकसत्ताला मिळाली. डोंबिवली ते अलिबाग आणि पुन्हा परतीचा प्रवास या साधारण २०० किमीच्या प्रवासात लिनियाच्या नव्या रूपाचा परिचय करून घेता आला. त्याचाच हा आढावा..

डोंबिवली ते अलिबाग.. फार नाही, पण साधारण २०० किमीचे हे अंतर. त्यात पनवेल ते वडखळ नाका हा प्रवास खडतर असाच. वाहतूक कोंडी ही या रस्त्याच्या पाचवीलाच पुजलेली. कारण मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम आणि उन्हाळी सुटीचा हंगाम यामुळे येथे जागोजागी वाहतूक कोंडीचा अनुभव येतो. अशा या रस्त्यावर फियाट लिनिया जेट ही नवीन सेडान चालवायला खरोखर मजा आली. गाडीच्या बाह्य रूपात फारसा बदल जाणवत नसला तरी तिचे अंतरंग कमालीचे बदलले आहे. मस्त आरामशीर प्रवासाची अनुभूती या प्रवासादरम्यान आली. 

गीअर्स :
पाच गीअर्स

इंजिन :
१.४ लिटरचे टबरे पेट्रोल इंजिन (डिझेल व्हेरिएंटमध्येही उपलब्ध)

रंग :
पांढरा, करडा, काळा

किंमत :
साडेसात ते नऊ लाख
(एक्स शोरूम किंमत)

अंतरंग
खरी मजा गाडीच्या बदलत्या अंतरंगात आहे. आत प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील बाजूला मध्यम आकाराचे तीन जण अगदी आरामात बसू शकतील एवढी जागा देण्यात आली आहे. शिवाय सेंट्रल एसी प्रकारामुळे मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही सुखद गारव्याचा अनुभव मिळू शकणार आहे.
गाडीच्या मागील दरवाजांनाच आतील बाजूने ऑडिओ सिस्टीम बसवण्यात आल्याने मागे बसणा-यांना त्यांच्या मागच्या बाजूला स्पीकर असण्यामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळाली आहे. मागील बाजूच्या सीटवर दोघांच्या मध्ये उघडबंद होणारा छोटासा प्लॅस्टिक प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासात कोल्ड्रिंक किंवा चहा-कॉफीपानासाठी त्याचा उपयोग चांगला होऊ शकेल.
गुडघ्यांना लागून एसीची हवा व त्यावर पाण्याची बाटली, मोबाइल किंवा तत्सम छोटय़ा वस्तू ठेवण्यासाठीही जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पुढील बाजूला म्हणजेच चालक व त्याच्या बाजूला बसणाऱ्याला प्रशस्त बूट स्पेस उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवाय रात्रीच्या अंधारात डॅशबोर्ड नारिंगी प्रकाशात न्हाऊन निघेल अशी प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे.
बाहेरील तापमान किती आहे, गाडीच्या आतील तापमान किती, पेट्रोल किती उरले आहे, उपलब्ध इंधनात गाडी किती अंतर चालू शकेल आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. शिवाय आरपीएम, स्पीडोमीटर वगरे नेहमीचीच फीचर्स आहेतच.
शिवाय सेंट्रल एसी, अपघातापासून बचाव करण्यासाठी एअर बॅग्ज, ब्ल्यू टूथ, अँटी ब्रेक सिस्टीम, ऑक्झिलरी इनपुट, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि रेन सेिन्सग वायपर्स आदी सुविधाही नव्या लिनियात आहेत. फॉग लॅम्प्स, हेड लॅम्प्स यांतही सुधारणा करण्यात आली आहे.

ग्राऊंड क्लीअरन्स
सद्यस्थितीतील सेडान प्रकारातील गाडय़ांचा ग्राऊंड क्लीअरन्स चांगलाच असतो. मात्र, जुन्या लिनियात हा थोडा कमी होता. त्यामुळे गतिरोधकावरून किंवा खड्डय़ांतून जाताना जुन्या लिनियाचा खालील भाग घासला जायचा, अर्थात तो फार काही गंभीर नव्हता. मात्र, नव्या लिनियात हा दोष काढून टाकण्यात आला आहे. नव्या लिनियाचा ग्राऊंड क्लीअरन्स सेडान प्रकाराला शोभेल असाच आहे.

लिनियाचा नवा अवतार
सातत्याने अद्ययावत होत असलेल्या भारतीय बाजारपेठेत दर दोन महिन्यांनी एक अशा सरासरीने नवनव्या सेडान दाखल होत असतात. फियाटही त्याला अपवाद नाही. फियाटच्या लिनिया आणि पुंटोला गेल्या दोन वर्षांपासून चांगली मागणी आहे. लिनिया तर दरवर्षी नवनव्या रूपात सादर होत असते. यंदाही दिल्लीच्या ऑटो एक्स्पोमध्ये तिचे नवे रूप सादर करण्यात आले. लिनियाचा हा नवा अवतार लोभस आहे असे म्हणायला हरकत नाही. बा रूपात फारसा बदल नसला तरी गाडीचा लूक बदलण्यात आला आहे. नव्या अद्ययावत धातूवर अत्याधुनिक रंगाची झालर, त्यात विस्तारित बॉनेट आणि मागील भागही थोडा वाढवण्यात आल्याने डिकी प्रशस्त झाली आहे. त्यात आठवडाभराचे प्रवासाचे सामान मावू शकेल एवढी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.