केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय हा पूर्ण तयारनिशी घेतला नव्हता, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती करतात. मात्र, हा निर्णय कोणतीही पूर्वसूचना न देता जाहीर केल्यामुळे मायावतींना त्यांच्याजवळील पैशाची योग्य व्यवस्था लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते सोमवारी उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील ओराई येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. नोटाबंदीचा निर्णय अचानक जाहीर केला यापेक्षा या अनपेक्षित घोषणेने तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, या गोष्टीवर मायावती यांचा आक्षेप आहे. त्यामुळे बहुजन समाज पक्षाच्या नावाचा अर्थ आता ‘बहनजी संपत्ती पार्टी’ असा झाल्याची खोचक टीका मोदी यांनी केली.
दरम्यान, यावेळी मोदी यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित करत बुंदेलखंडवासियांना साद घालण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशात बुंदेलखंडची परिस्थिती सर्वात वाईट आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता मुठभर लोकांच्या हाती एकटवली आहे. येथील पोलीस ठाणी म्हणजे राजकीय पक्षाची कार्यालये असल्यासारखी आहेत. ही पोलीस ठाणी समाजवादी पक्ष सत्तेत आला की त्यांचे किंवा बसपा सत्तेत आली तर त्यांचे पक्ष कार्यालय होऊन जाते. पोलीस ठाण्यात गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, स्त्रियांचे रक्षण झाले पाहिजे. मात्र, ते होताना दिसत नाही. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. बुंदेलखंडातील अनेक भागांमध्ये बाहुबलींकडून गरीबांच्या जमिनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्या जातात. परंतु, उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास बुंदेलखंडात बेकायदेशीरपणे जमिनी हडप करण्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडण्यात येईल. जमिनी हडप करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी विशेष सेलची स्थापना करण्यात येईल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.
Live Updates
जमिनी हडपणाऱ्या बाहुबलींना शिक्षा करण्यासाठी विशेष सेलची स्थापना केली जाईल- मोदी
उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आल्यास बुंदेलखंडमधील जमिनी हडपणाऱ्या बाहुबलींविरुद्ध मोहीम उघडण्यात येईल- मोदी
येथील बाहुबली लोकांच्या जमिनी बेकायदेशीरपणे हडप करतात- मोदी
ही परिस्थिती बदलली पाहिजे- मोदी
या ठिकाणची पोलीस समाजवादी पक्ष आणि बसप यांच्यापैकी ज्याचे सरकार येईल, त्यांचे पक्ष कार्यालय होऊन जाते- मोदी
उत्तर प्रदेशमधील सरकार मुठभर लोकांच्या हातात आहे- मोदी
गुजरातच्या कच्छ जिल्ह्याप्रमाणे बुंदेलखंडचा विकास होऊ शकतो- मोदी
हेतू चांगला असेल तर बुंदेलखंडचाही विकास होऊ शकतो- मोदी
सरकार हे गरीबांच्या कल्याणासाठी असते. मात्र, उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे. हे बदलायला पाहिजे- मोदी
उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेला सुरुवात