लुधियाना : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून चरणजितसिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी केली.लुधियाना येथे एका आभासी प्रचारसभेला संबोधित करताना गांधी यांनी ही घोषणा केली. ‘आम्हाला गरीब घरातील मुख्यमंत्री हवा असल्याचे पंजाबच्या लोकांनी सांगितले होते’, असे ते म्हणाले.
पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी दुसरे प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू होते. ते जाट शीख आहेत. काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा, याबाबत पक्षाने आपले नेते व कार्यकर्ते यांच्याकडून कौल घेतला होता, तसेच ऑटोमेटेड कॉल सिस्टिमद्वारे लोकांची मतेही जाणून घेतली होती.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नव्हे तर ‘राजे’ असल्याचे सांगून राहुल यांनी त्यांच्यावर टीका केली. रस्त्यावरील कुणा माणसाला त्यांनी मदत केलेली तुम्ही पाहिली आहे काय, असा प्रश्न त्यांनी विचारला.
पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. सिद्धू यांनी नुकतेच वक्तव्य केले होते की, वरिष्ठ नेत्यांना कमकुवत मुख्यमंत्री पाहिजे आहे. ही थेट पक्षश्रेष्ठींवरच टीका असल्याचे मानले गेले. त्यानंतर सिद्धू यांच्या उपस्थितीतच राहुल गांधी चन्नी यांच्या नावाची घोषणा केली.