इराण इस्रायलवर लवकरात लवकर हल्ला करेल, अशी भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी (१२ एप्रिल) व्यक्त केली होती. त्याप्रमाणेच इराणने त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला आहे. इराणमधून १०० हून अधिक ड्रोन सोडण्यात आले आहेत, असं इस्रायलच्या सैन्यांनी सांगितल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. सीरियातील दमास्कस येथील इराणी दूतावासावर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी सीरियातील इराणी दूतावासावर हल्ला करण्यात आला होता, ज्यात सात इराणी लष्करी अधिकारी ठार झाले होते. प्रत्युत्तरादाखल इराणी सैन्याने अन् तिकडच्या प्रदेशाच्या आसपासच्या दहशतवादी गटांनी केलेल्या हल्ल्यांचा यात समावेश असू शकतो. पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इराण अन् इस्रायलमधील संघर्षाला सुरुवात झाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्य पश्चिमेतील अशांतता आणखी वाढणार आहे. या दहशतवादी गटांमध्ये हमास, लेबनॉनचा हिजबुल्ला, येमेनचा हुथी आणि इराकमधील इस्लामिक दहशतवादी गटाचा समावेश आहे. हिजबुल्ला असो वा हमास हे सर्व इराणच्या ‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ या आघाडीचा भाग आहेत. हे काय आहे आणि त्यात आणखी कोण कोण सामील आहेत हे जाणून घेऊ यात.

इराणचा ‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ कसा तयार झाला?

‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ ही एक अनौपचारिक राजकीय आणि लष्करी आघाडी आहे, जी इराणच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. ही आघाडी मध्यपूर्वेतील अमेरिका आणि इस्रायलच्या वाढत्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. हमास आणि हिजबुल्ला व्यतिरिक्त यात हुथी यांसारख्या गटांचा देखील समावेश आहे, जे लाल समुद्रात मुक्त हालचालींमध्ये समस्या निर्माण करीत आहेत. जरी ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्सचे गट वेगवेगळ्या देशांचे असले तरी त्यांच्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे ते सगळे अमेरिका आणि इस्रायल हे त्यांचे सर्वात मोठे शत्रू असल्याचे मानतात. या आघाडीत सीरिया, लेबनॉनमधील राजकीय पक्ष, हेझाबोला हा कट्टरतवादी गट, अन्सार अला हा येमेनमधील गट आणि पॅलेस्टाईन गट यांचा समावेश आहे.

रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इराणची ‘ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्स’ युती तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. IRGC हे इराणचे सशस्त्र दल आहे, पण ते सामान्य सैन्यापेक्षा वेगळे आहे. अंतर्गत आणि बाह्य धोक्यांपासून इराणच्या राजवटीचे संरक्षण करण्याचे काम IRGCला दिले जाते. IRGC मध्ये देखील काही शाखा आहेत. यापैकी एक म्हणजे IRGC-QF म्हणजेच कुड्स फोर्स, जे इतर देशांमध्ये इराणच्या हितासाठी लढणाऱ्या गटांना समर्थन देतात. रिपोर्टनुसार, कुड्स फोर्सच्या माध्यमातून इराण जगातील विविध देशांच्या अशा सशस्त्र गटांना प्रशिक्षण, निधी आणि शस्त्रांचा पुरवठा करतो. या शस्त्रांद्वारे ते अमेरिका आणि इस्रायलवर आणखी हल्ले करतात. त्यांचे नेटवर्क येमेन, सीरिया, लेबनॉन, गाझा आणि इराकपर्यंत पसरलेले आहे.

हेही वाचाः इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

लेबनॉनचा हिजबुल्ला

हिजबुल्ला हा एक शिया मुस्लिम राजकीय गट आहे आणि लेबनॉनमध्ये स्थित दहशतवादी गट म्हणजे ‘देवाचा पक्ष’ अशी तिकडे त्याला मान्यता आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने १९८२ मध्ये त्या वेळी लेबनॉनवर आक्रमण केलेल्या इस्रायली सैन्याशी लढण्याच्या उद्देशाने त्याची स्थापना केली होती. कालांतराने हिजबुल्ला लेबनीज राज्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर शक्तिशाली झाले. ७ ऑक्टोबरपासून हा गट जवळपास दररोज इस्रायलवर गोळीबार करीत आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने हिजबुल्लाच्या महत्त्वाच्या कमांडरसह २४० सैनिकांना ठार केले आहे. अमेरिका आणि काही अरब देशांनी हिजबुल्लाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. हिजबुल्लाने संपूर्ण प्रदेशातील इतर तेहरान समर्थित गटांसाठी एक आदर्श म्हणून काम केले आहे, ज्यापैकी काहींना सल्ला किंवा प्रशिक्षण दिले आहे. लेबनीज गट ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून लेबनीज-इस्त्रायली सीमेवरील इस्रायलच्या भागात दररोज हल्ले करीत आहेत, २००६ मध्ये युद्ध सुरू केल्यापासून शत्रू राष्ट्र असलेल्या इस्रायलवर त्यांनीच सर्वात जास्त गोळीबार केला होता. हिजबुल्लाहच्या हल्ल्यांमुळे इस्रायली सैन्याचा ताण वाढण्याचं सांगितलं जातं. सीमेजवळून घरे सोडून हजारो इस्रायलींना पळून जावे लागले आहे. दुसरीकडे इस्रायली हवाई आणि तोफखाना हल्ल्यांमुळे हजारो लेबनीज लोकांनाही सीमेवरून पळून जाण्यास भाग पाडले आहे. इस्त्रायली हल्ल्यात ७ ऑक्टोबरपासून लेबनॉनमधील महत्त्वाच्या कमांडरसह सुमारे २४० हिजबुल्लाह लढवय्ये ठार झाले आहेत, याशिवाय सीरियामध्ये इस्रायली हल्ल्यात आणखी ३० जण ठार झाले आहेत, अशी माहितीही सुरक्षा सूत्रांनी दिली आहे. हिंसाचाराला आणखी मोठ्या संघर्षात रूपांतरित होण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेचे दूत प्रयत्न करत आहेत.

येमेनचे हुथी लाल समुद्रात कहर माजवत आहेत

हुथी हा येमेनचा शिया मिलिशिया गट आहे. २०१४ मध्ये या गटाने तत्कालीन सरकार उलथवून टाकले आणि येमेनचा मोठा भाग ताब्यात घेतला. ते शिया इस्लामच्या झैदी पंथाचे आहेत आणि त्यांचे इराणशी दीर्घकाळ मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हिजबुल्लाप्रमाणे तेही हमासच्या बाजूने लढत आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी हुथीदेखील इस्रायलच्या दिशेने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागून संघर्षात सामील झालेत. नंतर त्यांनी लाल समुद्रातील इस्रायली बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम झाला. नोव्हेंबरमध्ये त्यांनी दक्षिणेकडील लाल समुद्रातील जहाजांवर हल्ला करून आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिका आणि ब्रिटनने जानेवारीमध्ये येमेनमधील हुथीच्या तळांवर हवाई हल्ले केले. त्यानंतर अमेरिका आणि ब्रिटिश जहाजे आणि युद्धनौका आमचे लक्ष्य असतील, असंही हुथींनी घोषित केले. हुथींच्या हल्ल्यामुळे युरोप आणि आशियातील सर्वात लहान मार्गावर आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळे निर्माण झाले. अनेक जहाजांनी जुन्या मार्गाने लांबला पल्ला गाठण्यास सुरुवात केली. रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स हुथींना क्षेपणास्त्रे पुरवत असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. मात्र, इराणने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हुथी हिजबुल्लाह किंवा इराण सरकारचा सहभाग नाकारतात.

पॅलेस्टिनी अतिरेकी गट हमास

हमास हा पॅलेस्टिनी इस्लामिक अतिरेकी गट आहे, जो गाझा पट्टीतून कार्यरत आहे. २००७ मध्ये त्याच्या सैनिकांनी गाझा ताब्यात घेतला. इतर दहशतवादी गटांप्रमाणेच हमासने इस्रायलचा नाश करण्याची शपथ घेतली आहे. इस्त्रायल, अमेरिका, युरोपियन युनियन, ब्रिटन आणि इतर अनेक देशांनी त्याच्या लष्करी शाखेला दहशतवादी गट घोषित केले आहे. हमासचा सर्वात मोठा समर्थक हा त्याचा शेजारी देश इराण आहे. रिपोर्टनुसार, आर्थिक मदतीबरोबरच इराण त्याला शस्त्रे आणि प्रशिक्षण सुविधाही पुरवतो.

इराकचा इस्लामिक रेझिस्टन्स

इराकच्या इस्लामिक रेझिस्टन्स आघाडीमध्ये अनेक गटांचा समावेश आहे, ज्यांना इराणचा पाठिंबा आहे. त्यांचे लढवय्ये इराक आणि सीरियामध्ये सक्रिय आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये या गटाने जॉर्डन-सीरिया सीमेजवळ अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिक मारले गेले, तर सुमारे ३० जखमी झाले. गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर पश्चिम आशियातील हा पहिलाच हल्ला होता, ज्यात अमेरिकन सैनिक मारले गेले. इस्लामिक रेझिस्टन्सलाही अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केले आहे.