११ फेब्रुवारी रोजी फोरमस्ट ग्रुपच्या सीईओ अँजेला चाओ यांचा गाडी तलावात पडल्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला एक महिन्याच्यावर कालावधी उलटून गेला आहे. मात्र, आता त्यांच्या मृत्यूबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. अँजेला चाओ यांचा मृत्यू त्यांच्या टेस्ला गाडीची काच न फुटल्याने जीव गुदमरून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे टेस्ला गाड्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, अँजेला चाओ यांचा मृत्यू नेमका कसा झाला? टेस्लाच्या सुरक्षेवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जात आहेत? आणि महत्त्वाचे म्हणजे अशा परिस्थितीत सापडल्यास नेमकं काय करावं? याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण : भारतीय नौदलाकडेही आता ब्राम्होस क्षेपणास्त्र… मारक क्षमतेत कसा फरक पडणार?

कोण होत्या अँजेला चाओ?

५० वर्षीय अँजेला चाओ चीनमधीन व्यावसायिक सी-चेंग चाओ आणि त्यांची पत्नी रुथ मुलान चू चाओ यांच्या कन्या होत्या. हे दोघेही चीनमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. तसेच त्यांनी अमेरिकेत फोरमस्ट ग्रुपची स्थापना केली होती. याच फोरमस्ट ग्रुपच्या त्या सीईओ होत्या. ही एक शिपिंग कंपनी आहे. याशिवाय अँजेला चाओ या अमेरिकी सिनेट रिपब्लिकन नेते मिच मॅककोनेल यांच्या मेहुणीदेखील होत्या.

अँजेला चाओ यांचा अपघात नेमका कसा झाला?

११ फेब्रुवारी रोजी अँजेला चाओ त्यांच्या मैत्रिणींबरोबर एका फार्महाऊसमध्ये पार्टी करण्यासाठी गेल्या होत्या. पार्टी झाल्यानंतर रात्री ११.३० च्या सुमारास त्या त्यांची टेस्ला गाडी घेऊन घरी जाण्यासाठी निघाल्या. मात्र, तिथून काही मीटर अंतरावर असलेल्या तलावात त्यांची कार कोसळली. त्यांनी लगेच त्यांच्या मित्रांना फोन लाऊन गाडी पुढे जाण्याऐवजी मागे गेल्याने तलावात पडल्याची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मित्र-मैत्रिणांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी बचाव पथकालाही याची माहिती दिली. ते येण्यापूर्वी एकाने अँजेलाला वाचवण्यासाठी तलावात उडी मारली. त्याने गाडीची काच फोडून अँजेला चाओ यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, टेस्लाच्या कारची काच इतकी मजबूत होती की, प्रयत्न करूनही ती तोडण्यात यश आले नाही. काही मिनिटातच संपूर्ण गाडीत पाणी भरले होते. अखेर बचाव पथकाने टो-ट्रकच्या साहायने गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तसेच अँजेला चाओ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

टेस्लाच्या सुरक्षेवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह :

द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात घडण्यापूर्वीसुद्धा गाडीच्या गिअर शिफ्टिंग यंत्रणेबाबत अँजेला चाओ यांचा गोधळ उडाला होता. त्यांनी गाडी ड्राईव्ह मोडमध्ये ठेवण्याऐवजी रिव्हर्स मोडमध्ये ठेवली होती. महत्त्वाचे म्हणजे टेस्लाच्या गिअर फिटिंग यंत्रणेबाबत गोंधळ उडणाऱ्या अँजेला चाओ या पहिल्याच व्यक्ती नव्हत्या. यापूर्वी जवळपास १२ जणांनी गिअर शिफ्टिंग यंत्रणेची डिझाइन गोंधळात टाकणारी असल्याची तक्रार टेस्लाकडे केली होती.

बिझनेस इनसाईडरने दिलेल्या वृत्तानुसार, या तक्रारींनंतर टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी गिअर शिफ्टिंग यंत्रणेच्या डिझाइनबद्दल चिंता व्यक्त केली होती. याशिवाय टेस्लाच्या ऑटोपायलट मोडवरील फँटम ब्रेकिंग सिस्टीममध्येही त्रुटी आढळून आल्या होत्या. फँटम ब्रेकिंग सिस्टीमुळे अचानकपणे गाडीचे ब्रेक लागत असल्याची तक्रारही अनेकांनी केली होती.

हेही वाचा – विश्लेषण : देशातल्या पहिल्या वातावरणीय संशोधन प्रयोगशाळेसाठी भोपाळचीच निवड का? काय आहे तिचे महत्त्व?

अशा परिस्थितीत नेमकं काय करावं?

मे २०२२ मध्ये अशाच प्रकारची घटना बंगळुरूमध्येही घडली होती. बंगळुरूतील केआर सर्कल येथील अंडरपासमध्ये पाणी भरल्याने येथे एक कार अडकली होती. या घटनेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. खरं तर गाडी पाण्यात पडणे ही धोकायदायक परिस्थिती आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा स्थितीत दोन मिनिटांच्या आत गाडीच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. कारण गाडी पाण्यात पडल्यास तिला संपूर्णपणे पाण्यात बुडण्यास जवळपास दोन मिनिटे लागतात. त्यानंतर पाण्याच्या दबावामुळे खिडक्या दरवाजे उघडणे कठीण असते.

तज्ज्ञांच्या मते, जर तुमची गाडी पाण्यात बुडाली तर कोणालाही मदतीसाठी फोन करण्यापेक्षा सर्वप्रथम गाडीच्या खिडकीची काच तोडण्याचा प्रयत्न करावा आणि सिटबेल्ट सोडून खिडकीतून बाहेर पडावे. महत्त्वाचे म्हणजे, अशावेळी गाडीची विंडशिल्ड (समोरची काच) फोडण्याचा प्रयत्न करू नये. कारण ती कठोर काचापासून बनली असते. त्यामुळे त्यात यश मिळण्याची शक्यता कमी असते. याशिवाय गाडी संपूर्ण बुडाल्यानंतर लगेच खिडकी किंवा गाडीचे गेट उघडण्याचा प्रयत्न करू नये, अशावेळी गाडीच्या आतील आणि बाहेरील पाण्याचा दबाव बरोबर होण्याची वाट बघावी. त्यानंतर गाडीचा दरवाजा किंवा खिडकी उघडण्याचा प्रयत्न करावा.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Billionaire seo angela chao died after her tesla reversed into pond many has raised questions about car safety spb