होय, ब्यूबॉनिक प्लेग परत आला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला यूएस मधील ओरेगॉन येथे आरोग्य अधिकाऱ्यांनी २००५ नंतर राज्यात ब्यूबॉनिक प्लेगच्या पहिल्या रुग्णाची नोंद केली आहे. विविध अहवालांनुसार, या व्यक्तीला आजारी पाळीव मांजरीपासून हा आजार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. हा रोग त्वरित ओळखण्यात आल्यामुळे रूग्णाला संबंधित रोगावरील उपचार देण्यात आले आहेत. मांजरीवरही उपचार करण्यात आले, मात्र मांजरीचा या रोगामुळे मृत्यू झाला. १३४६ आणि १३५३ दरम्यान ब्यूबॉनिक प्लेगने युरोपमध्ये ५० दशलक्ष लोकांचा बळी घेतला ज्याला ‘ब्लॅक डेथ’ म्हणूनही ओळखले जाते. ब्यूबॉनिक प्लेगचा रुग्ण आढळणं चिंतेचं कारण आहे का? याबद्दल जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्यूबॉनिक प्लेग म्हणजे काय?

येर्सिनिया पेस्टिस या जीवाणूमुळे ब्यूबॉनिक प्लेग हा रोग होतो. याचा संसर्ग प्राणी आणि माणसांमध्ये होतो. येर्सिनिया पेस्टिस सामान्यतः लहान प्राण्यांच्या शरीरावर आढळणार्‍या पिसवांनी दंश केल्यामुळे पसरतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) नुसार, माणसांना याचा संसर्ग तीन गोष्टींनी होऊ शकतो. संक्रमित वेक्टर पिसवांनी दंश केल्याने, संसर्गजन्यांच्या संपर्कात आल्याने (जसे की संक्रमित उंदराने दंश केल्यास) आणि न्यूमोनिक प्लेग असलेल्या रुग्णातील जीवाणू श्वसनामार्फत शरीरात गेल्याने हा रोग होऊ शकतो.

येर्सिनिया पेस्टिस सामान्यतः लहान प्राण्यांच्या शरीरावर आढळणार्‍या पिसवांनी दंश केल्यामुळे पसरतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

प्लेगची लक्षणे काय आहेत?

विशेषत: ब्यूबॉनिक प्लेगमध्ये लसीका वाहिनीवाटे हे जीवाणू लसीका ग्रंथीमध्ये शिरतात. ‘युनायटेड स्टेट्स सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी)’ नुसार, यामुळे ताप, डोकेदुखी, अशक्तपणा, असह्य वेदना, लसीका ग्रंथीवर सूज यांसारखी लक्षणे आढळतात. सामान्यतः हा रोग संक्रमित पिसवांनी दंश केल्यामुळे होतो. यात मृत्युदर ३० ते ६० टक्के आहे. जीवाणू रक्तप्रवाहात शिरले तर या आजाराचा पुढचा टप्पा म्हणजेच सेप्टिसेमिक प्लेग होतो. यामध्ये ओटीपोटात दुखणे, झटका लागणे, त्वचेतून रक्तस्त्राव, बोटं आणि नाकांची त्वचा काळी पडणे यांसारखे गंभीर लक्षण आढळतात. ‘सीडीसी’च्या म्हणण्यानुसार, पिसवांनी दंश केल्यास किंवा संक्रमित प्राण्याच्या संपर्कात आल्यास सेप्टिसेमिक प्लेग होतो.

ब्यूबॉनिक प्लेगमध्ये लसीका वाहिनीवाटे हे जीवाणू लसीका ग्रंथीमध्ये शिरतात. (छायाचित्र संग्रहीत)

यात अखेरचा टप्पा म्हणजे न्यूमोनिक प्लेग. न्यूमोनिक प्लेग हा सर्वात धोकादायक आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या मते, याचा उपचार न केल्यास जीवाचा धोका उद्भवतो. जीवाणू जेव्हा फुफ्फुसात शिरतात, तेव्हा लक्षणांमध्ये न्यूमोनियाचा समावेश होतो. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, प्लेगचा हा एकमेव प्रकार आहे, ज्यात संसर्गजन्य व्यक्तीपासून जीवाणू श्वासाद्वारे दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतात. या प्रकारात योग्यवेळी उपचार न मिळाल्यास मृत्युदर १०० टक्के आहे.

‘ब्लॅक डेथ’चा इतिहास?

प्लेग आजाराला ‘ब्लॅक डेथ’ देखील म्हटले जाते. १४व्या शतकातील लोकसंख्या लक्षात घेता, ‘ब्लॅक डेथ’ ही आजपर्यंतची सर्वात मोठी साथ आहे. काही अंदाजानुसार, या रोगाच्या साथीमुळे युरोपातील निम्म्याहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या साथीतून जी लोक वाचलीत त्यांच्यावर याचा सर्वात जास्त परिणाम झाला. नेचर जर्नलमध्ये २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले की, काही अनुवांशिक उत्परिवर्तन (म्युटेशन) मुळे जगण्याची शक्यता ४० टक्क्यांनी वाढली. शिकागो विद्यापीठाचे प्रोफेसर लुईस बॅरेरो यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, हा आकडा माणसामध्ये नोंदवण्यात आलेला सर्वात प्रभावी आकडा आहे.” ‘ब्लॅक डेथ’ने युरोपच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक गोष्टींवरही प्रभाव टाकला. इतिहासकार जेम्स बेलीच यांनी त्यांच्या २०२२ मधील ‘द वर्ल्ड द प्लेग मेड: द ब्लॅक डेथ अँड द राइज ऑफ युरोप’ या पुस्तकात लिहिले की, या साथीच्या रोगानंतरच युरोपचा वैश्विक स्तरावर विस्तार झाला.

‘ब्लॅक डेथ’सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते का?

हेही वाचा : ‘इस्त्रो’ने GSLV रॉकेटला ‘नॉटी बॉय’ असे टोपणनाव का दिले? यामागची नेमकी कहाणी काय?

ओरेगॉनमधून हा रोग पसरण्याची किंवा यामुळे माणसांचा मृत्यू होण्याची शक्यता डॉक्टरांनी नाकारली आहे. १९३० च्या दशकातील ब्यूबॉनिक प्लेगची साथ ही भूतकाळातील एक घटना आहे. सीडीसीनुसार, दरवर्षी जगभरात प्लेगच्या जवळ जवळ दोन हजार रुग्णांची नोंद केली जाते. बहुतांश रुग्ण मादागास्कर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि पेरू येथे आढळतात. यात मृत्यूचे प्रमाण अंदाजे ११ टक्के आहे. मृत्यूचं प्रमाण कमी असण्याचे कारण आधुनिक उपचार पद्धती आहे. आताच्या उपचार पद्धती येर्सिनिया पेस्टिस या जिवाणूला तोंड देण्यास सक्षम आहेत. जीवनशैलीतील बदल, अधिक स्वच्छता आणि रोगांची, त्यांच्या लक्षणांची जाण असल्याकारणानेही मृत्युचे प्रमाण घटले आहे. सीडीसीच्या मते, प्लेगच्या सर्व प्रकारांवर उपचार शक्य आहेत. लवकरात लवकर उपचार घेतल्याने रुग्णाच्या मृत्युची शक्यता फार कमी असते. आजही येर्सिनिया पेस्टिस हा जीवाणू कुठेही आढळू शकतो आणि व्यक्तींसाठी घातक ठरू शकतो. मात्र ‘ब्लॅक डे’थ सारखी परिस्थिती उद्भवणं जवळ जवळ अशक्य आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bubonic plague is back rac