गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानची अवस्था अतिशय वाईट आहे, तेथील जनताही महागाईमुळे त्रासली आहे. या परिस्थितीमुळे पाकिस्तान सातत्याने कर्ज घेत आहे. मात्र, आता पूर्वीपासूनच कर्जात बुडालेला पाकिस्तान आणखी कर्जात बुडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने कर्जाच्या पैशातून देशाच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ केली आहे. भारताबरोबर अलीकडील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संरक्षण बजेट वाढवले आहे.

पाकिस्तान मंत्री एहसान इक्बाल यांनी सांगितले की, सरकार २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी संरक्षण बजेट वाढवेल. पाकिस्तान कर्जबाजारी आहे आणि देशाला आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे, असे असतानाही पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानचे संरक्षण बजेट कसे? भारताच्या तुलनेत हे बजेट आहे कसे? वाढलेल्या संरक्षण बजेटचा पाकिस्तानमधील परिस्थितीवर काय परिणाम होईल? त्याविषयी जाणून घेऊयात?

(छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पाकिस्तान संरक्षण बजेट वाढवणार

पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी शनिवारी (७ जून) जाहीर केले की, सरकार संरक्षण बजेट वाढवेल. पाकिस्तानमधील ‘डॉन’ वृत्तपत्राला त्यांनी सांगितले, “या बजेटमध्ये सशस्त्र दलांना क्षमता वाढविण्यासाठी आणि भविष्यात देशाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पुरवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे सिद्ध झाले आहे की, आपला शेजारी देश भारताने रात्री आपल्यावर हल्ला केला, परंतु आपण त्यांना योग्य प्रत्युत्तर दिले.” त्यांनी पुढे म्हटले, “जर भारताने पुन्हा हल्ला केला तर आपल्या देशाने प्रत्युत्तर देण्यासाठी तयार राहिले पाहिजे.” पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे.

देशाच्या २०२४-२५ च्या आर्थिक सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, पाकिस्तानने मागील आर्थिक वर्षात इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडून घेतलेले ७.८ अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडले आहे. सर्वेक्षणानुसार, कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तानला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) १.९ टक्क्यांहून अधिक खर्च येत आहे. पाकिस्तानचे एकूण सार्वजनिक कर्ज तब्बल ७६ ट्रिलियन पाकिस्तानी रुपये म्हणजेच सुमारे २६९ अब्ज डोलर्सपर्यंत पोहोचले आहे. हा आकडा २०२०-२१ पासून जवळजवळ दुप्पट झाला आहे.

पाकिस्तानला इतर देश आणि बहुपक्षीय संस्थांचे ८७.४ बिलियन डॉलर्स देणे आहे; तर चीनकडून घेतलेले १५ बिलियन डॉलर्सचे कर्ज पाकिस्तानला परत द्यायचे आहे. द्विपक्षीय कर्ज देणाऱ्यांमध्ये ही आजवरची सर्वात मोठी रक्कम आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी हवाई तळ आणि हवाई संरक्षण प्रणालींना मोठे नुकसान झाले होते. याच पार्श्वभूमीवर शाहबाज शरीफ सरकारने लष्करी बजेट वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

पाकिस्तानचे संरक्षण बजेट

  • पाकिस्तानने १० जूनला आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला आहे.
  • हा अर्थसंकल्प १७.६ ट्रिलियन पाकिस्तानी रुपये इतका असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पात सुमारे २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
  • गेल्या वर्षी पाकिस्तानने आपल्या संरक्षण अर्थसंकल्पात १६.४ टक्क्यांनी वाढ केली होती.
  • २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाकिस्तानने संरक्षणासाठी २.१ ट्रिलियन रुपयांची तरतूद केली होती. त्यात उपकरणे आणि इतर मालमत्तेसाठी २ बिलियन डॉलर्सची तरतूद करण्यात आली होती.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ साठी पाकिस्तानचा लष्करी खर्च १०.२ बिलियन डॉलर्स होता. आता भारतातील सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत सैन्याला तोंड देण्यासाठी पाकिस्तानने आपल्या संरक्षण खर्चात वाढ केली असून, हा खर्च अणु क्षमता आणि क्षेपणास्त्र प्रणालींचा विस्तार करण्यावर केंद्रित केला आहे. ‘इकॉनॉमिक टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान फक्त मोबाइल रॉकेट सिस्टीममध्ये भारतापेक्षा पुढे आहे. भारताकडे २६४ तर पाकिस्तानकडे ६०० मोबाइल रॉकेट सिस्टीम आहेत.

भारताच्या तुलनेत पाकिस्तानचे संरक्षण बजेट कसे आहे?

भारताचे सैन्य पाकिस्तानपेक्षा मोठे आहे आणि त्यामुळे संरक्षण खर्च लक्षणीयरीत्या जास्त आहे. २०२५-२६ आर्थिक वर्षात, भारताने संरक्षण खर्चासाठी ७८.७ बिलियन डॉलर्सची तरतूद केली आहे. त्यात मागील वर्षाच्या तुलनेत ९.५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ साठी भारताचा लष्करी खर्च ८६.१ बिलियन डॉलर्स होता, त्यामुळे भारत जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश ठरला आहे.

गेल्या दशकात भारताचे संरक्षण बजेट वाढले आहे. २०१३ मध्ये भारताचा लष्करी खर्च ४१ अब्ज डॉलर्स होता. ‘मॅक्रोट्रेंड्स’च्या आकडेवारीनुसार, २०२४ पर्यंत हा खर्च दुप्पट होऊन ८० बिलियन डॉलर्स झाले. भारत परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करत असून शस्त्रास्त्र प्रणालींचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे. राफेल लढाऊ विमानांसारखी महत्त्वपूर्ण प्रणाली खरेदी करून भारताने आपली हवाई शक्तीदेखील वाढवली आहे.

भारताकडे मनुष्यबळदेखील अधिक आहे. भारताकडे १४.५ लाख सैनिक आहेत, तर भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडे ६,५४,००० सैनिक आहेत. भारताकडे ७३० लढाऊ विमाने आहेत, तर पाकिस्तानकडे ४५२ लष्करी विमाने आहेत. भारतीय लष्कराकडे ४,२०१ टँक आणि सुमारे १,४९,००० चिलखती वाहने आहेत. तसेच पाकिस्तानकडे केवळ २,६२७ टँक आणि १७,५०० चिलखती वाहने आहेत. भारताची नौदल शक्तीदेखील पाकिस्तानपेक्षा सक्षम आहे. भारतीय नौदलाकडे २९३ जहाजे आहेत, ज्यात दोन विमानवाहू जहाजे, १८ पाणबुड्या आणि १३ विध्वंसक जहाजे आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानकडे १२१ जहाजे आहेत, परंतु त्यांच्याकडे विमानवाहू जहाजे किंवा विध्वंसक जहाजे नाहीत.