आफ्रिका खंडातील फारशा प्रचलित नसलेल्या ‘केप व्हर्डे’ नामक देशाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवत इतिहास घडवला. जेमतेम सव्वा पाच लाख लोकसंख्या असलेला हा देश पुढील वर्षीच्या स्पर्धेत खेळताना दिसेल. एकीकडे भारतासारख्या १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठीही पात्र ठरता येत नसताना, दुसरीकडे ‘केप व्हर्डे’सारखा छोटासा देश विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यात कसा यशस्वी ठरला याचा आढावा.
कुठे आहे केप व्हर्डे?
मध्य अटलांटिक समुद्रात असलेला हा देश आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला आहे. सेनेगलच्या पश्चिमेस ५७० किलोमीटर अंतरावर असलेल्या या देशाला ५ जुलै १९७५ रोजी पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी राजधानी प्राइआ येथील ‘एस्टाडिओ डा वारझेआ’ (स्टेडियमचे नाव) येथे केप व्हर्डेचा झेंडा मानाने फडकला होता. याच ठिकाणी ५० वर्षांनंतर केप व्हर्डेच्या फुटबॉल संघाने देशवासियांना आपल्या क्रीडा इतिहासातील सर्वांत मोठा क्षण अनुभवायची संधी दिली.
दुसरा छोटा देश
विश्वचषक पात्रतेच्या सामन्यात केप व्हर्डे संघाने एस्वाटिनीला ३-० असे पराभूत केले आणि २०२६ सालच्या स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळणारा केप व्हर्डे (५ लाख २५ हजार) हा दुसरा सर्वांत कमी लोकसंख्येचा देश ठरेल. यापूर्वी आइसलँडचा संघ २०१८च्या विश्वचषकात खेळला, त्यावेळी त्यांची लोकसंख्या ३ लाख ५० हजार होती.
परदेशस्थ खेळाडूंमुळे बळकटी…
अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या केप व्हर्डे देशाला यशस्वी फुटबॉल संघ घडविण्यासाठी परदेशस्थ खेळाडूंची मदत झाली. विश्वचषक पात्रतेच्या गेल्या दोन सामन्यांसाठी निवड झालेले एकूण २५ पैकी १४ खेळाडू परदेशस्थ होते. केप व्हर्डेमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या फारशा संधी उपलब्ध नसल्याने या देशातील लोक प्रामुख्याने पोर्तुगाल, फ्रान्स आणि नेदरलँड्स या देशांत जाणे पसंत करतात. ‘द गार्डियन’च्या माहितीनुसार, केप व्हर्डियन वंशाने साधारण २३ हजार लोक नेदरलँड्समधील रॉटरडॅम येथे वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी राहणारे सहा खेळाडू केप व्हर्डे संघाकडून खेळले. विशेष म्हणजे, विश्वचषक पात्रता फेरीत केप व्हर्डेकडून सर्वाधिक गोल करणारा डेलॉन लिव्हरामेंटो हासुद्धा रॉटरडॅम येथेच राहतो.
पात्रता फेरीत कशी कामगिरी?
पात्रता फेरीत अखेरच्या साखळी सामन्यात कॅमेरूनला अँगोलाविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले आणि दुसरीकडे केप व्हर्डे संघाने एस्वाटिनीवर एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे केप व्हर्डे संघ आफ्रिका खंडातून विश्वचषकासाठी थेट पात्र ठरला. या खंडातून नऊ संघ विश्वचषकात खेळणार आहेत. ‘ड’ गटातून केप व्हर्डेने १० पैकी सात सामने जिंकले, दोन सामने बरोबरीत सोडवले, तर एकात पराभव पत्करला. त्यामुळे या गटात त्यांनी २३ गुणांसह अग्रस्थान मिळवले, तर सेनेगल १९ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला.
‘फिफा’च्या योजनेला यश?
फुटबॉलची शिखर संघटना ‘फिफा’ने पुढील वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत ४८ संघांना सहभाग देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सात विश्वचषकांच्या तुलनेत यावेळी १६ अधिक संघ खेळताना दिसतील. अधिकाधिक देशांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फान्टिनो यांनी सांगितले होते. ‘‘फुटबॉल फक्त युरोप आणि दक्षिण अमेरिकेपुरता मर्यादित नाही. हा जागतिक खेळ आहे. त्यामुळे जितके अधिक देश विश्वचषकासाठी पात्र ठरतील, तितके ते फुटबॉलसाठी लाभदायी ठरेल,’’ असे इन्फान्टिनो म्हणाले होते. त्यांच्या या योजनेचा फायदा आता केप व्हर्डे संघालाही मिळणार आहे.
भारताला कधी यश मिळेल?
क्रिकेटवेड्या भारतामध्ये फुटबॉलचा प्रसार झालेला असला, तरी गुणवत्ता विशाल भागातून आढळत नाही. मोजक्याच प्रदेशांमध्ये फुटबॉलला करियर म्हणून पसंती मिळते. इतक्या तुटपुंज्या गुणवत्ता संचयातून विश्वचषक पात्रता तर सोडा, पण आपण आशिया चषकासाठीही पात्र ठरू शकत नाही. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, इतर अनेक आशियाई देशांमध्ये फुटबॉल गुणवत्तेच्या आघाडीवर बरीच प्रगती होताना दिसते. दक्षिण कोरिया, जपान, सौदी अरेबिया, इराण हे देश फुटबॉलच्या दुनियेतील मातब्बरांशी टक्कर घेत आहेत. भारत यात खूप मागे पडला. या खेळात भारतामध्ये कॉर्पोरेट गुंतवणूक मोठी असली, तरी तळागाळात जोवर हा खेळ रुजत नाही आणि लोकप्रिय होत नाही तोवर भारत विश्वचषकात झळकण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
विश्वचषक स्पर्धा कधी?
विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी ११ जून ते १९ जुलै या कालावधीत रंगणार आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांना संयुक्तपणे यजमानपदाचा मान मिळाला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना न्यू जर्सीच्या ईस्ट रदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर होणार आहे.