वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या १८ टक्क्यांच्या मार्गावर वाहनउद्योग २२ सप्टेंबरपासून धावू लागेल. छोट्या वाहनांवरील करकपातीचे इंधन वाहनउद्योगाला पुरेसे असेल का, कोणत्या श्रेणीतील प्रवासी आणि व्यावसायिक वाहने महाग असतील, वाहन उद्योग क्षेत्राला या नव्या कररचनेमुळे बळकटी येईल का, याविषयी.

नवीन GST कर रचना कशी?

वस्तू आणि सेवा कर परिषदेने वाहनांवरील महत्त्वाच्या कररचनेला मंजुरी दिली. ही रचना व्यापक द्विस्तरीय असेल. यात पहिला स्तर १८ टक्के, तर दुसरा ५ टक्के असेल. येत्या २२ सप्टेंबरपासून ही करप्रणाली (जीएसटी) अमलात येईल. यात छोट्या कार, मोटारसायकल आणि व्यावसायिक वाहनांवरील वस्तू आणि सेवा करात कपात करण्यात आली आहे. त्याच वेळी मोठ्या कार व दणकट बाइक महाग झालेल्या असतील.

सुधारित कररचनेनुसार कर आकारणी अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या किमतीही बदललेल्या असतील. यात वाहनांच्या सुट्या भागांचाही समावेश असेल.

कोणास तोटा, कोण फायद्यात?

नव्या पद्धतीनुसार, छोट्या कार व मोटारसायकल यांच्या किमती मोठ्या फरकाने कमी झालेल्या असतील. पेट्रोल, एलपीजी व सीएनजीवर चालणाऱ्या १२०० सीसी आणि डिझेलवरील १५०० सीसी क्षमतेच्या परंतु ४००० मिमी हून कमी लांबीच्या कारवर यापुढे विद्यमान २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लागू होईल. अर्थात, भारतीय बाजारपेठेवर आरूढ झालेल्या मारुती स्वीफ्ट, व्हॅगन आर, ह्युंदाई आय ट्व्ेण्टी, टाटा पंच व नेक्सन, अल्ट्रोझ, रेनॉ क्वीड आणि ह्युंदाई एक्स्टर व स्कोडा कायलॅक या कारवरील किमतीचा आकडा बदलेला असेल. तोच फायदा ३५० सीसी इंजिन असलेल्या मोटारसायकल, शिवाय बाजारात खपात आघाडीवर असलेल्या हिरो स्प्लेन्डर, होंडा शाइन, टीव्हीएस अपाचे, बजाज पल्सर या श्रेणीतील मोटारसायकल तसेच आरई क्लासिक व हंटर ३५० या मॉडेल्सना मिळेल.

व्यावसायिक वाहनेही टप्प्यात…

कररचनेतील बदल व्यावसायिक वाहनांना लागू असतील. यात तीनचाकी, बस व ट्रक शिवाय अॅब्युलन्स वाहनांना २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी लागू केली जाईल. हायब्रीड अर्थात दुहेरी इंधनावर धावणाऱ्या वाहनांना हा दिलासा मिळालेला असेल. कररचनेच्या सर्वात तळातील अर्थात ५ टक्के जीएसटी हा इलेक्ट्रिक वाहनांना लागू करण्यात आलेला असेल.

मोठ्या कराचा ताप कोणाला?

कारच्या प्रीमियम अर्थात आरामदायी श्रेणीतील कारखरेदीदारांना मोठा कर सोसावा लागेल. सर्व मध्यम चणीच्या आणि मोठ्या आकाराच्या कारवर ४० टक्केइतका जीएसटी लागू असेल. यात ह्यंुदाई क्रेटा, किया सेल्टॉस, टाटा हॅरिअर, महिंद्रा एक्सयूव्ही ७००, टोयोटा फॉर्च्युनर आणि अशा अन्य प्रमुख एसयूव्ही कारचा समावेश असेल. या शिवाय ३५० सीसीहून अधिक क्षमता असलेल्या मोटारसायकलवर ४० टक्के जीएसटी लागू असेल. त्यामुळे रॉयल एन्फिल्ड हिमालयन ४५०, केटीएम ड्यूक ३९०, हर्ले-डेव्हिडसन एक्स ४४०, ट्रायम्फ स्पीड ४०० व अन्य मोटारसायकल महाग झालेल्या असतील.

नव्या करआकारणीत दिलासा काय?

सद्यःस्थितीत मोठ्या आकाराच्या कारवर २८ टक्के इतका जीएसटी आकारला जातो. शिवाय १७ ते २२ टक्के भरपाई उपकर मिळून एकूण कराची आकारणी ही ५० टक्क्यांपर्यंत जाते. आता ४० टक्के इतका सरसकट कर आकारला जाणार असल्याने त्यात अतिरिक्त भरपाई उपकर नसेल. त्यामुळे ग्राहकावरील कराचे ओझे आपोआपच कमी झालेले असेल.

शेतकऱ्यांना फायदा कसा?

सुसंगत कररचनेचे आम्ही स्वागतच करतो. त्याचा वाहनउद्योग व कृषी क्षेत्रावर चांगल्या अर्थाने दूरगामी परिणाम झालेला आपल्याला जाणवेल. त्यामुळे वाहने, ट्रॅक्टर व शेतीची अवजारे किफायतशील दरात निर्माण करता येतील, असे महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटो आणि फार्म सेक्टरचे ईडी व सीईओ राजेश जेजुरीकर म्हणाले.

सीएट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ अर्णब बॅनर्जी म्हणाले की, टायरवरील २८ टक्के कर १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे, हा दिलासा आहेच, पण ट्रॅक्टरच्या टायर व ट्यूबवरील कर ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. हा निर्णय निश्चितच क्रांतिकारी म्हणावा लागेल. टायर खरेदीत अधिक स्वस्त पर्याय निर्माण झालेले असतील. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा अधिकाधिक फायदा झालेला पहायला मिळेल.

छोट्या कार उत्पादकांच्या करचना पथ्यावर का?

आजवर, खासकरून वाहनांवरील करचनेबाबात संदिग्धता होती. ती आता निवळली आहे. कराचे स्तर स्पष्ट आहेत. त्यामुळे वाहनउद्योग निर्मितीला वेग येईलच, शिवाय सर्वच श्रेणीतील कार खरेदीदारांना त्याचा दिलासा मिळालेला असेल, असे ईवाय इंडियाचे पार्टनर आणि ऑटोमोटिव्ह टॅक्स लीडर सौरभ अगरवाल यांनी सांगितले. छोट्या कारची निर्मिती करणाऱ्या मारुती-सुझुकीसारख्या कंपनीला नव्या कररचनेचा फायदा होईल, असे चित्र आहे. त्यांच्या छोट्या चणीच्या फ्रॉन्क्स या कारची हायब्रीड आवृत्ती बाजारात येत आहे. ही कार इंधनबचतीच्या उद्देशाने बाजारात आणली जाणार असल्याने त्याचा फायदा ग्राहकांना होईल, अशी एक अटकळ आहे.

आरामदायी ईव्ही कारच्या किमतीही आटोक्यात?

आरामदायी ईव्ही कारवरील करात वाढ केली जाईल, असा एक अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात ईव्ही कारवर ५ टक्के इतका असल्याने टाटा हॅरियर ईव्ही व महिंद्रा एक्सईव्ही ९ ई या भारतीय कंपन्यांच्या कार किमती आटोक्यात असतील. शिवाय टेस्ला, मर्सिडीज-बेंझ, ऑडी, बीएमडब्लू, बीवायडी या सारख्या कंपन्याही स्वतःच्या प्रीमियम कारच्या किमती वाढवणार नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे. अधिक स्पष्ट व

सुलभ कररचनेमुळे उद्योग पर्यावरण अधिक दृढ होण्यास मदत होईल. ग्राहकाच्या गरजेनुसार त्याच्यापर्यंत उत्पादन पोहोचवता येईल, असे ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग धिल्लॉं म्हणाले.