संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगभरात सध्या एअरबस आणि बोइंग या दोन विमान उत्पादक कंपन्यांची मक्तेदारी आहे. अनेक दशकांपासून असलेल्या या दोन कंपन्यांच्या वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न चीनने सुरू केला आहे. चिनी बनावटीच्या ‘सी ९१९’या मोठ्या प्रवासी विमानाची व्यावसायिक चाचणी नुकतीच यशस्वी झाली. कमर्शियल एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ चायना (कोमॅक) या कंपनीने या विमानाची निर्मिती केली आहे. भविष्यात एअरबस आणि बोइंगला स्पर्धा निर्माण करण्याचा चीनचा मनसुबा आहे. त्यादृष्टीने चीनने टाकलेले पहिले पाऊल कितपत यशस्वी ठरेल?

‘सी ९१९’ ची पार्श्वभूमी कोणती?

चीनने याआधी ‘एआरजे २१’ या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या विमानाची निर्मिती केली होती. हे विमान २०१६ मध्ये सेवेत दाखल झाले. आता त्याचीच सुधारित आणि मोठी आवृत्ती म्हणजे ‘सी ९१९’ हे विमान चीनने तयार केले आहे. या विमानाची प्रवासी क्षमता आणि पल्ला आधीच्या विमानापेक्षा जास्त आहे. ‘कोमॅक’ कंपनीने या १६४ आसनी विमानाची निर्मिती केली आहे. सी ९१९ हे विमान २८ मे रोजी शांघायमधून हवेत झेपावले आणि ते राजधानी बीजिंगमध्ये उतरले. विमानात १३० प्रवासी होते. शांघाय ते बीजिंग हे अंतर विमानाने तीन तासांत पार केले.

इतर कंपन्यांशी स्पर्धा कशी?

चीनमधील सरकारी कंपनी चायना ईस्टर्न एअरलाइनने पाच नव्या विमानांची मागणी नोंदवली आहे. ‘कोमॅक’कडून पुढील पाच वर्षांसाठी वर्षाला १५० विमानांचे उत्पादन करण्याचे नियोजन आहे. कंपनीकडे आताच १ हजार २०० विमानांसाठी मागणी नोंदवण्यात आल्याचे ‘कोमॅक’चे म्हणणे आहे. मात्र, विश्लेषकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मागणी नोंदवण्याचे करार झालेले नसून, केवळ सहमतीपत्रे झाली आहेत, असा विश्लेषकांचा दावा आहे. असे असले तरी या विमानाची यशस्वीरीत्या व्यावसायिक चाचणी झाल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे चीनला शक्य होणार आहे. याचबरोबर विमानाची किंमत प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या विमानांपेक्षा कमी असल्याने त्यांना भविष्यात मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विश्लेषण: गगनचुंबी इमारतींमुळे न्यूयॉर्क बुडण्याची भीती?

सरकारकडून या विमानास प्राधान्य का?

‘सी ९१९’ विमानाच्या प्रतिकृतीच्या कॉकपिटमध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे काही वर्षांपूर्वी बसले होते. हा चीनचा अतिशय नावीन्यूपर्ण महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे उद्गार त्यांनी त्यावेळी काढले होते. ‘सी ९१९’ ची पहिली चाचणी २०१७ मध्ये झाली. त्यानंतर विमानाच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. या विमानाचे बाह्यरूप हे बोइंग ७३७ शी साधर्म्य असणारे आहे. पाश्चिमात्य कंपन्यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा चीनचा प्रयत्न आहे. चीन यात यशस्वी झाल्यास तो जागतिक पातळीवर विमान निर्मिती क्षेत्रातील सर्वांत मोठा पुरवठादार बनेल. यासाठी या प्रकल्पाला सरकारने राष्ट्राभिमानाशी जोडले आहे.

अमेरिकेवर अवलंबित्व कायम राहणार?

या विमानाच्या निर्मितीसाठी चीनने अमेरिकेतील कॉलिन्स एअरस्पेस, जीई एव्हिएशन आणि हनीवेल या कंपन्यांशी करार केले आहेत. चीनसारख्या मोठ्या बाजारपेठेत प्रवेशासाठी या कंपन्यांनी चीनच्या सरकारी कंपनीशी संयुक्त प्रकल्पात भागीदारी केली आहे. यामुळेच ‘सी ९१९’ विमानाचे ६० टक्के भाग या अमेरिकी कंपन्यांकडून पुरविले जात आहेत. चीनच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी सरकारकडून अनेक अटी घातल्या जातात. यात तुमचे तंत्रज्ञान आम्हाला द्या अथवा आमच्या तंत्रज्ञांना प्रशिक्षित करा, अशा अटी असतात. अखेर या कंपन्या संयुक्त भागीदारी करणे पसंत करतात, असा विश्लेषकांचा दावा आहे. याचवेळी चीनकडून हेरगिरीच्या माध्यमातून अनेक बौद्धिक संपदा हक्कांची चोरी होत असल्याचा दावाही अमेरिकेने केला होता.

विश्लेषण: ऑस्ट्रेलियात शिकायला जाताना काय काळजी घ्याल?

चीनच्या आंतरराष्ट्रीय विरोधकांचे आक्षेप काय?

चीनच्या सरकारी कंपनीने बनवलेले हे विमान अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचा दावा केला जात आहे. चीन ही विमानांसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ असून, त्यातून बोइंगला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे. या विमानाची निर्मिती चीनमध्ये झालेली असली तरी त्याचे ६० टक्के भाग हे परदेशातून आयात केलेले आहेत. अमेरिकानिर्मित तंत्रज्ञानाचा वापर या निमित्ताने चीनकडून त्यांच्या सैन्याच्या फायद्यासाठी होऊ शकतो. ‘सी ९१९’ हे विमान एअरबस ए-३२० आणि बोइंग ७३७ यांच्यासारखे दिसते. बौद्धिक संपदा हक्कांची चोरी करून चीनने या विमानाची निर्मिती केल्याचा दावाही विरोधक करीत आहेत. काहीही असले तरी पुढील काळात विमान निर्मिती क्षेत्रात चीनकडून मोठी उलथापालथ घडणार हे नक्की.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China making c 919 to challenge boing and airbus print exp pmw
First published on: 02-06-2023 at 12:43 IST