scorecardresearch

Premium

विश्लेषण: गगनचुंबी इमारतींमुळे न्यूयॉर्क बुडण्याची भीती?

ही शहरे समुद्रपातळीत होणाऱ्या वाढीमुळे वेगाने पाण्याखाली जात असून, त्यांच्यावरील इमारतींचा भार आता या शहरांनाच असह्य झाला आहे.

new york city
गगनचुंबी इमारतींमुळे न्यूयॉर्क बुडण्याची भीती? (फोटो – रॉयटर्स)

निमा पाटील

युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) या अमेरिकी संस्थेने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालांमध्ये न्यूयॉर्कबरोबरच जगभरातील अनेक महत्त्वाच्या शहरांना धोक्याचा इशारा दिला आहे. ही शहरे समुद्रपातळीत होणाऱ्या वाढीमुळे वेगाने पाण्याखाली जात असून, त्यांच्यावरील इमारतींचा भार आता या शहरांनाच असह्य झाला आहे. ही शहरे वाचवणे शक्य आहे का, याचा हा वेध.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

न्यूयॉर्कमध्ये पहिली गगनचुंबी इमारत कधी उभी राहिली?

टॉवर बिल्डिंग ही ११ मजली इमारत न्यूयॉर्कमधील पहिली मोठी इमारत मानली जाते. त्याचे बांधकाम २७ सप्टेंबर १८८९ रोजी पूर्ण झाले. पोलादी रचनेमुळे इतके उंच बांधकाम करण्यास यश आले होते. ही इमारत आता अस्तित्वात नाही, पण तिच्यामुळे न्यूयॉर्कमध्ये उंचच उंच इमारती बांधायला सुरुवात झाली, त्यात अजूनही खंड पडलेला नाही.

न्यूयॉर्क शहरात सिमेंट काँक्रीटचे जंगल किती?

‘यूएसजीएस’ संशोधकांच्या अंदाजानुसार, न्यूयॉर्क शहराच्या ७७७ चौरस किलोमीटर परिसरावर तब्बल ७ हजार ६२० टन इतक्या वजनाचे बांधकाम झाले आहे. त्यामध्ये काँक्रीट, काचा आणि पोलादाचा वापर करण्यात आला आहे. ही आकडेवारी काढताना बांधकाम साहित्याबद्दल सरसकटीकरण करण्यात आले आहे. मात्र, या बेसुमार सामग्रीमध्ये इमारतींमधील अंतर्गत बांधकाम, बसवलेल्या वस्तू आणि फर्निचर यांचा समावेश करण्यात आलेला नाही. या इमारतींना जोडणारी वाहतूकही त्यामध्ये गृहीत धरण्यात आलेली नाही आणि अर्थातच या इमारतींमधून राहणाऱ्या ८५ लाख लोकांनाही त्यात समाविष्ट केलेले नाही.

विश्लेषण: ऑस्ट्रेलियात शिकायला जाताना काय काळजी घ्याल?

या वजनाचा बांधकामाखालील जमिनीवर काय परिणाम होतो?

या हजारो टन बांधकाम आणि त्याव्यतिरिक्त इतर मानवनिर्मित वस्तू यांच्या वजनाचा बांधकामाच्या जमिनीवर असाधारण परिणाम होतो. ही जमीन वर्षाला १ ते २ मिलिमीटर (मिमी) या वेगाने पाण्याखाली जात आहे. त्याचे एक कारण त्यावरील इमारतींच्या वजनामुळे पडणारा दाब हेदेखील आहे. त्याच्या जोडीला वर्षाला ३ ते ४ मिमी इतक्या वाढणाऱ्या समुद्रपातळीमुळे जमीन खाली जाण्याचा वेग वाढत आहे. वरवर पाहता ही आकडेवारी फारशी गंभीर वाटणार नाही. पण काही वर्षांचा विचार केला तर त्याचे गांभीर्य जाणवेल. समुद्रकिनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली जाण्याची अनेक कारणे आहेत. मात्र, मानवनिर्मित पायाभूत सुविधांच्या वजनाचा जमिनीवर पडणारा दाब हे कारण सर्वांत महत्त्वाचे आहे. या पायाभूत सुविधांचे प्रमाण अवाढव्य आहे. २०२० मध्ये मानवनिर्मित वस्तूंचे एकूण वजन हे संपूर्ण सजीवांच्या एकत्रित वजनापेक्षा जास्त झाले.

न्यूयॉर्कची जमीन खचण्याची अन्य काही कारणे आहेत का?

अखेरचे हिमयुग संपुष्टात आले तेव्हापासून न्यूयॉर्क शहर हळूहळू पाण्याखाली जात आहे. अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील या भागाला ॲटलांटिक किनारपट्टी असेही म्हणतात. काही जमीन विस्तार पावत आहे, तर समुद्रकिनाऱ्यावरील काही भूभाग, न्यूयॉर्क शहर वसलेल्या भूभागासह, आता स्थिर होताना दिसत आहे. भूभागाला आलेल्या या शिथिलतेमुळे जमीन पाण्याखाली जाते, अशी माहिती ‘यूएसजीएस’च्या पॅसिफिक कोस्टल अँड मरीन सायन्स सेंटरमधील संशोधक आणि या अहवालाच्या चार लेखकांपैकी एक असलेले टॉम पार्सन्स यांनी दिली. मात्र, शहरावर उभ्या राहिलेल्या अवाढव्य बांधकामाच्या वजनामुळे जमीन खचण्याचा वेग वाढत आहे, असे ते सांगतात.

हे संकट केवळ न्यूयॉर्क शहरापुरते आहे का?

या घडामोडी केवळ न्यूयॉर्कपुरत्या मर्यादित नाहीत. न्यूयॉर्क हे शहर अमेरिकेतील आणि जगभरातील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या आणि स्थलांतरामुळे लोकसंख्या वाढत असलेल्या, भरपूर शहरीकरण झालेल्या आणि वाढत्या समुद्रपातळीचा सामना करणाऱ्या शहरांचे प्रतिनिधित्व करत असल्याचे म्हणता येईल. इंडोनेशियामधील जाकार्तासारखी शहरे इतर शहरांच्या तुलनेत वेगाने पाण्याखाली जात आहेत. काही शहरांचा पाण्याखाली जाण्याचा वेग वर्षाला काही सेंटिमीटर इतका जास्त आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ऱ्होडचे समुद्रशास्त्राचे प्राध्यापक स्टीव्हन डी’होंड यांनी ही माहिती दिली. याच वेगाने जमीन खचत राहिली तर या शहरांना अपेक्षेपेक्षा लवकर गंभीर पूरस्थितीचा सामना करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

विश्लेषण : प्रशांत महासागरातील बेटराष्ट्रांचे महत्त्व अचानक का वाढले? मोदी यांच्या दौऱ्यामुळे चीनला शह मिळणार?

अन्य शहरांचा खचण्याचा वेग किती?

आग्नेय आशियातील शहरांमध्ये खचण्याचा वेग अधिक असल्याचे दिसून येते. जाकार्ताचा काही भाग वर्षाला २ ते ५ सेंमी या वेगाने पाण्याखाली जात आहे. त्याबरोबरच फिलिपाइन्सची राजधानी मनिला, बांगलादेशमधील शहर चितगाव, पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची आणि चीनमधील तियानजिन ही शहरे चिंताजनक वेगाने खचत आहेत. परिणामी या शहरांमध्ये पायाभूत सुविधांचे नुकसान आणि वारंवार उद्भवणारी पूरस्थिती या संकटांचा सामना करावा लागतो. इंडोनेशियातील सेमारंगचा मोठा भाग वर्षाला २ ते ३ सेंमी या वेगाने खचत आहे, तर फ्लोरिडातील टॅम्पा बेच्या उत्तरेचा एक लक्षणीय भाग वर्षाला ६ मिमी या वेगाने खचत आहे. समुद्रकिनाऱ्यावर नसलेले तरीही वेगाने खचणारे आणखी एक शहर म्हणजे मेक्सिको सिटी. हे शहर वर्षाला ५० सेंमी इतक्या प्रचंड वेगाने खचत आहे. हे शहर स्पेनच्या ताब्यात असताना त्यांनी भूजलाचा वारेमाप उपसा केला, त्याचा हा परिणाम आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, मेक्सिको शहराचे उपशमन (खचणे) थांबण्यासाठी तब्बल १५० वर्षे वाट पाहावी लागेल आणि तोपर्यंत हे शहर जवळपास ३० मीटर इतके खचलेले असेल.

शहरे खचण्याची अन्य कारणे कोणती?

जमीन खचण्याची प्रक्रिया ही काही प्रमाणात नैसर्गिक आहे. मात्र, मानवाच्या जीवनशैलीमुळे त्याचा वेग वाढू शकतो. केवळ इमारतींचे वजनच नाही, तर भूजलाचा उपसा आणि तेल व नैसर्गिक वायूसाठी जमिनीत खोलवर खोदकाम करणे या जीवनावश्यक वाटणाऱ्या कृती प्रत्यक्षात धोकादायक आहेत. मात्र, शहरागणिक याचे तुलनात्मक प्रमाण बदलते. त्यामुळे नक्की कोणत्या घटकामुळे किती प्रमाणात जमीन खचते हे समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे आव्हानात्मक आहे.

यावर उपाय काय?

जमिनीवर इमारतींचे बांधकाम पूर्ण थांबवणे हा अव्यवहार्य उपाय आहे. बांधकामानंतर एक ते दोन वर्षांनी इमारतींखालील जमीन स्थिर होते. इमारतींचे बांधकाम थांबवणे हा व्यवहार्य उपाय नसला तरी दुसरा उपाय काही प्रमाणात तरी करता येईल. भूजलाचा उपसा आणि भूगर्भातील पाण्याचा उपसा कमी वेगाने केल्यास त्याचाही फायदा होईल. यासाठी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे असे डी’होंड सुचवतात. आगामी काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षमतांचे होणारे नुकसान टाळता येईल. त्यासाठी आताच नियोजन केले पाहिजे, असा सल्ला ते देतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tall buildings in new york may cause the city be submerged print exp pmw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×