China S-400 Air Defense System : रशियन बनावटीची S-400 हवाई संरक्षण प्रणाली, ही जगातील सर्वात प्रगत प्रणालींपैकी एक मानली जाते. भारत आणि चीनसह अनेक देशांच्या लष्करी रणनीतीचा ती एक भाग झाली आहे. भारताच्या अलीकडील ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान या प्रणालीच्या जबरदस्त अचूकतेची आणि लांब पल्ल्याच्या क्षमतेची प्रभावी झलक पाहायला मिळाली, ज्यामुळे तिचे सामर्थ्य पुन्हा अधोरेखित झाले. दरम्यान, चीनकडे असलेली संरक्षण प्रणाली ही भारताच्या प्रणालीपेक्षा दुप्पट शक्तिशाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे बीजिंगच्या या प्रणालीला भेदण्यासाठी किंवा ती निष्क्रिय करण्यासाठी भारताकडून नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष दिलं जात आहे. त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…

हवाई संरक्षण प्रणाली म्हणजे काय?

हवाई संरक्षण प्रणालीला इंग्रजीत एअर डिफेन्स सिस्टिम असं म्हटलं जातं. शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून देशाचं संरक्षण करणारी ही एक यंत्रणा असते. शत्रूकडून होणारे हवाई हल्ले किंवा डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना ही प्रणाली हवेत दूरवर असतानाच टिपते. त्याचबरोबर ठराविक टप्प्यात आल्यानंतर जमिनीवरून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांद्वारे ती शत्रूची आक्रमणे हवेतच नष्ट करते. बीबीसीच्या वृत्तानुसार, जमिनीवरून हवेत हल्ला करणारी क्षेपणास्त्रं, हवेतली हालचाल टिपणारी रडार, जॅमर्स आणि नागरिकांना हवाई हल्ल्याची सूचना देणाऱ्या सायरन्स या सगळ्या यंत्रणा मिळून हवाई संरक्षण प्रणाली तयार केली जाते.

चीनची S-400 क्षेपणास्त्र प्रणाली किती शक्तिशाली?

  • अहवालानुसार, चीनकडे S-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या एकूण ६ स्क्वाड्रन्स उपलब्ध आहेत.
  • चीनने ही अत्याधुनिक प्रणाली २०१४ मध्ये रशियाकडून सुमारे तीन अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केली होती.
  • २०१८ पासून या प्रणालीच्या पुरवठ्याला सुरुवात झाली आणि आता सर्व सहा स्क्वाड्रन्स पूर्णपणे तैनात करण्यात आले आहेत.
  • चीनकडून हे युनिट्स रणनीतीपूर्वक तैनात करण्यात आले असून त्यापैकी काही भारताच्या सीमेलगतच्या भागांमध्येदेखील आहेत.
  • S-400 प्रणालीची मारक क्षमता सुमारे ४०० किलोमीटर आहे आणि ती कोणत्याही प्रकारच्या हवाई हल्ल्यांना रोखण्यास सक्षम आहे.
  • स्टेल्थ फायटर जेट्स, क्रूझ मिसाईल्स आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांना रोखण्यासाठी ही प्रणाली अत्यंत सक्षम मानली जाते.
  • काही अहवालांनुसार चीनने या प्रणालीमध्ये काही गोपनीय सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे तिच्या कार्यक्षमतेत आणखी वाढ झाली आहे.
  • सध्या चीनकडून S-400 संरक्षण प्रणालीचे युनिट्स प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तसेच दक्षिण चीन समुद्र परिसरात तैनात करण्यात आले आहेत.
  • चीनच्या सुरक्षात्मक आणि विस्तारवादी धोरणांचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

आणखी वाचा : अहमदाबाद विमान अपघात नेमका कशामुळे झाला? अहवालात काय म्हटलंय?

भारताकडे किती S-400 प्रणाली आहेत?

भारताने चीननंतर S-400 हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि २०१८ मध्ये रशियासोबत सुमारे ३५ हजार कोटींचा करार केला. या कराराअंतर्गत भारताने हवाई संरक्षण प्रणालीचे पाच स्क्वाड्रन्स खरेदी करण्याचे ठरवले होते. सध्या भारताला तीन स्क्वॉड्रन्स मिळाल्या असून, उर्वरित दोन स्क्वाड्रन्सचे वितरण रशिया-युक्रेन युद्धामुळे प्रलंबित आहे. रशियाने भारताला आश्वासन दिले आहे की, उर्वरित दोन स्क्वॉड्रन्स २०२६ पर्यंत भारतात पोहोचवले जातील. यातील पहिला स्क्वाड्रन्स पंजाब रेजिमेंटकडे देण्यात आला आहे, जो उत्तर भारतातील पाकिस्तान सीमेच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येतो, तर दुसरा स्क्वॉड्रन आसाममध्ये आणि तिसरा राजस्थानमध्ये तैनात करण्यात आला आहे.

चीनकडे S-400 हवाई संरक्षण प्रणालीच्या एकूण ६ स्क्वाड्रन्स उपलब्ध आहेत.

भारताकडे चीनपेक्षाही अधिक सुरक्षित हवाई प्रणाली

अहवालांनुसार, भारताकडे असलेली S-400 हवाई प्रणाली ही चीनच्या तुलनेत अधिक प्रगत तंत्रज्ञानयुक्त आहे. या प्रणालीमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या ३६ धोक्यांना लक्ष्य करण्याची क्षमता आहे. भारताने ही प्रणाली स्थानिक गरजेनुसार सुधारित करून त्याला ‘सुदर्शन चक्र’ असे नाव दिले आहे. या सुधारित प्रणालीमध्ये संरक्षण क्षमतांना आणखी मजबूत करण्यासाठी त्यात काही विशेष वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. S-400 ची ही प्रगत प्रणाली भारताच्या हवाई सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा भाग ठरताना दिसून येत आहे.

हेही वाचा : चीनमध्ये आता विना व्हिसा एंट्री, या ७४ देशांना दिली परवानगी; भारताचं नाव आहे की नाही? काय आहेत नियम?

भारतासमोरची आव्हानं आणि त्यावरील उपाययोजना काय आहेत?

S-400 सारख्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालीला भेदणं हे अत्यंत कठीण असलं तरी अशक्य नाही, यासाठी अत्यंत प्रगत क्षेपणास्त्रांची गरज असते. याच पार्श्वभूमीवर भारताने दीर्घ पल्ल्याच्या लँड अ‍ॅटॅक क्रूझ मिसाईल्स (LRLACM) विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाद्वारे (DRDO) विकसित केली जात असलेली ही ड अ‍ॅटॅक क्रूझ मिसाईल्स सुमारे १००० ते १५०० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात मारा करू शकते. विशेष बाब म्हणजे, ही मिसाईल्स अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. १२ नोव्हेंबर २०२४ मध्ये भारताने या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली आहे. ही प्रणाली भारताच्या ‘निर्भय’ क्षेपणास्त्राची सुधारित आणि अधिक प्रगत आवृत्ती आहे. या प्रकल्पाची सुरुवात जुलै २०२० मध्ये झाली असून, २०२५ च्या अखेरीस ती भारतीय संरक्षण दलांना सुपूर्द केली जाण्याची शक्यता आहे. भारताची लँड अ‍ॅटॅक क्रूझ मिसाईल्स ही चीनकडे असलेल्या S-400 सारख्या संरक्षण कवचाला भेदू शकते, असं सांगितलं जात आहे.

LRLACM क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये काय?

भारताच्या दीर्घ पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रामध्ये अनेक अत्याधुनिक वैशिष्टे आहेत. यातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यामध्ये अत्यंत कमी उंचीवरून उड्डाण करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे हे क्षेपणास्त्र सहजासहजी शत्रूच्या रडारवर येत नाही. या क्षेपणास्त्राची रचना स्टेल्थ डिझाइन, प्रगत एव्हिओनिक्स आणि अत्यंत अचूक मार्गदर्शन प्रणालीसह करण्यात आली आहे, त्यामुळे S-400 सारख्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालींना भेदण्याची त्यामध्ये क्षमता आहे. याशिवाय, या क्षेपणास्त्रामध्ये इलेक्ट्रॉनिक काउंटरमेजर्स आणि डिकॉईज बसवण्यात आले आहेत, जे S-400 च्या ट्रॅकिंग व लक्ष्य भेदण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण करतात. भारताने क्रूझ क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केल्यास चीनच्या S-400 प्रणालीवर मोठा ताण येऊन ती निष्क्रिय होण्याची शक्यता वाढते. हीच बाब लक्षात घेता भारतीय लष्कराकडून अशा प्रकारची रणनीती आखली जात असल्याचं संरक्षण विश्लेषकांचे म्हणणं आहे.