Devendra Fadnavis on Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ‘बीए’ आणि ‘बॅरिस्टर’ ही पदवी ब्रिटिशांनी काढून घेतली होती. त्यापैकी ‘बीए’ची पदवी मुंबई विद्यापीठाने परत केली आहे. मात्र, वीर सावरकरांचा सन्मान असलेली ‘बॅरिस्टर’ ही पदवी परत मिळालेली नाही. ती परत मिळविण्यासाठी इंग्लंडमधील प्रशासनाशी आवश्यक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास आणि संशोधन केंद्रा’च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. त्याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांची बॅरिस्टर ही पदवी ब्रिटिशांनी का काढून घेतली होती, या पदवीचे नेमके महत्त्व काय होते, याचा घेतलेला हा आढावा.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ‘बीए’ आणि ‘बॅरिस्टर’ पदवी ब्रिटिशांनी का काढून घेतली?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी बीए (Bachelor of Arts) ही पदवी मिळवली होती आणि इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी कायद्याचा अभ्यास करत होते. मात्र, ब्रिटिश सरकारने त्यांच्या बीए आणि बॅरिस्टर या दोन्ही पदव्या रद्द केल्या होत्या. ब्रिटिशांविरोधातील चळवळीत स्वातंत्रवीर सावरकर सक्रिय असल्याने ब्रिटिशांनी ही कारवाई केली होती. सावरकरांची लंडनमधील इंडिया हाउसशी असलेली संलग्नता तसेच ब्रिटिशविरोधी प्रचार व सशस्त्र उठाव घडवून आणल्याचा आरोप ब्रिटिशांकडून करण्यात आला होता. सावरकर यांचं नाव ब्रिटिश अधिकारी कर्झन वायली यांच्या राजकीय खुनाशी जोडलं गेलं आणि त्यानंतर त्यांना अटक करून भारतात पाठवण्यात आलं. त्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पदव्या काढून घेतल्या. ही शिक्षेची कारवाई त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि एका सुशिक्षित भारतीय क्रांतिकारक म्हणून त्यांच्या प्रभावाला आळा घालण्यासाठी करण्यात आली होती.
बॅरिस्टर पदवी म्हणजे काय?
बॅरिस्टर ही एक व्यावसायिक कायदेशीर पदवी आहे. ही पदवी विशेषतः ब्रिटन आणि इतर कॉमन लॉ प्रणाली अवलंबणाऱ्या देशांमध्ये दिली जाते. ही पदवी मिळवणारी व्यक्ती न्यायालयात वकिली करण्यास पात्र ठरते. ब्रिटिश व्यवस्थेनुसार बॅरिस्टर आणि सॉलिसिटर असे कायद्याचे दोन प्रमुख प्रकारचे व्यावसायिक असतात. सॉलिसिटर हे अशिलांशी थेट संवाद साधून कागदोपत्री कामकाज करतात, तर बॅरिस्टर हे प्रामुख्याने न्यायालयात तर्कशुद्ध युक्तिवाद करतात आणि विशेषतः उच्च न्यायालयांमध्ये खटले लढवतात. बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडमधील ‘इन्स ऑफ कोर्ट’ (Lincoln’s Inn, Gray’s Inn, Inner Temple, Middle Temple) यांपैकी एखाद्या संस्थेत प्रवेश घेऊन ‘बार’ परीक्षेत यश मिळवावे लागते. त्यानंतर ‘प्यूपिलेज’ नावाचा एक वर्षाचा सराव कालावधी पूर्ण करून व्यक्तीला ‘बार’मध्ये प्रवेश दिला जातो आणि तो अधिकृत बॅरिस्टर होतो.
ब्रिटिश राजवटीतील भारतात बॅरिस्टर पदवीला फार मोठे महत्त्व होते. इंग्लंडहून बॅरिस्टर होऊन परतलेल्या व्यक्तीला भारतीय समाजात अत्यंत प्रतिष्ठित मानले जात होते. या पदवीमुळे त्यांना उच्च न्यायालयात वकिली करता येत असे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मोहम्मद अली जिना, पं. नेहरू हे सर्व बॅरिस्टर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात अशा पदव्या केवळ शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक व राजकीय प्रभावाचेही प्रतीक ठरल्या होत्या. थोडक्यात, त्या कालखंडात बॅरिस्टर पदवी म्हणजे फक्त कायद्याचा अभ्यास नाही, तर ती एका उच्च दर्जाच्या शिक्षणाची, वकिलीतील कौशल्याची आणि समाजात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होती.
ब्रिटिश भारतातील बॅरिस्टर पदवीचे महत्त्व
ब्रिटिश भारतात बॅरिस्टर पदवी मिळवणे हे केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जात होते. याचे काही महत्त्वाचे पैलू पुढीलप्रमाणे आहेत.
- उच्च शिक्षण आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक
इंग्लंडहून बॅरिस्टर पदवी मिळवलेली व्यक्ती विद्वान आणि आधुनिक विचारांची मानली जात असे. अशा व्यक्तींना भारतीय आणि ब्रिटिश समाजातही आदराने पाहिले जात होते. ही पदवी बुद्धिजीवी वर्गाची द्योतक मानली जात असे.
- कायदेशीर अधिकार आणि करिअरच्या संधी
बॅरिस्टरना उच्च न्यायालयांमध्ये, अगदी प्रिव्ही कौन्सिलपर्यंत वकिली करण्याचा अधिकार असे. ते अनेकदा न्यायाधीश, कायदेशीर सल्लागार किंवा वरिष्ठ वकील अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असत, त्यामुळे ही पदवी अत्यंत प्रभावशाली मानली जात होती. भारतीय बॅरिस्टर्सनी शिक्षणातून लोकशाही, न्याय, अधिकार यासारख्या पाश्चात्त्य राजकीय संकल्पनांचा अभ्यास केला आणि त्याचा वापर ब्रिटिश सत्तेविरोधात केला. बॅरिस्टर भारतात लागू असलेल्या ब्रिटिश कायद्यांची नीट समज घेऊन त्या अनुषंगाने कायदेतज्ज्ञ आणि समाज यांच्यातील दुवा होते. त्यामुळे कायद्यात सुधारणा सुचवणे किंवा सार्वजनिक वादांमध्ये सक्रिय सहभाग घेणे त्यांच्यासाठी सोपे होते.
- राष्ट्रवादी चळवळीचे व्यासपीठ
बॅरिस्टर झालेल्या शिक्षित भारतीयांनी आपले कायदेज्ञान वापरून अन्यायकारक वसाहती कायद्यांविरुद्ध लढा दिला आणि राजकीय कैद्यांचा बचावही केला. त्यांच्याकडे असलेल्या प्रतिष्ठेमुळे ते जनमत घडवू शकले आणि व्यापक लोकचळवळीचे नेतृत्व करू शकले. थोडक्यात, ब्रिटिश भारतात बॅरिस्टर होणे ही फक्त कायदेशीर पात्रता नव्हती, तर ती एक राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक ताकद होती.