राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हा शोधून काढतात. आता त्यांनी ‘पोस्टल स्कॅम’ नावाने फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे. टपालाने किंवा कुरिअर कंपनीकडून वस्तू मागवणाऱ्यांना त्यांच्याकडून लक्ष्य केले जात आहे.
‘पोस्टल स्कॅम’ काय आहे ?
ऑनलाइन वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मानसिकतेचा आणि वस्तू पुरवठादार कंपन्यांच्या कामाचा अभ्यास करून सायबर गुन्हेगारांनी त्याचा फसवणुकीसाठी वापर करणे सुरू केले. त्याला ‘पोस्टल स्कॅम’ म्हणून ओळखले जाते. ऑनलाइन मागवलेली वस्तू घेऊन येणारा ‘डिलिव्हरी बॉय’ घरी येऊन परत गेला, अशी बतावणी करून ग्राहकांची फसवणूक केली जाते. अशा प्रकारे फसवणुकीच्या अनेक तक्रारी राज्यभरातील सायबर पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत.
कोणते ग्राहक ठरतात बळी?
सध्या ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक जण दररोज किरकोळ वस्तूंसह खाद्यपदार्थसुद्धा ऑनलाइन मागवतात. कोणतीही वस्तू ऑनलाइन शॉपिंग करताना ग्राहकांना ती प्राप्त करण्यासाठी घराचा पत्ता, पिन कोड, स्वतःचा मोबाइल क्रमांक आणि प्लॉट क्रमांकासह फ्लॅट क्रमांकही ॲपवर नोंदवावा लागतो. अनेकदा एखादी वस्तू ऑनलाइन संकेतस्थळावरून किंवा शॉपिंग ॲपवरून खरेदी केली असता दोन ते चार दिवसांत घरी पोहचते. हीच बाब सायबर गुन्हेगारांच्या टोळींनी हेरली. त्यातूनच ‘स्मिशिंग ट्रायड’ म्हणजेच ‘पोस्टल स्कॅम’या फसवणुकीच्या नवीन प्रकाराचा उगम झाला. सर्वाधिक फसवणूक ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांची झाली आहे.
सणासुदीच्या दिवसांची निवड का ?
रक्षाबंधनापासून ते दिवाळीपर्यंत सणासुदीचे दिवस असल्याने विशेष करून महिला वर्ग सर्वाधिक ऑनलाइन शॉपिंग करतात. घरातील किराणापासून सौंदर्य प्रसाधनाच्या साहित्यापर्यंत ऑनलाइन खरेदी केली जाते. तसेच राखीपासून ते घरगुती सामानापर्यंत एकमेकांना वस्तू कुरिअरने पाठवल्या जातात. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या सणासुदीच्या दिवसांत अचानक वाढते. त्यामुळे या काळात सायबर गुन्हेगार अधिक सक्रिय होतात.
अशी केली जाते फसवणूक…
ऑनलाइन वस्तू मागवल्यानंतर ग्राहकाला फोन येतो. कुरिअर/ डिलिव्हरी/ पार्सल पोहचवणारा कर्मचारी तुमच्या घरी वस्तू घेऊन आला होता. तुमच्या घराची बेल वाजवली पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पार्सल परत पाठवण्यात येत आहे. पार्सल हवे असेल तर पार्सल पोहचवणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मोबाइलवर फोन करा, असे सांगण्यात येते. ग्राहक पार्सल मिळवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला फोन करतात. तो कर्मचारी त्यांना एक लिंक पाठवतो. त्यामध्ये दिलेली माहिती भरण्यास सांगतो किंवा ॲप डाऊनलोड करण्यास सांगतो. ग्राहकाने लिंकवर क्लिक केल्यानंतर भ्रमणध्वनीचा ताबा सायबर गुन्हेगाराकडे जातो. काही तासांतच ग्राहकांचे बँक खाते रिकामे केले जाते.
हेही वाचा : बुलेटप्रूफ ग्लास ते पॅनिक बटण; अमेरिकेत सुरक्षित मतदानासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत?
सायबर गुन्हेगारांकडे ग्राहकांची माहिती कशी?
वारंवार ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या किंवा सतत खाद्यपदार्थ मागवणाऱ्या ॲपवर सक्रिय असणाऱ्या ग्राहकांना या ‘स्कॅम’मध्ये अडकवण्यााचा प्रयत्न केला जातो. या ग्राहकांचे भ्रमणध्वनी क्रमांक, ग्राहकांची ओळख आणि सदनिकेचा पत्तासुद्धा ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांकडे असतो. तसेच त्यांच्याकडे ग्राहकाने कोणत्या वस्तूंची कधी मागणी केली आणि ती कधी येणार याबाबतही माहिती असते. वेगवेगळ्या ॲपचे संचालन करणाऱ्या कंपन्याच ग्राहकांचा डेटा (मोबाइल क्रमांक, पत्ता, ऑर्डर केलेली वस्तू आणि डिलेव्हरी तारीख) सायबर गुन्हेगारांना पुरवत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
‘पोस्टल स्कॅम’चे केंद्र कुठे आहे?
सायबर गुन्हेगारांसाठी झटपट पैसा कमावण्यासाठी अगदी सोपा असलेला ‘पोस्टल स्कॅम’ देशभरात सुरू आहे. या फसवणुकीच्या प्रकाराचे केंद्र हरियाणा, राजस्थान, जामतारा, नोएडा आणि दिल्ली या भागांत आहे. सर्वाधिक टोळ्या जामतारा आणि दिल्ली शहरात सक्रिय असून संपूर्ण देशभरात जाळे आहे. सायबर गुन्हेगारांनी यात अनेक तरुणींना सहभागी करून घेतले असून त्यांच्याकडे केवळ ‘टेलिकॉलिंग’ची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा : रशियन सैन्याविरोधात युद्धात उतरणाऱ्या युक्रेनच्या ‘बुचा विचेस’ कोण आहेत?
पोलिसांची भूमिका काय?
‘पोस्टल स्कॅम’मध्ये अडकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कुरिअर कर्मचाऱ्यांच्या नावाचा गैरवापर सायबर गुन्हेगार करतात. प्रत्यक्षात या स्कॅमचे नाव पोस्टल स्कॅम असले तरी त्याचा टपाल खात्याशी किंवा नोंदणीकृत कुरिअर कंपन्यांशी कोणताही संबंध नसतो. गुन्हेगार फक्त त्यांच्या नावाचा गैरवापर करतात. त्यामुळे ग्राहकांनी कुणीही पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नये. पार्सल पोहचवण्याची जबाबदारी कुरिअर कंपन्यांची असते. त्यामुळे परत गेलेले पार्सल पुन्हा मिळू शकते. सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाल्यास लगेच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करणे आवश्यक ठरते.
© The Indian Express (P) Ltd