यूएईच्या अरबी वाळवंटात वसलेल्या दुबईत पावसाने कहर केला. दुबईमध्ये दीड वर्षात जितका पाऊस पडतो, तितका पाऊस एका दिवसात पडला. त्यामुळे दुबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमुळे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, शाळा बंद आहेत, ऑफिसला जाणारे लोक घरून काम करत आहेत. संपूर्ण दुबई मुसळधार पावसाने ठप्प झाली आहे. दुबई जगातील सर्वात स्मार्ट शहरांपैकी एक आहे आणि आपल्या तीव्र तापमानासाठी दुबईला ओळखले जाते. मात्र, मंगळवारी मुसळधार पावसाने या शहराला झोडपून काढले.

वाळवंटात वसलेल्या शहरात ७५ वर्षांतील सर्वात जास्त पाऊस झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळ हवामान निरीक्षणांनुसार, सुमारे चार इंच (१०० मिमी) पाऊस केवळ १२ तासांच्या कालावधीत पडला, जो दुबईच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या समतुल्य आहे. दुबईमध्ये इतका पाऊस कसा झाला? याला यूएईने तयार केलेला कृत्रिम पाऊस कारणीभूत आहे का? खरंच दुबईला कृत्रिम पावसाची आवश्यकता आहे का? याबद्दल सविस्तर समजून घेऊ या.

यूएईच्या अरबी वळवंटात वसलेल्या दुबईत पावसाने कहर केला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का?

दुबईमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याचे कारण काय?

हवामानशास्त्रज्ञ कॉलिन मॅककार्थी यांनी ‘इकॉनॉमिक टाईम्स’ला सांगितले की, दुबईत एका दिवसात पडलेल्या पावसाचे प्रमाण साधारणपणे दीड वर्षाच्या कालावधीत पडणाऱ्या पावसाच्या बरोबरीचे आहे. पर्शियन गल्फच्या पाण्यापासून तयार झालेले वादळ या परिस्थितीस कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हवामानशास्त्रज्ञ फ्रेडरिक ओट्टो म्हणाले की, यूएई आणि इतर प्रदेशांमध्ये होणार्‍या अतिवृष्टीला ग्लोबल वॉर्मिंगदेखील कारणीभूत आहे. “ओमान आणि दुबईतील विध्वंसक पाऊस बदलत्या वातावरणामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी सांगितले. दुबईसह यूएईच्या इतर भागांमध्ये क्लाउड सीडिंगमुळे पाऊस झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दुबईसह यूएईच्या इतर भागांमध्ये क्लाउड सीडिंगमुळे पाऊस झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

यूएईला कृत्रिम पावसाची गरज का आहे?

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) वार्षिक सरासरी २०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. उन्हाळ्याच्या महिन्यांत देशातील तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते, ज्यामुळे पाणी संकट उद्भवते. भूजल स्रोतांवर देश मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याने, त्याचा जलस्रोतांवर ताण येतो. या महत्त्वाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी यूएईने क्लाउड सीडिंगद्वारे कृत्रिम पावसाच्या निर्मितीचा उपाय शोधला. क्लाउड सीडिंग म्हणजे नेमके काय आणि कृत्रिम पाऊस कसा तयार होतो, हेदेखील जाणून घेऊ या.

क्लाउड सीडिंग म्हणजे काय?

क्लाउड सीडिंग हे एक अत्याधुनिक तंत्र आहे. यामध्ये ढगात मोठ्या आकाराचे बीजारोपण करून नैसर्गिकरीत्या पडणार्‍या पावसाची प्रक्रिया केली जाते. यूएईच्या नॅशनल सेंटर ऑफ मेटिऑरॉलॉजी (एनसीएम) मधील हवामान अंदाजकर्त्यांनी वातावरणातील परिस्थितीचे निरीक्षण करून आणि बीजारोपण करण्यासाठी योग्य ढग ओळखून ही प्रक्रिया केली आहे. नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक रिसर्च (एनसीएआर) आणि नासासारख्या प्रतिष्ठित संस्थेसह केलेल्या संशोधनाद्वारे यूएईने २००० च्या दशकाच्या सुरुवातीस क्लाउड सीडिंगची सुरुवात केली. रेन एन्हांसमेंट प्रोग्राम (UAEREP) अंतर्गत एनसीएमच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांनी प्रभावी बीजन एजंट ओळखण्यासाठी यूएईच्या वातावरणातील भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचे विश्लेषण केले.

नॅशनल सेंटर ऑफ मेटिऑरॉलॉजी (एनसीएम) (छायाचित्र-रॉयटर्स)

कृत्रिम पाऊस कसा तयार होतो?

क्लाउड सीडिंग प्रक्रियेत हायग्रोस्कोपिक फ्लेअर्स असलेली विमाने ढगांमध्ये पाठवली. मिठाच्या स्वरूपाचे हे फ्लेअर्स ठरलेल्या ढगांमध्ये टाकले जातात. विमानाद्वारे ढगांमध्ये फवारलेले कण ढगात पसरतात. ढगातील बाष्प शोषून घेतल्यामुळे पाण्याचे थेंब एकत्र होतात आणि ढगातून पाऊस पडू लागतो. “एनसीएमने हवामान निरीक्षणासाठी ८६ स्वयंचलित हवामान केंद्रे (AWOS), संपूर्ण यूएईला कव्हर करणारे सहा हवामान रडार आणि एक अप्पर एअर स्टेशनचे नेटवर्क स्थापित केले आहे. त्यासह यूएईने अचूक हवामानाचा अंदाज देणारे सिम्युलेशन सॉफ्टवेअरदेखील विकसित केले आहे”, असे यूएईच्या रेन एन्हांसमेंट प्रोग्राम (UAEREP) मध्ये सांगितले आहे.

यूएईने अचूक हवामानाचा अंदाज देणारे सिम्युलेशन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

सध्या, एनसीएम हे अल ऐन विमानतळावरून चार बीचक्राफ्ट किंग एअर सी९० विमाने चालवते, ज्यात क्लाउड सीडिंग आणि वातावरणीय संशोधनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे आहेत.

कृत्रिम पाऊस पर्यावरणासाठी सुरक्षित आहे का?

क्लाउड सीडिंग ही प्रक्रिया पावसाचे प्रमाण वाढवू शकते, परंतु यामुळे पर्यावरणीय समस्यादेखील उद्भवू शकतात. पावसाचे पाणी वाहून नेणे, पूर येणे आणि सीडिंग एजंट्सचा परिसंस्थेवर होणारा दीर्घकालीन परिणाम याबाबत यापूर्वीदेखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, क्लाउड सीडिंगमुळे इतरत्र संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

दुसरे म्हणजे ज्या प्रदेशांमध्ये क्लाउड सीडिंगची प्रक्रिया केली जाते तिथे पायाभूत सुविधांचा अभाव असल्यास अडचणी येतात. अतिरिक्त पावसाचा ओघ व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव असतो; ज्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन, मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यूएईचा शेजारी देश असलेल्या ओमानमधील अलीकडील एका घटनेने ही चिंता खरी ठरवली. ओमानमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला, ज्यात राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीनुसार यात १८ लोकांनी आपला जीव गमावला. विशेष म्हणजे ओमाननेदेखील पर्जन्यवृष्टी वाढविण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्राचा वापर केला आहे. हा पाऊस बहारीन, कतार आणि सौदी अरेबियातही पडला. क्लाउड सीडिंगमध्ये सिल्व्हर आयोडाइडसारख्या पदार्थांचा वापर होत असल्याने शास्त्रज्ञ क्लाउड सीडिंगशी संबंधित दीर्घकालीन परिणामांबद्दल चिंता व्यक्त करतात.

क्लाउड सीडिंग ही प्रक्रिया पावसाचे प्रमाण वाढवू शकते, परंतु यामुळे पर्यावरणीय समस्या उद्भवू शकतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

सिल्व्हर आयोडाइड हे रसायन महासागरातील परिसंस्थेवर, ओझोन थरावर आणि वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडच्या पातळीवर परिणाम करू शकतात. सिल्व्हर आयोडाइडमुळे वनस्पती, प्राणी आणि माणसांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. याचे नुकसान पाहता क्लाउड सीडिंग प्रक्रियेची सुरक्षितता आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी युएईने इतर उपायांचा अवलंबही केला आहे. यूएई काही ठिकाणी सिल्व्हर आयोडाइड वापरण्याऐवजी नैसर्गिक क्षारांचा वापर सीडिंग एजंट म्हणून करत आहे; ज्यामुळे पर्यावरणीय संकट कमी होते.

हेही वाचा : ‘आयुष्मान भारत’ सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवणार – भाजपाचे आश्वासन; याचे महत्त्व काय?

इतर राष्ट्रे कृत्रिम पाऊस वापरतात का?

२००८ च्या ऑलिम्पिकदरम्यान, बीजिंगच्या नॅशनल वेदर मॉडिफिकेशन ऑफिसच्या विभागाद्वारे बर्ड्स नेस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयकॉनिक ओपन-एअर ऑलिम्पिक स्टेडियमवरील पाऊस रोखण्यासाठी क्लाउड सीडिंगचा वापर करण्यात आला होता. त्यासाठी बीजिंगच्या हवामान बदल कार्यालयाने उपग्रह, विमान, रडार प्रणाली आणि IBM p575 सुपर कॉम्प्युटर यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. या सुपर कॉम्प्युटरने ४४ हजार स्क्वेअर किलोमीटर (१७ हजार स्क्वेअर मैल) पसरलेल्या विशाल क्षेत्राचे एक मॉडेल तयार केले होते. रशिया आणि युनायटेड किंगडममध्येही क्लाउड सीडिंगचा प्रयोग करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वीदेखील उष्णतेपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी चीनने कृत्रिम पावसाची मदत घेतली होती. चीनमधील काही भागांत साठ वर्षांतील सर्वात भीषण उष्णता पाहायला मिळाली होती, ज्यामुळे चीनने क्लाउड सीडिंगचा निर्णय घेतला.