डोळ्यातील विशिष्ट पेशींना उत्तेजित करून केलेल्या प्रयोगात निळसर-हिरव्या छटेचा एक नवाच रंग पाहिल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. ‘ओलो’ असे नावही या रंगाला देण्यात आले आहे. मात्र काही तज्ज्ञ या नव्या रंगाच्या अस्तित्वाबाबत साशंकता व्यक्त करत आहेत. रंगासंबंधी नेमके काय संशोधन? अमेरिकेतील वैज्ञानिकांच्या एका गटाने हे संशोधन केले आहे. या प्रयोगातील सहभागींच्या डोळ्यात लेझर बीम सोडण्यात आले आणि डोळ्याच्या रेटिनामधील विशिष्ट कोन पेशींना उद्दीपित केले. त्यामुळे या सहभागींनी एक अनोखा रंग पाहिल्याचा अनुभव सांगितला. ‘ओलो’ असे नाव या रंगाला देण्यात आले आहे. या संशोधनाचा अहवाल ‘सायन्स अॅडव्हान्सेस’ या नियतकालिकात १८ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रा. रेन एन्ग यांनी त्याला ‘थक्क करणारा शोध’ असे म्हटले आहे. ते स्वतःही या प्रयोगात सहभागी झाले होते. कसा केला प्रयोग? या प्रयोगात पाच जण सहभागी होते. यापैकी चार पुरुष आणि एक महिला होती. या सर्वांची रंगदृष्टी पूर्णतः सामान्य होती. चार पुरुषांपैकी तीन जण या प्रयोगाचे सहसंशोधक होते. त्यापैकी एक प्रा. रेन एन्ग होते. या सर्वांना एका ‘ओझेड’ (Oz) नावाच्या  उपकरणातून पाहण्यास सांगण्यात आले. हे उपकरण आरसे, लेझर आणि इतर ऑप्टिकल साधनांचा वापर करून तयार करण्यात आले होते. हे उपकरण याआधी यूसी बर्कले आणि वॉशिंग्टन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी तयार केले होते. रंग दिसल्यावर तो रंग प्रत्येक सहभागीला रंगाच्या डायलवर जुळवण्यास सांगण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

कसा दिसतो हा नवा रंग?

शास्त्रज्ञांच्या गटाने ‘ओलो’ (Olo) नावाचा एक असा नवा रंग शोधल्याचा दावा केला आहे, जो मानवी डोळ्यांनी कधीच पाहिलेला नाही. निळसर-हिरव्या छटेतील हा रंग अत्यंत संतृप्त (saturated) आहे आणि तो डोळ्यांनी नैसर्गिकरित्या पाहता येत नाही, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे.

आपल्या डोळ्यांना रंग कसे दिसतात?

डोळ्याच्या मागील बाजूस असलेला रेटिना हा प्रकाशसंवेदनशील पेशींचा एक थर असतो जो दृश्य माहिती ग्रहण करून तिचे पृथक्करण करण्याचे काम करतो. ही रचना प्रकाशाचे रूपांतर विद्युत संकेतांमध्ये करून ते मेंदूपर्यंत दृक्‌ज्ञानाच्या मज्जारज्जूमार्गे (optic nerve) पोहोचवते – त्यामुळे आपण पाहू शकतो.

ओलो कसा ‘सापडला’?

रेटिनामध्ये ‘कोन पेशी’ (cone cells) असतात, या रंग ओळखण्यासाठी जबाबदार असतात. डोळ्यात अशा तीन प्रकारच्या कोन पेशी असतात – S, L आणि M – ज्या अनुक्रमे निळा, लाल आणि हिरवा रंग ओळखतात. संशोधनानुसार, सामान्य दृष्टीमध्ये, M कोन पेशी उत्तेजित झाल्यास त्याच्याजवळील L आणि/किंवा S पेशीदेखील उत्तेजित होतात, कारण त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये थोडा फरक असतो, पण त्या एकमेकांना काही प्रमाणात तरी व्यापतात.

मात्र या अभ्यासात, लेझर फक्त M कोन पेशींनाच उद्दीपित करत होता.यामुळे मेंदूपर्यंत असा रंग संकेत पोहोचतो, जो नैसर्गिक दृष्टीत कधीच घडत नाही, असे या शोधनिबंधात म्हटले आहे. त्यामुळे ‘ओलो’ नावाचा रंग सामान्य डोळ्यांनी, कोणत्याही बाह्य मदतीशिवाय, पाहता येणे अशक्य आहे.

संशोधनाबाबत मतभेद कोणते?

काही दृष्टीतज्ज्ञ या प्रयोगाच्या निष्कर्षांवर साशंकता व्यक्त करीत आहेत. लंडनमधील सिटी सेंट जॉर्ज विद्यापीठाचे दृष्टीतज्ज्ञ प्रा. जॉन बार्बर यांच्या मते, ही एक ‘तांत्रिक किमया’ असली तरी ‘नवा रंग’ खरेच सापडला आहे का हे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र संशोधनातील सहभागी प्रा. एन्ग यांनी यांच्या मते, ओलो हा रंग इतका संतृप्त आहे की तुम्ही तो प्रत्यक्ष जगात कुठेही पाहू शकत नाही. काही तज्ज्ञांच्या मते हा नवीन रंग म्हणजे केवळ ‘एक वैयक्तिक अनुभव’ इतकेच म्हणता येईल

हे संशोधन कोणासाठी उपयोगी?

प्रा. एन्ग यांच्या मते, ‘ओलो’ हा रंग पाहणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड असले, तरी या संशोधनाचा उपयोग भविष्यात रंगांधळेपणावर उपाय शोधण्यासाठी केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discovery of a new color never seen by human eyes what does this olo color look like print exp amy