भारतीय सण हे ऋतूबदलाचे द्योतक असतात. आज जरी या सणांचे मूळ महत्त्व विस्मरणात जावून केवळ बाह्य उत्सवाचे स्वरूप शिल्लक राहिलेले असले तरी, भारतीय संस्कृतीच्या प्राचीन रचनाकारांनी निसर्गात होणाऱ्या सूक्ष्म बदलांचे निरीक्षण करून निसर्गातच आढळणाऱ्या गोष्टींच्या सहाय्याने हे सण कसे साजरे केले जावेत याची मांडणी केली होती, याला दिवाळी देखील अपवाद नाही. तेल-उटण्याने केलेले अभ्यंग स्थान, स्निग्धता वाढविणारा फराळ, दिव्यांची आरास या सर्व गोष्टींमागे निसर्गात होणारे परिवर्तन दडलेले आहे. परंतु काही गोष्टी सणाच्या निमित्ताने जोडल्या जातात, आत्मसात केल्या जातात आणि संस्कृतीचा भाग होतात. यात भल्या- बुऱ्या अशा दोन्ही परंपरांचा समावेश असतो. सध्या दिवाळीच्याच निमित्ताने एक मुद्दा गाजतो आहे, तो म्हणजे फटाक्यांचा. मुंबईत वाढलेल्या प्रदूषणामुळे न्यायालयाकडून फटाक्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे अनेक स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटताना दिसतात. हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, हिंदू सणांच्या वेळीच असे नियम कसे येतात इत्यादी. त्याच पार्श्वभूमीवर दिवाळीच्या दिवसांत फटाके वाजविणे ही परंपरा प्राचीन आहे का? हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

फटाके लोकप्रिय का?

फटाक्यांच्या इतिहासाविषयी ‘अ शॉर्ट हिस्टरी ऑफ फायरवर्क्स इन अमेरिका’ या पुस्तकात लिहिताना लेखक आणि इतिहासकार जॅक केली हे अग्नीचे महत्त्व विशद करतात. ते लिहितात अग्नी आपल्या चिंता आणि स्वप्ने दोन्ही भस्मसात करतो. अग्नी मानवाशी जलदगतीने संवाद साधतो. अग्नी केवळ पवित्र आणि भयंकरच नाही, तर अग्नी त्याच्या तेजस्वी रूपात मनोरंजनाचेही काम करतो. म्हणूनच उत्सवाच्या दिवसातील प्रकाश आणि फटाक्यांची रात्र जगाला सतत मंत्रमुग्ध करते यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

अधिक वाचा: Skyquakes: स्कायक्वेक्स म्हणजे काय? भूकंप खरोखरच अवकाशात होतात का?

फटाक्याचा शोध नेमका कोणाचा?

भारतात कुठलाही सण असो विशेषतः दिवाळी साजरी करताना फटाक्यांचा वापर नेहमीच होताना दिसतो. किंबहुना हा आपल्या संस्कृतीचा भाग मानला जातो. अभ्यासकांनी केलेल्या संशोधनानुसार इसवी सनाच्या १४ व्या शतकात भारतीय युद्धात ‘बारूद’ वापरला जावू लागला. याविषयी सविस्तर संशोधन पी. के. गोडे यांनी १९५० साली लिहिलेल्या “हिस्टरी ऑफ फायर वर्क्स इन इंडिया बिटवीन १४०० अँड १९००” या शोध निबंधात मांडले आहे. फटाक्यांचा वापर भारतात १४ व्या शतकापासून करण्यात येऊ लागला असे नमूद करण्यात आलेले आहे.

चिनी शोध

बारूद किंवा गनपावडरचा शोध मध्ययुगीन चिनी किमयागारांनी दहाव्या किंवा अकराव्या शतकात अपघाताने लावला, असे मानले जाते. सुरुवातीच्या कालखंडात हा अपघाती आविष्कार “डेव्हिल्स डिस्टिलेट” म्हणून संबोधला जात होता. या आविष्काराच्या प्रकाशाने आणि आवाजाने प्रेक्षक घाबरले त्यामुळेच या आविष्काराला डेव्हिल्स डिस्टिलेट संबोधले गेले होते. नंतरच्या काळात चिनी लष्करात गनपावडरचा वापर अधिकाधिक होवू लागल्याने त्याचे सामाजिक- राजकीय- आर्थिक मूल्यही वाढले. गनपावडरचा पांढरा, जादूई दिसणारा धूर यामुळे सार्वजनिक क्षेत्रात त्याचे प्रदर्शन अधिक लोकप्रिय झाले. यातूनच अरबांनी हे तंत्रज्ञान चीनमधून भारत आणि युरोपमध्ये नेले, असे मानले जाते.

सुधारित भारतीय फटाके

पी के गोडे यांनी नमूद केल्याप्रमाणे, हे तंत्र भारतात आल्यानंतर त्या तंत्रात अनेक बदल झाल्याचे आढळते. भारतात हे फटाके तयार करताना, चिनी तंत्रानुसार साहित्य न मिळाल्याने भारतात स्थानिक सामग्रीचा वापर करण्यात आला. त्यामुळे भारतात फटाक्यांची सुधारित आवृत्ती आढळते.

१४ व्या शकापूर्वी भारतात फटाके होते का?

अगदी प्राचीन काळापासून सोरामीठ (Saltpetre- KNO3) वापरण्याचा इतिहास आहे. भारतातही सोरामीठाचा वापर अश्मयुगीन काळापासून होत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. याचा वापर स्फोटके तयार करण्यासाठी केला जातो. प्राचीन भारतात वेगवेगळ्या शस्त्रांमध्ये याचा वापर केला जात होता, याचे पुरावे शुक्रनीति, कौटिल्याचे अर्थशात्र यांसारख्या ग्रंथामध्ये सापडतात. त्यामुळे प्राचीन भारतीयांना युद्धभूमी किंवा तत्सम शस्त्रांसाठी लागणारी स्फोटके तयार करण्याचे ज्ञान होते हे सिद्ध होते. येथे लक्षात घेण्याच्या मुद्दा असा, चीनकडे फटाक्यांचा मनोरंजनासाठीच्या वापराचे आणि निर्मितीचे श्रेय जाते.

अधिक वाचा: इस्रायल- हमास युद्ध: इस्रायलच्या राष्ट्रध्वजावर ‘हे’ चिन्ह आले कुठून?

मध्ययुगीन भारतीय उत्सवांमध्ये फटाके

अब्दुर रज्जाक याने भारतातील काही सुरुवातीच्या कालखंडातील फटाक्यांच्या आतषबाजीच्या सार्वजनिक कार्यक्रमाविषयी नोंदी केल्या आहेत. अब्दुर रज्जाक हा १४४३ सालामध्ये विजयनगरचा राजा देवराया दुसरा याच्या दरबारात तैमुरीद सुलतान शाहरुखचा राजदूत म्हणून होता. त्याने आपल्या नोंदीत महानवमी उत्सवाचे वर्णन केले आहे, रज्जाकने नोंद केल्याप्रमाणे, या कार्यक्रमात फटाक्यांच्या आतषबाजीचे आयोजन केले होते. या काळात भारताला भेट देणारा इटालियन प्रवासी ‘लुडोविको डी वर्थेमा’ याने विजयनगर शहराचे आणि तेथील हत्तींचे वर्णन करताना फटाक्यांचा संदर्भ दिला आहे, त्यांनी नमूद केल्याप्रमाणे येथील हत्ती फटाक्यांना खूप घाबरतात. एकूणच विजयनगर साम्राज्यात फटाके आणि आतषबाजी सामान्य होते, हे लक्षात येते. अनेक मध्ययुगीन भारतीय राज्यांमध्ये सण, कार्यक्रम आणि विवाहसोहळ्यांसारख्या विशेष प्रसंगी फटाके आणि आतषबाजी हा शाही मनोरंजनाचा एक प्रकार म्हणून अस्तित्वात होता.

फटाक्याची सूत्रे

१५ व्या शतकात रचल्या गेलेल्या कौतुकचिंतामणी या गजपती प्रतापरुद्रदेव (१४९७-१५३९) लिखित ग्रंथात फटाक्यांची निर्मिती सूत्रे दिली आहेत. इब्राहिम आदिल शाह हा इ.स. १६०९ च्या सुमारास विजापूरचा सुलतान होता. त्याने एका दरबाऱ्याच्या मुलीच्या लग्नात चांगलाच हुंडा दिला होता, त्या मुलीचे लग्न निजामशाहीचा सेनापती मलिक अंबर याच्या मुलाशी झाले होते. या लग्नात सुमारे रु. ८०,००० इतका खर्च फटाक्यांवर केला गेला होता” असे दिवंगत इतिहासकार सतीश चंद्र यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध ‘मिडिव्हल इंडिया : फ्रॉम द सुलतानेट टू मुघल्स’ या पुस्तकात नमूद केले आहे. यासारख्या कार्यक्रमांसाठी मुख्यत्वे राजाकडून देणगी दिली जात होती. तसेच सामान्य जनतेसाठी हे कार्यक्रम खुले असतं. नागरिकांनाही फटाके वाजवण्याची सोय होती. दुआर्टे बार्बोसा, हा पोर्तुगीज भारतातील लेखक आणि अधिकारी होता, याने आपल्या प्रवास वर्णनात १५ व्या शतकातील एका विवाहाचे वर्णन केले आहे. हा विवाह ब्राह्मण वधू आणि वराचा होता. या विवाहात लोकांचे संगीताच्या आणि नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन केले गेले, तसेच या लग्नात फटाक्यांची आतषबाजी ही झाली, असे तो नमूद करतो. याचाच संदर्भ घेवून पी के गोडे नमूद करताना लिहितात या कालखंडात गुजरातमध्ये फटाके तयार करण्याचे प्रमाण अधिक होते.

पौराणिक संदर्भ

या कालखंडातील पौराणिक कथांमध्ये, काव्यामध्ये फटाक्यांचा, आतषबाजीचा संदर्भ सापडतो. त्यामुळे या कथांच्या लेखकांना, कवींना फटाके आणि आतषबाजी यांचे ज्ञान असल्याचे समजते. १६ व्या शतकात संत एकनाथ स्वामी यांनी ‘रुक्मिणी स्वयंवर’ या काव्यात रुक्मिणी आणि श्री कृष्णाच्या विवाहाच्या वेळेस वापरल्या गेलेल्या रॉकेटपासून आधुनिक फुलबाज्या सारख्या समतुल्य फटाक्यांच्या श्रेणीचा उल्लेख केला आहे.

दिवाळीसाठी सार्वजनिक आतषबाजी

अठराव्या शतकापर्यंत, राज्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मोठ्या दिवाळी कार्यक्रमांमध्ये मनोरंजनांसाठी फटाके वाजवले जावू लागले. पेशव्यांची बखर या मराठा इतिहासावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ग्रंथात कोटाह (आधुनिक कोटा, राजस्थान) मधील दिवाळी उत्सवाचा उल्लेख आहे. या बखरीत महादजी सिंधिया (शिंदे) पेशवे सवाई माधवराव यांचे वर्णन करतात, या वर्णनात दिवाळीचे संदर्भ येतात. या संदर्भानुसार “दिवाळी सण कोटा येथे ४ दिवस साजरा केला जातो, त्यावेळेस लाखो दिवे प्रज्वलित केले जातात. या ४ दिवसांत कोटाचा राजा त्याच्या राजधानीच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करतो. त्या आतषबाजीला… “फटाक्यांची लंका” म्हणतात. याच कार्यक्रमात महादजी सिंधिया यांनी मध्यभागी उभारलेल्या रावणाच्या प्रतिमेचे वर्णन केले आहे, मूलतः हे लंकादहनाचे दृश्य आहे. एकूणच दिवाळ सणाच्या दिवशी कोटा मध्ये फटाक्यांच्या माध्यमातून लंका दहन केले जात होते. हे ऐकून पेशव्यांनी त्यांच्या मनोरंजनासाठी अशाच प्रकारे फटाक्यांची आतषबाजी करण्याचा आदेश दिला. परिणामी दिवाळीच्या दिवसात पुण्याची जनता भव्य फटाक्यांच्या आतषबाजीसाठी साक्षीदार ठरली होती. एकूणच मुघलांच्या आगमनानंतर फटाक्यांच्या सार्वजनिक आतषबाजीच्या कार्यक्रमांचे प्रस्त वाढलेले दिसते. तत्पूर्वी सार्वजनिकरित्या आतषबाजीचे कार्यक्रम होत होते याविषयी तुरळक उदाहरणे उपलब्ध आहेत.

अधिक वाचा: Killers of the Flower Moon: रूपेरी पडद्यावर आलेले ‘अमेरिकन- इंडियन्स’च्या हत्याकांडामागचे गूढ आहे तरी काय?

इंग्रजी फटाके

रायबहादूर डी.बी. पारसनीस यांच्या ऐतिहासिक वृत्तांतात इंग्रजी फटाके भारतात १७ व्या शतकात आल्याचे नमूद केले आहे, ब्रिटिश किमयागारांनी कलकत्ता येथे त्याचे सार्वजनिक कार्यक्रम केले. पारसनीस यांनी १७९० सालच्या सुमारास भारतात एका कुशल इंग्लिश पायरोटेक्निशियनच्या आगमनाचा उल्लेख केला आहे, ज्याच्या कर्तृत्त्वामुळे त्याला औधचा नवाब असफ-उद-दौल्लाकडे पाठवले होते. तेथे त्याने रंगीबेरंगी अग्निफुले (fireflowers), मासे, सर्प आणि तारे इत्यादी आकारांच्या फटाक्यांच्या आतषबाजीने सर्वांचेच मन मोहून टाकले होते. एका प्रदर्शनात त्याने आकाशात मशीद उभी केली होती. एकूणच १९ व्या शतकाच्या आरंभापर्यंत भारतातल्या जनमाणसांसाठी फटाके हे सर्वसामान्य होते. भारतात बर्‍याचदा फटाके बनवणारे हे गनपावडरचे निर्माते देखील होते, त्या साठीच कच्चा माल भारतात नेहमीच सहज उपलब्ध होता आणि त्याचा मोठ्या प्रमाणात युद्धात वापर केला जात असे. असे असले तरी अठराव्या शतकाच्या अखेरीस, डायनामाइटसारख्या नवीन स्फोटकांच्या शोधाने लष्करातील गनपावडरचा वापर टप्प्याटप्प्याने बंद झाला. तसेच या पावडरचा वापर केवळ फटाके बनविण्यापुरता मर्यादित ठरला.

आधुनिक भारतातील फटाके

मध्ययुगीन भारतातील फटाक्याच्या वर्णनावरून फटाके महाग होते, असे लक्षात येते. म्हणूनच मुख्यतः राज्यकर्त्यांकडून वैयक्तिक आणि नागरिकांच्या मनोरंजनासाठी किंवा आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या व्यक्तींद्वारे आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात वापरले जात होते. वसाहती काळात, बहुतेक स्वदेशी उद्योगांप्रमाणेच, भारताच्या फटाक्यांच्या उत्पादनाला आणि विकासालाही युरोप आणि चीनमधून आयात होणाऱ्या मालामुळे नुकसान सहन करावे लागले. भारतातील पहिला फटाका कारखाना कोलकात्यात एकोणिसाव्या शतकात सुरू झाला. स्वातंत्र्यानंतर, तमिळनाडूमधील ‘शिवकाशी’ हे फटाक्यांच्या आयातीवरील निर्बंधांचा फायदा घेऊन भारताचे ‘फायरक्रॅकर हब’ म्हणून उदयास आले.
वसाहती आणि मध्ययुगीन काळाच्या काळाच्या विपरीत गेल्या तीन दशकांत भारतीय मध्यमवर्गाची लोकसंख्या वाढली आणि आर्थिक भरभराट झाली तसेच देशांतर्गत उद्योगातून फटाक्यांचे उत्पन्न वाढले. त्यामुळे याबाबतीत भारताने कधीही मागे वळून पाहिले नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2023 is bursting crackers on diwali really an ancient indian tradition svs
Show comments