पाकिस्तान हा आपला शेजारी देश आहे. सध्या हा देश कंगाल झाला आहे. लोकांची दोन वेळेला खायचीही भ्रांत आहे. पाकिस्तान हा आपला शेजारी देश असला तरीही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे संबंध हे कायमच तणावाचे राहिले आहेत. मात्र पाकिस्तानला पाकिस्तान हे नाव कुणी दिलं? हा शब्द सर्वात आधी कुणी उच्चारला? माहित आहे का? अनेक लोक कदाचित या प्रश्नाचं उत्तर बॅरीस्टर मोहम्मद अली जिना असं देतील. मात्र जिना यांनी हे नाव दिलं नव्हतं. हे नाव दिलं होतं एका वेगळ्याच व्यक्तीने आपण त्याच व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ जानेवारी १९३३ ला उच्चारलं गेलं होतं नाव

पाकिस्तान हे नाव १९४७ ला नाही तर आजपासून ९० वर्षांपूर्वी पहिल्यांदा उच्चारलं गेलं. २८ जानेवारी १९३३ ही तारीख होती या दिवशी केंब्रिज विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पश्चिम आणि उत्तर भारतातील मुस्लिम होमलँड म्हणून पाकिस्तान हे नाव उच्चारलं होतं. या विद्यार्थ्याचं नाव होतं चौधरी रहमत अली. चौधरी रहमत अली हे कायदा विषयाचे विद्यार्थी होते. पाकिस्तान हे नाव सर्वात आधी त्यांनी उच्चारलं होतं.

मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तानचे संस्थापक असं म्हटलं जातं. त्यांना कायदे आझम किंवा महान नेते म्हणूनही संबोधलं जातं. भारताच्या उत्तर पश्चिम प्रांतात वेगळं राष्ट्र हवं ही भूमिका जिना यांनी मांडली होती. त्यांनी ही संकल्पना मांडून संपूर्णतः इस्लामिक राष्ट्राची कल्पना प्रत्यक्षात आणली. पाकिस्तान हे नाव मात्र त्यांनी दिलेलं नव्हतं.

चौधरी रहमत अली यांनी पहिल्यांदा उल्लेख केला होता तो पाकिस्तान

चौधरी रहमत अली यांनी २८ जानेवारी १९३३ “Now or Never: Are we to live or perish forever” असा आशय पॅम्प्लेट्स काढली होती. त्यामध्ये भारताच्या उत्तर भागात राहणाऱ्या ३० मिलियन मुस्लिम समाजाने एक जोरदार आवाहन केलं होतं. त्यामुळे पाकिस्तान हे वेगळं मुस्लिम राष्ट्र असावं ही संकल्पना जिना यांची होती मात्र पाकिस्तान हे नाव देण्याचं श्रेय जातं ते चौधरी रहमत अली यांनाच. पाकिस्तान राष्ट्रीय आंदोलनाचे ते संस्थापकही होते.

भारताच्या त्यावेळच्या राष्ट्रीय परिस्थितीनुसार वेगळी ओळख धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक आधारांनुसार असलेलं एक राष्ट्र हवं होतं. त्या राष्ट्राची वेगळी घटना असेल असाही विचार त्यावेळी मांडला गेला. अनेक इतिहासकारांच्या मते पाकिस्तानची निर्मिती होईल हे १९३३ मध्ये कुणाला कदाचित वाटलंही नसेल. पण पुढे सात वर्षांनी म्हणजेच १९४० मध्ये खरोखरच एक मुस्लिम राष्ट्र निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्यानंतर झालेल्या फाळणीतून पाकिस्तान जन्माला आला.

रहमत अली चौधरी यांच्या पत्रकांमध्ये काय होतं?

रहमत अली यांनी एक पत्रक काढलं होतं त्यामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्रवादावर तिखट शब्दांमध्ये टीका केली होती. अखिल भारतीय महासंघाच्या गोलमेज परिषदेसाठी तयार होणाऱ्या मुस्लिम नेत्यांवरही रहमत अली यांनी टीका केली होती. चौधरी रहमत अली यांनी त्यावेळी वेगळं राज्य असावं या आशयाचं वक्तव्य केलं होतं. रहमत अली चौधरी यांना ब्रिटिश इंडिया म्हणजेच पारतंत्र्यात असलेला भारत हा आपलं घर वाटत नव्हता. तर त्यांना भारतातच असं राष्ट्र दिसत होतं जे त्यांच्या नजरेत पाकिस्तान होतं. पंजाब, उत्तर पश्चिम सीमा, अफगाण प्रांत, काश्मीर, सिंध आणि बलुचिस्तान या सगळ्या भागांचा पाकिस्तान व्हावा असं त्यांना वाटत होतं.

रहमत अली आणि जिना यांची भेट झाली होती

रहमत अली यांनी जी पत्रकं वाटली होती त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. के. के. अजीज यांनी एक बायोग्राफी लिहिली आहे त्यांनी हे म्हटलं आहे की रहमत अली यानी पाकिस्तान हा विचार मांडला मात्र त्यावेळी फक्त तो एक विचार होता. १९३४ मध्ये रहमत अली यांनी जिना यांची भेट घेतली होती आणि आपले मनसुबे सांगितले होते. त्यावेळी जिना यांनी त्यांना फारशी आश्वासनं दिली नव्हती. त्यावेळी जिना असं म्हणाले होते की माझ्या प्रिय मुला घाई करू नकोस पुलाखालून पाणी वाहून जाऊदेत रस्ता आपोआप तयार होईल.

जिना असं म्हणाले असले तरीही रहमत अली पाकिस्तानसाठी उत्सुक होते. पाकिस्तान द फादरलँड ऑफ पाक नेशन हे पुस्तकही त्यांनी प्रकाशित केलं. त्यांनी त्यामध्ये आपली पाकिस्तानची व्याख्या, त्यांना वाटणाऱ्या संकल्पना सगळं लिहिलं होतं. या पुस्तकात काही ऐतिहासिक संदर्भही देण्यात आले होते. त्यानंतर हे पुस्तक अशा अनेकांना साथ देणारं ठरलं ज्यांना स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती करायची होती.

१९३७ नंतर काळ बदलू लागला

जिना यांनी काँग्रेसपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. १९३७ नंतर काळ बदलू लागला होता. जिना फुटीरतावादी झाल्याने रहमत अली यांना पाकिस्तानची निर्मिती होऊ शकते याचा मार्ग दिसू लागला होता. त्यानंतर १९४० मध्ये मुस्लिम लीगच्या लाहोरच्या अधिवेशनात लाहोर प्रस्ताव मंजूर झाला होता. या लाहोर प्रस्तावानुसार मुस्लिम बहुल भागांचा आणि भौगोलिक रित्या योग्य असा एक प्रदेश म्हणजे वेगळं मुस्लिम राष्ट्र व्हावं याबाजूने बहुतांश लोकांनी कौल दिला होता. या परिषदेत पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आला नव्हता. मात्र नंतर जिना आणि रहमत अली यांचे विचार जुळले. १९४० ते १९४३ या कालावधीत जिना आणि मुस्लिम लीगच्या अन्य नेत्यांनी पाकिस्तान हा शब्द वापरण्यास सुरूवात केली. १९४७ मध्ये रहमत अली यांनी पाहिलेलं पाकिस्तानचं स्वप्न पूर्ण झालं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know who used pakistan for the first time on this day in 1933 no it wasnt jinnah scj
First published on: 29-01-2023 at 18:25 IST