Trump Qatar betrayal इस्रायलने मंगळवारी (९ सप्टेंबर) कतारच्या दोहामध्ये बॉम्बवर्षाव केला. या हल्ल्यात इस्रायल कडून हमासच्या विशिष्ट नेत्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यावर कातारकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. इस्रायलने दावा केला की या हल्ल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठींबा होता. “दुर्दैवाने, हल्ला थांबवण्यासाठी खूप उशीर झाला होता,” असे ट्रम्प यांनी सांगितले आणि इस्रायलने हल्ल्याची माहिती दिली होती, हे त्यांनी मान्य केले. त्यामुळे ट्रम्प यांना हल्ल्याची माहिती असून त्यांनी कतारला पूर्वसूचना दिली नाही, असे आरोप कतारकडून केले जात आहे. मुख्य म्हणजे कतार हा अमेरिकेचा जवळचा मित्र असल्याचे सांगितले जाते. मात्र, या हल्ल्यानंतर विश्वासघाताची भावना आणखी बळावली आहे. नेमकं प्रकरण काय? ट्रम्प यांनी ४०० दशलक्ष डॉलर्सचा विश्वासघात केल्याची चर्चा का होत आहे? जाणून घेऊयात…

ट्रम्प यांचा डबल गेम

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ला सांगितले की, अमेरिकेला खूप आधीच हल्ल्याची माहिती मिळाली होती. मात्र, अमेरिकेने कतारला दिलेला इशारा, हेतुपुरस्सर असो वा नसो, खूपच उशिराचा होता. कतारने सांगितले की, अमेरिकेचा कॉल दोहामध्ये हल्ला सुरू झाल्यानंतर १० मिनिटांनी आला. “एका अमेरिकन अधिकाऱ्याकडून आलेला कॉल स्फोटांच्या आवाजादरम्यान आला होता,” असे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल-अन्सारी यांनी ट्वीट करून सांगितले.

इस्रायलने मंगळवारी (९ सप्टेंबर) कतारच्या दोहामध्ये बॉम्बवर्षाव केला. या हल्ल्यात इस्रायल कडून हमासच्या विशिष्ट नेत्यांना लक्ष्य केले. (छायाचित्र-रॉयटर्स)

हा हल्ला अमेरिकेचा जवळचा मित्र असलेल्या कतारवर झाला. कतारने ट्रम्प यांच्याशी संबंध सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, मात्र विश्वासघाताची भावना आणखी बळावली आहे. या हल्ल्याने शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी उत्सुक असलेल्या ट्रम्प यांच्या दुहेरी खेळीचीही पोलखोल झाली आहे. ट्रम्प यांच्या शेवटच्या इशाऱ्यानंतर गाझामध्ये युद्धविरामासाठीच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हमासचे राजकीय नेतृत्व दोहामध्ये जमले असतानाच इस्रायलने हा हल्ला केला. “या गुन्ह्यासाठी अमेरिकेचे प्रशासन संयुक्तपणे जबाबदार आहे,” असे हमासने म्हटले आहे.

हा हल्ला केवळ ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेवरच नाही, तर जागतिक शांततादूत होण्याच्या त्यांच्या स्व-घोषित महत्त्वाकांक्षेवरही एक मोठा आघात होता. कतारने या हल्ल्याला भ्याड म्हणत संताप व्यक्त केला आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इस्रायलच्या हल्ल्याला राज्य दहशतवाद म्हटले आहे. “कतार केवळ निवेदने आणि निषेधापुरते मर्यादित राहणार नाही, तर या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्व साधनांचा वापर करत आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

ट्रम्प यांच्याकडून मित्रराष्ट्राचा विश्वासघात?

  • भारताप्रमाणेच कतारलाही ट्रम्प यांच्या अनपेक्षित वागणुकीचा अनुभव आला. केवळ चार महिन्यांपूर्वी, ट्रम्प यांच्या कतार भेटीदरम्यान त्यांना एक आलिशान बोईंग ७४७-८ जेट भेट देण्यात आले होते.
  • त्याला ‘उडता महाल’देखील म्हटले जाते आणि त्याची किंमत तब्बल ४०० दशलक्ष डॉलर्स आहे.
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची आखाती देशातील ही पहिलीच भेट होती. ट्रम्प यांनी कतारकडून २४३.५ अब्ज डॉलर्सचे आर्थिक करारही सुरक्षित केले होते.
चार महिन्यांपूर्वी, ट्रम्प यांच्या कतार भेटीदरम्यान त्यांना एक आलिशान बोईंग ७४७-८ जेट भेट देण्यात आले होते. (छायाचित्र-रॉयटर्स)

एक महत्त्वाचा मित्र म्हणून कतारने अफगाणिस्तानातून हजारो अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यातही मदत केली. ट्रम्प यांचा मुलगा एरिक यांनी कतारमध्ये ट्रम्प-ब्रँडेड गोल्फ कोर्ससाठी करारही केला होता. यापलीकडे, कतार हा ट्रम्प यांच्या मध्य पूर्वेतील राजनैतिक प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा खेळाडू ठरला होता. हा आखाती देश अनेक महिन्यांपासून हमास आणि इस्रायल यांच्यात युद्धविराम आणि शांतता चर्चेसाठी मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.

इराणशी चांगले संबंध असल्यामुळे कतार अमेरिकेसाठी महत्त्वाचा आहे आणि अमेरिकन अधिकारी इराणबरोबर अप्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी ही संधी मानतात. मात्र, जेव्हा कतारवर इस्रायलने हवाई हल्ला केला, तेव्हा यापैकी काहीही गृहीत धरले गेले नाही. या ऑपरेशनमध्ये १५ इस्रायली लढाऊ विमानांचा सहभाग होता. विशेष म्हणजे, २०१२ मध्ये हमासला दोहामध्ये आपलं राजकीय कार्यालय उघडण्याची परवानगी अमेरिकेच्या पाठिंब्याने मिळाली होती. त्यामागे अमेरिकेचा पॅलेस्टिनी दहशतवादी गटासोबत अप्रत्यक्ष संवाद साधण्याचा उद्देश होता. हमासने एका निवेदनात सांगितले की, त्यांचे सर्वोच्च नेते इस्रायलच्या हल्ल्यातून बचावले, तर पाच सदस्य मारले गेले. यात एका कतारी सुरक्षा कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला.

अमेरिका आणि ट्रम्प यांची गोंधळात टाकणारी विधाने

हल्ल्यानंतर अमेरिका आणि ट्रम्प यांच्याकडून संदिग्ध आणि गोंधळात टाकणारी विधाने येऊ लागली. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लीव्हिट यांनी पत्रकारांना सांगितलं की, ट्रम्प यांनी विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांना कतारच्या लोकांना हल्ल्याची माहिती देण्याचे निर्देश ताबडतोब दिले होते. या घटनेला दुर्देवी म्हणत त्यांनी हमासला संपवणे हे एक योग्य ध्येय असल्याचेही म्हटले. ट्रम्प यांनीही अगदी घाईघाईने स्पष्टीकरण दिले की, त्यांना हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी कतारला कळवण्याचा प्रयत्न केला होता.

ते म्हणाले, “ही चांगली परिस्थिती नाही… जे काही घडले, त्याबद्दल आम्ही आनंदी नाही,” त्यानंतर ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एक निवेदन पोस्ट केले, त्यात त्यांनी हा हल्ल्याचा निर्णय “माझ्याकडून घेण्यात आला नाही,” हे स्पष्ट केले. त्यांनी नेतन्याहू यांच्यावर टीकाही केली. “कतार, एक सार्वभौम राष्ट्र आणि अमेरिकेचा जवळचा मित्र आहे. तो आपल्याबरोबर शांततेसाठी मध्यस्थी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे आणि धोका पत्करत आहे, देशातएकतर्फी बॉम्बस्फोट करणे इस्रायल किंवा अमेरिकेच्या उद्दिष्टांना पुढे नेत नाही,” असे ट्रम्प म्हणाले.

कतारवरील या हल्ल्याचा परिणाम घातक

डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारला पुन्हा असे होणार नाही, असे आश्वासनही दिले. नेत्यान्याहू यांनीही हा हल्ला पूर्णपणे इस्रायलचे ऑपरेशन होते, हे स्पष्ट करण्यासाठी तातडीने पाऊल उचलले. त्याला ट्रम्प यांना काही राजनैतिक संरक्षण देण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहिले गेले. मात्र, आता अमेरिकेवर पुन्हा विश्वास करणे कतारसाठी कठीण असणार आहे. या घटनेमुळे अरब देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसते. इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि तुर्किये यांसारख्या देशांमध्ये क्वचितच एकमत दिसून येते, पण यावेळी त्यांनी एकत्र येत आपली भूमिका मांडली आहे आही या हल्ल्याचा निषेध केला आहे. यामुळे युद्धविराम वाटाघाटीमध्ये सध्या अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. उर्वरित इस्रायली ओलिस परत आणण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसेल.

सोशल मीडियावरही ट्रम्प यांनी कतारचा मोठा विश्वासघात केल्याबद्दलच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. “अमेरिकेने नुकताच आपल्याच मित्रराष्ट्र कतारवर बेकायदा बॉम्ब हल्ल्याला मंजुरी दिली. या देशाकडून ट्रम्प यांनी नुकतंच एक विमान स्वीकारलं होतं आणि तिथे एरिक ट्रम्प नुकताच एक गोल्फ कोर्स उघडत होता?” असे ट्वीट ब्रिटिश-अमेरिकन पत्रकार मेहदी हसन यांनी केला. लेखक आणि भू-राजकीय विश्लेषक डॉ. अँड्रियास क्रीग यांनीही अमेरिकेने कतारच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे म्हटले आहे. “या हल्ल्याची कतारला आधीच माहिती होती, हे शक्यच नाही. जर त्यांना माहिती असती, तर त्यांनी कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची खात्री केली असती,” असे ते म्हणाले.