Donald Trump Tariff on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना भारतावर लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काबाबत (टॅरिफ) मोठे विधान केले. भारताने जर रशियाकडून खनिज तेलाची खरेदी बंद केल्यास आम्ही टॅरिफ रद्द करण्याबाबतचा निर्णय घेऊ असे संकेत त्यांनी दिले. विशेष बाब म्हणजे- दोन दिवसांपूर्वीच व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमने उधळली होती. यादरम्यान भारताविरोधात दंड थोपटणारे ट्रम्प अचानक कसे नरमले? नेमकी काय आहेत त्यामागची कारणे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचाच हा आढावा…

डोनाल्ड ट्रम्प कशामुळे नरमले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात मवाळ भूमिका घेण्यामागची काही कारणे असल्याचे सांगितले जात आहे. एप्रिलमध्ये ट्रम्प प्रशासनाने ‘आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक अधिकार अधिनियम’ कायद्यांतर्गत जगभरातील अनेक देशांवर टॅरिफ लादले आहे. या आयात शुल्काच्या माध्यमातून त्यांनी विविध देशांबरोबर डझनभर व्यापार करार केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात अनेकांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून या याचिकांवर सुनावणी सुरू झाली असून टॅरिफवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर ट्रम्प प्रशासनाचा निर्णय बेकायदा ठरवल्यास त्याचा भारताला मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आहे.

टॅरिफची सुनावणी किती महत्त्वाची?

सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील नवीन व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. त्याआधीच न्यायालयाने टॅरिफच्या मुद्द्यावर निकाल दिल्यास त्याचा या करारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणांबाबत किती अधिकार वापरता येतील याबाबतच्या निर्णयासाठी ही सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के आयात शुल्काचा भारतीय निर्यातदारांवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी निर्यातदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीत ‘निर्यात स्पर्धात्मकता वाढवण्याचे उपाय’ चर्चिले गेल्याचे सांगण्यात आले.

आणखी वाचा : Cancer Symptoms : ‘या’ साध्या चाचणीने ओळखता येणार कॅन्सरचा धोका; संशोधन काय सांगतं? तज्ज्ञांचा दावा काय?

डोनाल्ड ट्रम्प यांना बसणार फटका?

तज्ज्ञांच्या मते, न्यायालयाने जर डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय अवैध्य ठरवल्यास भारताला या करारात अधिक संतुलित वाटाघाटी करण्याची संधी मिळेल. अमेरिकेने आयात शुल्क कमी करण्याच्या मोबदल्यात त्यांच्या उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठेत प्रवेश मागितल्याचे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले आहे. या उत्पादनांमध्ये जनुकीय बदल केलेले सोयाबीन आणि मका यांसारख्या शेतीपिकांचा समावेश आहे. अमेरिकेने आपल्या जवळच्या मित्रराष्ट्रांसह इतर देशांवर १५ ते २०% परस्पर आयात शुल्क निश्चित केले आहे. त्याद्वारे ट्रम्प प्रशासनाला ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत जवळपास १०८ अब्ज डॉलर्सचा फायदा झाला आहे. सर्वाधिक शुल्क वसुली चीन आणि भारताकडून करण्यात आली आहे. यादरम्यान टॅरिफचा निर्णय बेकायदा ठरल्यास नुकसान भरपाई म्हणून त्यांना दोन्ही देशांना या शुल्काची परतफेड करावी लागण्याची शक्यता आहे.

तीन न्यायालयांनी दिलाय विरोधात निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या परस्पर शुल्कांविरोधात अमेरिकेतील तीन न्यायालयांनी आधीच निकाल दिला आहे. एप्रिलमध्ये इलिनॉय जिल्हा न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाचा युक्तिवाद फेटाळला होता. जूनमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना असे शुल्क लादण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. ऑगस्ट महिन्यात फेडरल सर्किट अपील या न्यायालयाने सरकारला परस्पर आयात शुल्क लादण्याबाबतचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते. सध्या टॅरिफच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यात न्यायालयाने या मुद्द्यावरून ट्रम्प सरकारवर ताशेरे ओढले होते.

सर्वोच्च न्यायालयानेही सुनावले खडेबोल

गेल्या आठवड्यात अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी ट्रम्प सरकारच्या युक्तिवादांवर शंका उपस्थित केली होती. टॅरिफ म्हणजे महसूल वसुलीचा प्रकार आहे असे तुम्हाला वाटते का? तुम्ही परस्पर असा निर्णय घेऊन इतर देशांबरोबरचे व्यापार संबंध कसे बिघडवू शकतात? असे प्रश्न न्यायाधीशांनी उपस्थित केले होते. त्याला प्रतिउत्तर म्हणून ट्रम्प प्रशासनाने युक्तिवादात टॅरिफ महसूल मिळवण्यासाठी नव्हे, तर परराष्ट्र-व्यवहारात सुरक्षा राखण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले होते; त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची भूमिकाही ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाविरोधात झुकलेली दिसून येत आहे. हा निकाल ट्रम्पसाठी धक्का आणि जगासाठी दिलासा ठरू शकतो, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा : Pakistan Constitution : पाकिस्तानची वाटचाल हुकूमशाहीकडे? संविधान बदलण्याचा घाट नेमका कुणासाठी?

डोनाल्ड ट्रम्प यांची चोहोबाजूंनी कोंडी

टॅरिफच्या मुद्द्यावरून चोहोबाजूंनी कोंडी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा भारताशी जवळीक साधताना दिसून येत आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून मी त्यांच्याशी बोलण्यासाठी उत्सुक आहे. सध्या त्यांची भूमिका मला आवडत नसली तरी भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले राहतील’, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले होते. त्यांच्या या पोस्टला त्यावेळी पंतप्रधान मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. ‘भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र असून, नैसर्गिक भागीदार आहेत. आमच्यातील व्यापार वाटाघाटीच्या चर्चेतून भारत-अमेरिकेमधील भागीदारीची अमर्याद क्षमता निर्माण होईल. मीदेखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यास उत्सुक आहे. चर्चेच्या माध्यमातून यशस्वी तोडगा निघेल’, असे मोदी म्हणाले होते.

भारतावरील टॅरिफ रद्द होणार?

या सर्व घडामोडीनंतर मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचे भाष्य केले. भारताबरोबरच्या व्यापार कराराच्या चर्चेत लक्षणीय प्रगती झाली असून दोन्ही देश कराराच्या जवळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिका भारतीय आयातीवरील कर कमी करण्याचा विचार करेल का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता, ‘सध्या रशियन तेलामुळे भारतावर कर खूप जास्त आहे. त्यांनी तेलाची आयात करणे बंद केल्यास आम्ही टॅरिफ रद्द करण्याबाबतचा निर्णय घेणार आहोत. भारत सध्या माझ्यावर खूश नाहीये. मात्र, आमचे संबंध पुन्हा एकदा चांगले होतील आणि प्रेम वाढेल’, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.