US Approves Sale of AMRAAM Missiles To Pakistan : भारताशी दुरावा निर्माण झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपासून अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आठवडाभरापूर्वी पाकिस्तानने अरबी समुद्रात नवीन बंदर उभारण्याची ऑफर अमेरिकेला दिली होती. त्याची परफेड म्हणून अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाई दलाला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. इतकेच नव्हे, तर शस्त्रास्त्र करारामध्येही पाकिस्तानचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या शत्रूदेशाची ताकद वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. नेमकी काय आहे ही क्षेपणास्त्र प्रणाली? त्या संदर्भातील हा आढावा…
अमेरिकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ वॉर’ विभागाने नुकत्याच अधिसूचित केलेल्या शस्त्रास्त्र करारात पाकिस्तानला ३५ खरेदीदारांपैकी एक म्हणून नमूद केले आहे. त्या करारानुसार पाकिस्तानला २०३० पर्यंत हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या ‘AMRAAM’ (अॅडव्हान्स मीडियम रेंज एअर टू एअर मिसाईल) या अत्याधुनिक क्षेपणास्त्राचे १२० नग मिळणार आहेत. २०१९ मध्ये पाकिस्तानने याच क्षेपणास्त्राचा वापर करून भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे लढाऊ विमान पाडले होते, असे सांगितले जाते. अमेरिकेने पाकिस्तानला अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा करणे ही भारतासाठी चिंता वाढवणारी बाब आहे.
अमेरिकेच्या AMRAAM क्षेपणास्त्राची क्षमता किती?
अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी रेथिऑनने विकसित केलेले ‘AIM-120 AMRAAM’ हे अत्याधुनिक दर्जाचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून हवेतून हवेत मारा केला जाऊ शकतो. ”AIM-120 AMRAAM’ क्षेपणास्त्र पूर्वीच्या ‘AIM-7’ स्पॅरो क्षेपणास्त्राची विकसित आवृत्ती आहे. वेग, आकार व वजनाने ते स्पॅरोपेक्षा अधिक दर्जेदार आहे. कमी उंचीवरील लक्ष्य भेदण्यासाठी त्यात काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. ‘AIM-120 AMRAAM’मध्ये इनर्शिअल रेफरन्स युनिट आणि मायक्रो-कॉम्प्युटर प्रणालीसह सक्रिय रडार प्रणाली बसवण्यात आली आहे. त्यामुळे हे क्षेपणास्त्र विमानाच्या फायर-कंट्रोल सिस्टीमवर कमी अवलंबून राहते.
आणखी वाचा : Breast Cancer : तरुणींमध्ये झपाट्याने वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; काय आहेत कारणं? तज्ज्ञ काय सांगतात?
या क्षेपणास्त्रातील रडार त्याला लक्ष्यापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करते. एकाच वेळी शत्रूची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त करून, ते त्वरित मागे फिरू शकते. रेथिऑन कंपनीतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘AIM-120 AMRAAM’ क्षेपणास्त्र अत्याधुनिक लढाऊ विमानांना अगदी सहजपणे लक्ष्य करू शकते. त्याची प्रगत सक्रिय मार्गदर्शन प्रणाली कठीण परिस्थितीतही आपले लक्ष्य पटकन शोधू शकते. आजपर्यंत पाकिस्तान, पोलंड व जर्मनीसह जगभरातील ४० देशांनी अमेरिकेकडून या क्षेपणास्त्राची खरेदी केली आहे.
अमेरिकेमुळे भारतासमोरील आव्हाने वाढणार?
पाकिस्तानने अमेरिकेकडून ‘AIM-120 AMRAAM’ हे क्षेपणास्त्र खरेदी केल्याने भारतासमोरील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. कारण- हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाकडे असलेल्या राफेलच्या क्षमतेला आव्हान देऊ शकते, अशी भीती काही संरक्षक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या पाकिस्तानच्या हवाई दलाच्या ताफ्यात जुन्या C5 प्रकाराचे AMRAAM क्षेपणास्त्र आहे. उच्चस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान बऱ्याच काळापासून अमेरिकेतील नव्याने विकसित केलेले ‘AMRAAM’ क्षेपणास्त्र खरेदी करण्यास उत्सुक होता. अमेरिकेकडून क्षेपणास्त्र खरेदीचा करार करण्यापूर्वी पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रमुख अहमद बाबर हे जुलै महिन्यात वॉशिंग्टनमध्ये गेले होते. तिथे त्यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांची भेट घेतली होती.
२०१९ मध्ये पाकिस्तानने केला होता भारतावर हल्ला
‘AMRAAM’ क्षेपणास्त्र हे पाकिस्तानच्या सर्वांत प्रभावी आणि घातक लष्करी उपकरणांपैकी एक आहे. २००७ मध्ये पाकिस्तानने या क्षेपणास्त्राची ७०० हून अधिक युनिट्स खरेदी केली होती. २०१९ मध्ये पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी ‘F-16’ व ‘AMRAAM’ या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. मात्र, भारतीय हवाई दलाने हा प्रयत्न यशस्वीरीत्या हाणून पाडला; पण या संघर्षात भारताचे ‘MiG-21’ हे लढाऊ विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले आणि त्याचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडण्यात आले. (ज्यांना नंतर भारताकडे सुपूर्द करण्यात आले). त्यावेळी भारताने ‘F-16’ फायटर जेट्स आणि ‘AMRAAM’ क्षेपणास्त्राच्या वापरासंदर्भात पाकिस्तानने केलेल्या उल्लंघनाचे पुरावे अमेरिकेला दिले होते.
हेही वाचा : Russia-Pakistan Deals : मित्र देशामुळेच भारताची कोंडी? पाकिस्तानला मदत कोण करतंय? काँग्रेसचा आरोप काय?
अमेरिकेसह चीनची पाकिस्तानला मदत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये परतल्यापासून ते पाकिस्तानची मदत करताना दिसून येत आहेत. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बळकट झाले आहेत. भारताबरोबर युद्धविराम घडवून आणल्याबद्दल पाकिस्तानने ट्रम्प यांचे आभार मानले आणि त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्याची तयारी दर्शवली. दुसरीकडे ट्रम्प यांनी युद्धविराम केल्याचा दावा भारताने सातत्याने फेटाळून लावला. अमेरिकेबरोबरच चीनदेखील पाकिस्तानची मदत करीत असल्याचे समोर आले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानने चिनी बनावटीच्या शस्त्रांनी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. एका अहवालानुसार, एकट्या चीनने गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानला ८१ टक्के शस्त्रे पुरवली आहेत. त्यामुळे भारताची चिंता वाढणे स्वाभाविक आहे. दरम्यान, अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधावर भारताचे बारकाईने लक्ष आहे.