DRDO successfully tests Home grown air defence System भारतीय लष्कर सातत्याने स्वदेशी तंत्रज्ञानाचे विकसित शस्त्रास्त्र विकसित करत आहे. नुकतंच भारतीय संरक्षण संशोधन संघटनेने (DRDO) विकसित केलेली एकत्रित हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची (IADWS) पहिली चाचणी यशस्वी ठरली. संरक्षण मंत्रालयाने (MoD) रविवारी (२४ ऑगस्ट) सांगितले की, एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची (आयएडीडब्ल्यूएस-IADWS) पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार पडली. ही चाचणी ओडिशाच्या किनारपट्टीवर घेण्यात आली. या चाचणीत एकाच वेळी वेगवेगळ्या पल्ल्यांवर आणि उंचीवर असलेल्या तीन वेगवेगळ्या लक्ष्यांना नष्ट करण्यात आले. ही चाचणी भारतासाठी किती महत्त्वाची आहे? स्वदेशी ‘आयएडीडब्ल्यूएस’ म्हणजे काय? यामुळे भारताच्या लष्करी सामर्थ्याला कशी बळकटी मिळेल? त्याविषयी जाणून घेऊयात…

‘आयएडीडब्ल्यूएस’ म्हणजे काय?

‘आयएडीडब्ल्यूएस’ (Integrated Air Defence Weapon System) ही एक बहु-स्तरीय हवाई संरक्षण प्रणाली आहे, त्यात क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल (QRSAM), व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम (VSHORADS) क्षेपणास्त्रे आणि उच्च-शक्तीची लेझर डिरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उड्डाण चाचण्यांदरम्यान सर्व शस्त्र प्रणालीच्या घटकांनी अचूकतेने काम केले. चांदीपूरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजने या चाचणीची नोंद केली.

‘आयएडीडब्ल्यूएस’चे तीन घटक

QRSAM ची रचना आणि विकास डीआरडीओने केला आहे, VSHORADS चा विकास रिसर्च सेंटर इमारात (RCI)द्वारे करण्यात आला आहे आणि DEW चा विकास डीआरडीओच्या हैदराबाद येथील सेंटर फॉर हाय एनर्जी सिस्टीम अँड सायन्सेस (CHESS) ने केला आहे. या सर्व शस्त्र प्रणाली एका केंद्रीकृत कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे नियंत्रित केल्या जातात. त्याला हैद्राबादमधील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरीने विकसित केले आहे.

  • QRSAM (क्यूआरएसएएम): क्यूआरएसएएम म्हणजेच क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाईल ही एक कमी पल्ल्याची, पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी (Surface to Air) क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही प्रणाली प्रामुख्याने सैन्याच्या चिलखती तुकड्यांना शत्रूच्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण देण्यासाठी तयार केली गेली आहे. संपूर्ण शस्त्र प्रणाली अत्यंत गतिमान मोबाईल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या प्रणालीत शोध घेण्याची आणि मागोवा घेण्याची क्षमता आहे. त्याचा पल्ला ३ ते ३० किलोमीटर आहे. ‘क्यूआरएसएएम’मध्ये पूर्णपणे स्वयंचलित कमांड आणि कंट्रोल प्रणाली, दोन रडार (ॲक्टिव्ह ॲरे बॅटरी सर्व्हिलन्स रडार आणि ॲक्टिव्ह ॲरे बॅटरी मल्टीफंक्शन रडार) आणि एक लाँचर यांचा समावेश आहे.
  • VSHORADS : व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम ही चौथ्या पिढीची, तांत्रिकदृष्ट्या प्रगत, लहान आणि ‘मॅन पोर्टेबल’ (Man Portable) हवाई संरक्षण प्रणाली आहे. डीआरडीओने म्हटले आहे की, ही क्षेपणास्त्र प्रणाली लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्य दलांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता ठेवते. ही शस्त्र प्रणाली ३०० मीटर ते ६ किलोमीटरच्या पल्ल्यातील लक्ष्यांना निष्प्रभ करू शकते. त्यात ड्रोन आणि इतर हवाई धोक्यांच्या श्रेणींचा समावेश आहे.
संरक्षण मंत्रालयाने (MoD) रविवारी (२४ ऑगस्ट) सांगितले की, एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची (आयएडीडब्ल्यूएस-IADWS) पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार पडली. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)
  • DEW (डीईडब्ल्यू): या एप्रिलमध्ये ‘चेस’ संस्थेने ‘व्हेईकल माउंटेड लेझर डीईडब्ल्यू एमके-II(A)’ च्या लँड व्हर्जनची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान डीईडब्ल्यूने यूएव्ही (UAV) आणि ड्रोनच्या एका गटाला निकामी करून त्यांच्या संरचनेत बिघाड केला आणि त्यांच्या पाळत ठेवणाऱ्या सेन्सर्सना अक्षम केले. त्यामुळे भारताचा समावेश अशा प्रकारची प्रणाली असलेल्या जागतिक शक्तींच्या निवडक गटामध्ये झाला आहे. ‘डीईडब्ल्यू’चा पल्ला तीन किलोमीटरपेक्षा कमी असल्याची माहिती आहे.

‘आयएडीडब्ल्यूएस’चे महत्त्व काय?

एक वरिष्ठ डीआरडीओ वैज्ञानिक म्हणाले, “जर आपण तीन वेगवेगळ्या प्रणालींच्या पल्ल्यांचा विचार केला, तर आपण या निष्कर्षावर पोहोचू शकतो की, त्यांचा उद्देश ३० किलोमीटरच्या पल्ल्यातील, वेगवान ते कमी वेगवान आणि फिक्स विंग ते रोटरी-विंग अशा विविध प्रकारच्या हवाई धोक्यांना निष्प्रभ करणे आहे. या हवाई संरक्षण प्रणालीतील स्वदेशी कमांड आणि कंट्रोल प्रणाली, तसेच स्वदेशी निर्मित शस्त्रे एक महत्त्वाची सामरिक संपत्ती आहे. कमी पल्ल्यांवरील ही पहिली चाचणी आहे. या चाचणीमुळे या प्रणालीचा उच्च पल्ल्यांवर वापर कण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘मिशन सुदर्शन चक्र’ या मोहिमेच्या दिशेने हे एक पाऊल मानले जाऊ शकते.”

‘मिशन सुदर्शन चक्र’ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. या मोहिमेचे उद्दिष्ट राष्ट्रीय सुरक्षा कवचाचा विस्तार, बळकटीकरण आणि आधुनिकीकरण करणे आहे. या प्रणालींच्या विकासात सहभागी असलेल्या डीआरडीओच्या एका माजी प्रमुखांनी या चाचणीला भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेतील एक झेप म्हटले. ते म्हणाले, “या पहिल्या चाचणीमुळे क्षेपणास्त्रे आणि डिरेक्टेड एनर्जी वेपन्स यांच्यात समन्वय दिसून येतो. या प्रणालींमुळे विविध हवाई धोक्यांविरोधात बहुस्तरीय हवाई संरक्षण मजबूत होते आणि परदेशी प्रणालींवरील अवलंबित्वदेखील कमी होते.”