दत्ता जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशांतर्गत खाद्यतेल बाजारात स्वस्ताईचे वारे वाहात आहेत. खाद्यतेलाच्या किमतीत ही घसरण का झाली? भारतातील खाद्यतेल उद्योगावर आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांवर याचा काय परिणाम होईल..

खाद्यतेल बाजारातील सद्य:स्थिती काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारात खाद्यतेलाचे दर घसरले असतानाही भारताने खाद्यतेल आयातीवरील कर कमी केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून देशात खाद्यतेलाचा प्रचंड साठा निर्माण झाला आहे. बंदरांवर खाद्यतेलाने भरलेली टँकर जहाजे उभी आहेत. यंदाच्या वर्षांतील पहिल्या चार महिन्यांत खाद्यतेल आयात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. परिणामी मे २०२२ च्या तुलनेत मे २०२३ मध्ये सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या प्रति किलो दरात सरासरी ८० रुपयांनी घट झाली आहे.

खाद्यतेलाचे दर कसे ठरतात?

देशाला एका वर्षांत सरासरी १२० लाख लिटर खाद्यतेलाची गरज असते. त्यापैकी सुमारे ६० टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते. त्यामुळे देशात किती तेलबियांचे उत्पादन झाले यावर खाद्यतेलाचे दर ठरत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलबिया उत्पादन, खाद्यतेलाची उपलब्धता, कर आणि व्यापार सुगमता यावर खाद्यतेलाचे दर कमी-जास्त होतात.

दर घसरणीत युक्रेनची भूमिका काय?

रशियाने लादलेल्या युद्धामुळे युक्रेन आणि शेजारील देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्पादित होणारे सूर्यफूल बिया आणि सूर्यफूल तेल यांची निर्यात विस्कळीत झाली होती. शिवाय मागील वर्षी पामतेलाचा पुरवठा कमी झाला होता. त्याचा परिणाम म्हणून खाद्यतेल सरासरी २५० ते २७० रुपये किलोपर्यंत गेले होते. सध्या युक्रेन-रशिया युद्धाची तीव्रता कमी झाली आहे. आयात-निर्यात व्यापार सुरळीत सुरू आहे. त्यामुळे युक्रेन आणि शेजारील देशांमधून जगभरात सूर्यफूल बिया आणि सूर्यफूल तेल, कच्चे सूर्यफूल तेल यांची निर्यात वेगाने सुरू आहे. परकीय चलन मिळवण्यासाठी युक्रेन मोठय़ा प्रमाणात सूर्यफूल तेलाची निर्यात करत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात युक्रेन आणि शेजारच्या देशांतून येणाऱ्या सूर्यफूल तेलाचा मोठा दबाव आहे. सूर्यफूल तेलाचे दर हे शेंगदाणा तेलाच्या खालोखाल असतात. सूर्यफूल आरोग्यदायी तेल मानले जाते. त्यामुळे ते पामतेल आणि सोयाबीन तेलापेक्षा महाग असते. पण सूर्यफूल तेल इतक्या मोठय़ा प्रमाणात बाजारात येत आहे की सूर्यफूल तेल सोयाबीन आणि पामतेलाच्या बरोबरीने विकले जात आहे. खाद्यतेल बाजारावर सूर्यफूल तेलाचा मोठा दबाव असल्यामुळे प्रामुख्याने अन्य तेलातही स्वस्ताई दिसून येत आहे.

भारताची आयात वाढली?

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात स्वस्ताई आल्यामुळे देशातील खाद्यतेलाच्या उद्योग आणि आयातदारांनी प्रचंड प्रमाणात आयात केली आहे. २०२३च्या पहिल्या चार महिन्यांत म्हणजे साधारण ७० लाख टन तेलाची आयात केली. मागील वर्षी याच काळात ५६ लाख टन आयात झाली होती. यात प्राधान्याने पामतेल आणि सूर्यफूल तेलाचा समावेश आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आयात करू नये. देशातील खाद्यतेलाचा उद्योग अडचणीत येईल, अशी मागणी खाद्यतेल उद्योगानेच केली होती.  खाद्यतेलाची ही प्रचंड आयात मागील साडेचार महिन्यांत झाली आहे.

सोयाबीन, मोहरीच्या दराला फटका?

खाद्यतेलाच्या भरमसाट आयातीमुळे देशांतर्गत तेलबियांच्या दरावर मोठा परिणाम होत आहे. मागील वर्षी सोयाबीनचे दर प्रति क्विंटल सरासरी दहा हजारांवर गेले होते. यंदा हाच दर सरासरी ७००० ते ८००० रु. आहे. जागतिक बाजारात तेलाचे दर पडल्याचाच हा परिणाम आहे. भारतातील आयातीवर काही प्रमाणात नियंत्रण लादून शेतकऱ्यांना जास्तीचा दर देणे शक्य होते. पण सरकारने तसे केले नाही. अशीच स्थिती मोहरीची (सरसों/राई) आहे. मोहरीचे उत्पादन प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांत होते. या भागातील शेतकऱ्यांना यंदा मोहरी हमीभावापेक्षा कमी दराने विकावी लागत आहे. जागतिक बाजारात दर पडणे आणि भरमसाट आयात यामुळे देशांतर्गत तेल उद्योगातून मागणी कमी झाल्यामुळे शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, अशी शेतकरी तक्रार करीत आहेत. सोयाबीनबाबत समाधानाची बाब इतकीच, की मागील वर्षीइतका दर मिळत नसला तरी हमीभावापेक्षा जास्तीचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Edible oil market edible oil in price decline print exp 0523 ysh