मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये कोविड-१९ रुग्णांमध्ये भारतात अचानक वाढ होत आहे. मात्र, रुग्णांमध्ये होत असलेली ही वाढीमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. आठवड्याभरापूर्वी देशात १०,००० करोना रुग्णांची नोंद होत असताना रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. एका आठवड्यात शुक्रवारी भारतात कोविड-१९ बाधितांची संख्या १,१७,१०० वर पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा विषाणू अभूतपूर्व वेगाने पसरत आहे, जो मोठ्या प्रमाणावर ओमायक्रॉनचा प्रकार आहे. देशभरातील २७ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. बाधित असलेल्या बहुतेकांना कोणतीही किंवा फक्त सौम्य लक्षणे आहेत. तसेच ते घरीच लवकर बरे होत आहे. महामारी सुरू झाल्यापासून देशात ३५,२२६,३८६ लोकांना संसर्ग आणि ४,८३,१७८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी आढळलेल्या ३७७ रुग्णांसह भारतात आता ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३,००७ झाली आहे. २७ राज्यांमध्ये ओमायक्रॉनची नोंद झाली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रात (८७६) सर्वाधिक प्रकरणे आहेत. त्यानंतर दिल्लीमध्ये ४६५ बाधित आहेत. एक लाख रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी, पहिल्या लाटेमध्ये १०४ दिवस लागले होते, तर दुसऱ्या लाटेत सुमारे ५४ दिवस लागले. सध्याच्या वाढीदरम्यान एक लाखाचा आकडा गाठण्यासाठी केवळ आठ ते १० दिवस लागले आहे.

लोकसत्ता विश्लेषण: Omicron वेगाने का पसरतोय?, लक्षणं दिसण्याचा कालावधी किती? रुग्ण किती दिवसांनी होतात बरे?

सध्याची परिस्थिती

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरू ही काही चिंता करण्यासारखी प्रमुख ठिकाणे आहेत. राज्यातील अधिकार्‍यांना लवकरच ओमायक्रॉन ग्रामीण भागात पसरेल अशी भीती वाटत आहे. ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सुविधा कमकुवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये नोंदवलेल्या नवीन प्रकरणांपैकी निम्मे कोलकात्यात आहेत. मात्र, अद्यापही रुग्णालयात दाखल होण्याची फारशी प्रकरणे नाहीत. मुंबईतील सुमारे ९० टक्के नवीन बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि फक्त आठ टक्के बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता विश्लेषण : ओमायक्रॉन विरूद्ध कापडाचे मास्क किती प्रभावी आहेत?; जाणून घ्या तज्ञांची उत्तरे

बुधवारी दिल्लीत कोविड-१९ रुग्णांची संख्या एका दिवसात जवळपास दुप्पट होऊन १०,६६५ वर पोहोचली. पण राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की त्यांच्यापैकी केवळ सात टक्के बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत. शुक्रवारी दिल्ल्लीत १५,०९७ करोनाबाधित आढळून आल्याने राष्ट्रीय राजधानीतील दैनंदिन प्रकरणांमध्ये एका दिवसात तब्बल ४१.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गेल्या पाच दिवसात वाढ

आरोग्य मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनामध्ये सांगितले की, गेल्या आठ दिवसांत भारतात रुग्णांमध्ये ६.३ पटीने वाढ झाली आहे. पॉझिटिव्हीटी रेटमध्ये तीव्र वाढ दिसून आली आहे. २९ डिसेंबर २०२१ रोजी ०.७९ टक्क्यांवर असलेला पॉझिटिव्हीटी रेट ५ जानेवारी २०२२ रोजी ५.०३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

भारतात शुक्रवारी १,१७,१०० नवीन कोविड-१९ बाधितांची नोंद झाली, जी जूनपासूनची सर्वाधिक संख्या आहे. शुक्रवारी नवीन प्रकरणांमध्ये २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात गुरुवारी १,१६,८३६ नवीन बाधितांची नोंद झाली जी २०० दिवसांतील सर्वाधिक होती.

लोकसत्ता विश्लेषण: देशातील करोना पॉझिटिव्हिटी रेट ६.४३ इतका आहे म्हणजे काय?; तो पाचहून अधिक असणं धोकादायक का?

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या पिकवर काय घडले?

देशात दैनंदिन रुग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडण्याची सात महिन्यांतील ही पहिलीच वेळ आहे. भारतात कोविड-१९ चे संक्रमण वाढत आहे. सप्टेंबर २०२० मध्ये पहिल्या लाटेच्या पिकनंतर जवळपास सहा महिन्यांनंतर, भारतात कोविड-१९ प्रकरणी वाढ होऊ लागली. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने देशात साथीच्या करोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळत होते. २३ एप्रिल २०२१ पर्यंत, कोविड-१९ मृत्यूंच्या आकडेवारीने १,८५,०००चा टप्पा ओलांडला होता.  

दुसऱ्या लाटेत वृद्ध लोकसंख्येव्यतिरिक्त बालकांना आणि तरुणांनीही संसर्ग झाला. दोन्ही लाटांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. तसेच तरूण रूग्णांचे प्रमाण केवळ किरकोळ होते.

आयसीएमआरच्या अहवालात म्हटले आहे की पहिल्या लाटेतील ५० वर्षे वय असणाऱ्यांच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील बाधितांचे सरासरी वय ४९ वर्षांपर्यत कमी झाले होते. दुसऱ्या लाटेमध्ये लक्षणे नसलेली प्रकरणेही जास्त होती, पण दोन लाटांमधल्या मृत्यू दरात फरक नव्हता. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज आणि व्हेंटिलेटरची गरज खूप जास्त होती.

लोकसत्ता विश्लेषण : करोना ‘होम आयसोलेशन’मध्ये स्वतःची काळजी कशी घ्याल

सद्य परिस्थितीबद्दल तज्ञ काय म्हणतात?

ओमायक्रॉन प्रकार जगभरातील लोकांना होत आहे आणि त्याला सौम्य म्हणून नाकारले जाऊ नये, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. सार्वजनिक आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की कोविड-१९ च्या नवीन टप्प्याच्या विरूद्ध लढ्यात पुढील दोन आठवडे महत्त्वपूर्ण आहेत कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

ओमायक्रॉन हा सामान्य व्हेरिएंट नाही. यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडू शकते. रुग्णांची चाचणी, समुपदेशन आणि देखरेख करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. तसेच अशोका विद्यापीठातील भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचे प्राध्यापक गौतम मेनन यांच्या म्हणण्यानुसार, पुढील १० दिवस महत्त्वाचे आहेत.

दरम्यान, आयआयएससी आणि इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या एका नवीन अभ्यासाने भाकीत केले आहे की भारतातील तिसरी लाट जानेवारी-अखेर आणि फेब्रुवारीमध्ये येऊ शकते. यावेळी दररोजच्या बाधितांची संख्या १० लाखांपर्यंत पोहोचू शकते. अभ्यास सांगतो की भारतात तिसऱ्या लाटेचे पिक गेल्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये असू शकते आणि त्याचा परिणाम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained just 8 to 10 days for covid 19 cases to reach the one lakh in india abn