चिन्मय पाटणकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ आज (१५ जून) गुजरातच्या कच्छमधील जखाऊ बंदराला धडकले. बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रात चक्रीवादळे तयार होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मात्र बिपरजॉय चक्रीवादळाच्या निमित्ताने अरबी समुद्रातील चक्रीवादळांचा इतिहास, अरबी समुद्रात चक्रीवादळांचे प्रमाण वाढणे, यामागील कारणे समजून घेणे गरजेचे आहे.

अरबी समुद्रात चक्रीवादळ कसे तयार होते?

उत्तर हिंदी महासागरात दरवर्षी सरासरी पाच चक्रीवादळे तयार होतात. त्यांपैकी चार वादळे ही बंगालच्या उपसागरात; तर एक अरबी समुद्रात तयार होते. ही चक्रीवादळे मान्सूनपूर्व (एप्रिल ते जून) आणि मान्सूनोत्तर (ऑक्टोबर ते डिसेंबर) या र्नैऋत्य मान्सून प्रवाह सक्रिय नसलेल्या काळात निर्माण होतात. जूनमध्ये अरबी समुद्रात मोसमी वारे सक्रिय होत असल्याने जूनमध्ये चक्रीवादळांच्या निर्मितीचे प्रमाण नगण्य असते. मात्र, जेव्हा मान्सूनपूर्व जूनमध्ये मान्सूनचा प्रवाह क्षीण असतो आणि समुद्राचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असते तेव्हा चक्रीवादळे निर्माण होतात.

अरबी समुद्रातील चक्रीवादळांचा इतिहास काय?

अरबी समुद्रात १९६५ पासून एकूण १३ चक्रीवादळे तयार झाली. जूनमध्ये गुजरातला धडकलेले ‘बिपरजॉय’ हे गेल्या २५ वर्षांतील पहिले, तर सहा दशकांतील तिसरे चक्रीवादळ ठरले आहे. यापूर्वी १९९६ आणि १९९८ मध्ये आलेली चक्रीवादळे गुजरातच्या किनाऱ्याला धडकली होती. १९६५ ते २०२२ या ५७ वर्षांच्या काळात जूनमध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या १३ चक्रीवादळांपैकी दोन वादळे गुजरात, एक महाराष्ट्र, एक पाकिस्तान आणि तीन ओमान-येमेनच्या किनारपट्टीला धडकली. तर सहा चक्रीवादळांची तीव्रता समुद्रातच कमी झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. १८९१ पासून तीव्र (वाऱ्याचा वेग ८९ ते ११७ किलोमीटर प्रति तास) आणि त्यापेक्षा अधिक तीव्रतेची पाच चक्रीवादळे गुजरातच्या किनाऱ्याला धडकल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या ‘सायक्लोन अ‍ॅटलास’मध्ये नमूद करण्यात आले आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे चक्रीवादळ होण्याची शक्यता बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात मिळून ३५ टक्के आहे. त्यामुळेच आतापर्यंत १९७७ आणि १९९८ अशा दोनच वेळी कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. आता बिपरजॉयची त्यात भर पडली आहे.

चक्रीवादळांचा कालावधी किती असतो?

साधारणपणे उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांचा कालावधी पाच ते सहा दिवसांचा असतो. मात्र बिपरजॉय चक्रीवादळाचा कालावधी जवळपास दहा दिवसांचा आहे. अरबी समुद्रात ६ जूनला निर्माण झालेले हे चक्रीवादळ १५ जूनला किनारपट्टीला धडकणार आहे. यापूर्वी अरबी समुद्रात तयार झालेले क्यार चक्रीवादळ नऊ दिवस आणि १५ तास टिकले होते. तर २०१८ मध्ये बंगालच्या उपसागरातील गज हे चक्रीवादळही नऊ दिवस आणि १५ तास टिकले होते.

अरबी समुद्रातच प्रमाण वाढले आहे का?

साधारणपणे बंगालच्या उपसागरात चार चक्रीवादळे, तर अरबी समुद्रात एक असे चक्रीवादळांचे प्रमाण असते. त्यामुळे बंगालचा उपसागर चक्रीवादळप्रवण मानला जातो. पुण्यातील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी’मधील (आयआयटीएम) हवामानशास्त्रज्ञांनी २०२१ मध्ये अरबी समुद्रातील चक्रीवादळांबाबत संशोधन केले होते. त्यातून गेल्या काही दशकांतील अरबी समुद्रातील चक्रीवादळांबाबतचे काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले. या निष्कर्षांनुसार गेल्या चार दशकांत अरबी समुद्रातील चक्रीवादळांचे प्रमाण ५२ टक्क्यांनी, तर तीव्र चक्रीवादळांचे प्रमाण १५० टक्क्यांनी वाढले आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळांचा कालावधी ८० टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच, समुद्रातील वादळे आता तुलनेने संथ गतीने समुद्रावरून वाटचाल करतात. अतितीव्र वादळांसाठीचा कालावधी २६० टक्क्यांनी वाढला आहे. अरबी समुद्रात मान्सूनपूर्व कालावधीत तयार होणाऱ्या चक्रीवादळांची तीव्रता ४० टक्क्यांनी; तर मान्सूननंतरच्या हंगामात तयार होणाऱ्या वादळांची तीव्रता २० टक्क्यांनी वाढली. तसेच चक्रीवादळांची तीव्रताही झपाटय़ाने वाढत असल्याचे या अभ्यासातून दिसून आले होते.

चक्रीवादळांमध्ये वाढीचे कारण?

अरबी समुद्रातील उष्णता वाढण्यामागे जागतिक तापमानवाढ हे प्रमुख कारण आहे. वाढलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वी उष्णता शोषून घेते. ही उष्णता समुद्रात जाते. त्यामुळे अरबी समुद्रातील तापमान वाढले आहे. परिणामी चक्रीवादळांचे प्रमाण वाढल्याचे आयआयटीएमच्या संशोधनातून समोर आले होते.

chinmay.patankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained more cyclones in arabian sea frequent cyclones in arabian sea print exp 0623 zws