अहमदाबाद विमानतळाजवळ आज १२ जून रोजी दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर अशा दुर्घटनेच्या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्लॅक बॉक्स संदर्भातील चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी १३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर तपासाला वेगळी दिशा मिळाली होी. पावसामुळे हा ब्लॅक बॉक्स सापडण्यात अडथळे येत होते. ब्लॅक बॉक्स सापडल्याने गेल्या अनेक वर्षातील या भीषण दुर्घटनेचं मुख्य कारण समजण्यास त्यावेळी मदत झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या विमानातील ‘कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर’ असलेला दोनपैकी एक ब्लॅक बॉक्स शोध पथकाला काही दिवसांनंतर सापडला होता. त्याच्या बाहेरील आवरणाचे नुकसान झाले असले, तरी आतील नारंगी रंगाचे सिलेंडर तुलनेने शाबूत असल्याचे तपासकर्त्यांनी सांगितले. अपघातग्रस्त बोइंग ७३७-८०० विमान सोमवारी २९ हजार फूट उंचीवर उडत असताना ते अचानक दुर्गम अशा पर्वतीय भागात सरळ खाली कोसळले. यामुळे आजूबाजूच्या जंगलांमध्ये आग लागली होती. आता अहमदाबादच्या अपघातानंतर पुन्हा एकदा ब्लॅक बॉक्सची चर्चा सुरू झाली आहे.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

कोणत्याही विमानाचा, हेलिकॉप्टरचा अपघात झाला की त्याचा ब्लॅक बॉक्स मिळवणं ही प्राथमिकता असते. एखाद्या विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) ज्यामध्ये आकडेवारी दिलेली असते तर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) असते ज्याद्वारे संभाषण रोकॉर्ड केले जाते. यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात.

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) कॉकपिटमधील रेडिओ ट्रान्समिशन आणि इतर आवाज रेकॉर्ड करतो, जसे की वैमानिकांमधील संभाषण आणि इंजिनचा आवाज. तर फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) उंची, एअरस्पीड, फ्लाइट हेडिंग, ऑटोपायलट स्थिती इत्यादी अशा ८० हून अधिक विविध प्रकारच्या माहितीची नोंद करतो.

व्यावसायिक विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स अनिवार्य आहेत. विमानावर कायदेशीर हक्क प्रस्थापित करणं हा त्यामागील हेतू नसून अपघाताची कारणं जाणून घेणं आणि भविष्यात असे अपघात होऊ नये हा असतो.

– ब्लॅक बॉक्स म्हणजे याचा रंग काळा असेल असं तुम्हाला अगदी सहज वाटून जाईल. मात्र तसे नसून या बॉक्सचा रंग केशरी असतो.

– तो इतक्या कठिण गोष्टींनी बनवलेला असतो की त्याच्यावर आग आणि पाणी या कशाचाच परिणाम होत नाही.

– हा बॉक्स सुरक्षित राहणे आवश्यक असल्याने तो विमानाच्या मागील भागात बसवला जातो. त्यामुळे तो सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असते.

– ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीची क्षमताही अतिशय चांगली असून ती ३० दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.

– ब्लॅक बॉक्सच्या तपासणीसाठी विमान निर्माण करणाऱ्या टीमकडून त्याच्या अनेक चाचण्या केल्या जातात. या कठिण चाचण्यांमधून गेल्याननंतरच हा बॉक्स विमानाला बसविण्यात येतो.

– विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो.

– ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी १९५०च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत असताना कमर्शिअल एअरक्राफ्ट अपघात झाल्याने त्यांनी हा शोध लावला. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला.

– १९६० मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. तर भारतात नागरी उड्डाण संचलनालयाने जानेवारी २००५ पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये ही दोन्ही उपकरणे बसविणे अनिवार्य केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what are black boxes and why are they important in a crash investigation sgy